Health Tips : छळ होत असलेल्या मुलाची मानसिकता

अपंग, धांदरट, हट्टी, चंचल, उद्धट व हेकट स्वभावाच्या मुलांचा छळ होण्याची जास्त शक्यता असते.
Health Tips
Health Tipsesakal
Published on
Summary

मुलाचा छळ होतोय असे लक्षात आल्यावर हितचिंतकांनी मुलाशी संवाद साधायचा प्रयत्न करावा. मुलाशी सौम्य शब्दात बोलून मैत्री करण्याचा प्रयत्न करावा व अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करावा.

-श्रुतिका कोतकुंडे
सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण,
sajagclinic@gmail.com

बदलत्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक परिस्थितीचा घरातील मोठ्यांवर व परिणामी त्यांच्या छत्रछायेखाली वाढत असलेल्या मुलांवर होतो. सर्व स्तरामध्ये मुलांच्या छळाची शक्यता असली तरीही गरीब कुटुंबामध्येही जास्त प्रमाणात दिसून येते. पालक विविध संघर्षातून आयुष्याला सामोरे जात असताना भावनिक कडेलोटाचा परिणाम मुलांवर होत असतो. रक्षणकर्त्या पालकांकडून झालेल्या शारीरिक, मानसिक व प्रसंगी लैंगिक छळामुळे मुलांचे अतोनात शारीरिक व मानसिक नुकसान होते. मुलांना शिस्त लावण्याच्या नावाखाली त्यांना बेदम मार दिला जातो. जर मुलाच्या शरीरावर व्रण, भाजण्याची लक्षणे, हाडाचे फ्रॅक्चर, डोळ्यात रक्तस्राव किंवा अंग काळे-निळे पडले असेल तर ही शारीरिक छळाची लक्षणे असू शकतात, हे ओळखावे. असा छळ झालेलं मूल मोठ होऊन जास्त आक्रमक, हिंसक, इतरांवर छळ करणारे किंवा भित्रं, निराश बनण्याची शक्यता असते हे जाणावे.

Health Tips
Kokan News: अशमयुगीन मानवी अस्तित्वांच्या खुणांचा शोध

छळ करणाऱ्या पालकांचे वैशिष्ट्य


अवेळी, कोवळ्या वयात व नको असताना आलेले पालकत्व
बेरोजगार, आर्थिक ताणात असलेले पालक
व्यसनाधीन, धांद्रट, भित्रा, चंचल किंवा हिंसक स्वभाव
स्वतःला लहान वयात छळ झालेले पालक

ज्या मुलांचा छळ होतो त्यांची वैशिष्ट्ये

अपंग, धांदरट, हट्टी, चंचल, उद्धट व हेकट स्वभावाच्या मुलांचा छळ होण्याची जास्त शक्यता असते. पालक जेव्हा प्रत्येक गोष्टीसाठी(घरातील अथवा बाहेरील) मुलांनाच दोष देतात, मुलाच्या हिताचे विचार करत नाहीत तेव्हा पालक छळवादी बनत जातात. या छळाचा मुलावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. मूल जास्त उदास, एकलकोंडे, हिंसक, भित्रे किंवा संशयी बनते. रडके, मलूल बनते, जेवत नाही म्हणून मुलाचे वजन कमी होऊ शकते, मूल अभ्यासात मागे पडू शकते. प्रसंगी मूल घर सोडून पळून जाऊ शकते.

छळ कसा थांबवता येईल?

मुलाचा छळ होतोय असे लक्षात आल्यावर हितचिंतकांनी मुलाशी संवाद साधायचा प्रयत्न करावा. मुलाशी सौम्य शब्दात बोलून मैत्री करण्याचा प्रयत्न करावा व अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करावा. पालकांकडून छळ होत असेल तर तो छळ कसा थांबवता येईल याचा विचार करावा. मुलाच्या सुरक्षेचा विचार करावा. त्याचप्रमाणे त्याला आधार देण्याचा प्रयत्न करावा. कुटुंबाकडून छळ होत असला तरीही कुटुंबाला धिक्कारू नये. पालकांना योग्य ती मदत उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून वातावरण निवळेल. मुलाला दुसऱ्या नातेवाईकांकडे ठेवण्याची जर गरज भासली तरी त्याचे खाणे-पिणे, त्याचे आरोग्य, औषधे, त्याचे कपडे व शिक्षणाकडे दुर्लक्ष होणार नाही याकडे लक्ष द्यावे. ज्या पालकांकडून छळ होत असेल त्या पालकांनाही मदतीची गरज असू शकते. छळ करणाऱ्या व्यक्तीला बोलण्याची संधी द्यावी व तिला योग्य ती मदत मिळाल्यास छळ थांबू शकतो, हे ओळखावे. जर छळ थांबला नाही तर मुलाला सुरक्षित नातेवाईकाकडे ठेवण्याची सोय करता येईल. जर इतर नातेवाईक जबाबदारी घेण्यास सक्षम नसतील तर बालगृहाचे किंवा अनाथ आश्रमाचा विचार करता येईल.

मुलाला मदत कशी करावी

मुलाला स्वतःबद्दल छान वाटण्यासाठी मुलाशी आधाराच्या स्वरांत बोलावे आणि या सर्वात त्याची चूक नाही हे त्याच्या मनावर बिंबवावे. मुलाच्या चांगल्या वागण्याचे व भावनांचे कौतुक करावे. मुलाला खेळ व मित्र बनवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. मुलामध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी मुलाला वेळ द्यावा जेणेकरून मूल हळूहळू मोकळे होईल. मुलासोबत खेळत गप्पा मारत वेळ घालवावा. त्यांना प्रेम व आपुलकीने वागवावे. गरज भासल्यास समुपदेशकाकडे न्यावे. मुलाला त्याच्या भावना ओळखायला व योग्य प्रकाराने व्यक्त व्हायला मदत करावी. मुलाला खेळीमेळीत भावनांशी ओळख करून द्यावी. मुलाला काय भावना आहेत, त्या का आहेत त्याबद्दल बोलावे. मुलाला राग रचनात्मक पद्धतीने व्यक्त करायला शिकवावे. खेळण्यातून त्याचा राग व्यक्त होऊ द्यावा.

मुलांसाठी सुरक्षाकवच बनवा

छळ करणाऱ्या व्यक्तीचा राग ओळखून स्वतःला सुरक्षित कसे करावे याबद्दल मुलाशी बोलावे. मित्राचा, शेजाऱ्याचा व प्रसंगी जर पोलिस ठाण्याचा नंबर असेल तर तो लिहून मुलाला द्यावा. शेजारी किंवा नातेवाईक कुठे मूल आसरा घेऊ शकते, अशी व्यक्ती त्याला सुचवावी.
सध्याच्या संवेदनाशून्य होत चाललेल्या जगात लहान मुलेच आपले भविष्य आहेत, हे ओळखून ज्या ज्या पातळ्यांवर त्यांचा छळ संवेदनशीलतेने रोखता येईल ते सर्व केले पाहिजे. माणसाने माणसाशी मनासारखं वागले तरच ही माणुसकी टिकेल नाही का?

(लेखिका मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.