कुणकेश्वरमध्ये प्राचीन मंदिराचे अवशेष

कुणकेश्वरमध्ये प्राचीन मंदिराचे अवशेष
Published on

15082

कुणकेश्वरमध्ये प्राचीन मंदिराचे अवशेष

अकराव्या शतकातील बांधकाम; याआधीही आढळले होते अवशेष

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३० ः तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर परिसरात पुन्हा एकदा अकराव्या शतकातील प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. यापूर्वी २०११ मध्ये कुणकेश्वर मंदिराच्या समुद्राकडील तटबंदीलगत रस्त्याच्या कामासाठी खोल खंदक खणताना प्रथम प्राचीन मंदिराचे अवशेष आढळून आले होते, अशी माहिती प्राच्यविद्या अभ्यासक रणजित हिर्लेकर यांनी दिली.
अकराव्या शतकातील अवशेष उजेडात आणण्याचे काम रणजित हिर्लेकर यांनी केल्याचा त्यांचा दावा आहे. त्यावेळेपासून ते सातत्याने या मंदिराच्या जुन्या अवेशषांचा शोध घेत होते. आतापर्यंत कुणकेश्वर मंदिरच्या समुद्राकडील बाजूस जेव्हा जेव्हा बांधकामाच्या निमित्ताने खोदकाम करण्यात आले, त्यावेळी अशा पद्धतीचे मंदिराचे अवशेष सातत्याने शोधून काढण्यात आल्याचे श्री. हिर्लेकर यांनी सांगितले.
हिर्लेकर यांच्या मते, आतापर्यंत सापडलेले अवशेष हे कुणकेश्वर मंदिर परिसराच्या बाहेर समुद्राकडील दक्षिण बाजूला सापडले होते; पण आता मंदिराचे हे अवशेष मंदिर परिसरात मंदिराच्या उत्तर बाजूला तटबंदीलगत आढळून आले आहेत. यात्रेच्या वेळी भक्तनिवासातील दर्शन मंडपातून कुणकेश्वर मंदिराकडे येणाऱ्या सिमेंट काँक्रिटच्या पुलाच्या पायासाठी दहा-पंधरा फूट खणलेल्या खोल खड्डयांमध्ये दहा फुटांच्या खाली हे प्राचीन अवशेष आढळले आहेत. तसेच कुणकेश्वर मंदिराच्या लगत असणाऱ्या भैरव मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम करताना काही जुने कोरीव काळ्या पाषाणाचे अवशेष आढळून आले आहेत. या दोन खड्डयांमधील दगड मातीचा थर पाहता येथे कोणताही जांभा खडक आढळून येत नाही. त्यामुळे हा सर्व भाग भराव घालून भरून काढलेला आहे. कुणकेश्वर मंदिर हे अकराव्या शतकातील कदंब, चालुक्य, शिलाहार यांच्या काळातील असून, त्याची साक्ष देणारे हे मंदिराचे प्राचीन अवशेष भाविकांना पाहण्यासाठी जतन करून ठेवणे आवश्यक आहे, असे मत रणजित हिर्लेकर यांनी व्यक्त केले.
...............
कोट
15083
आता सापडलेल्या या मंदिराच्या वास्तू घटकांचे निरीक्षण करता व त्याचे कोरीव काम निरखून पाहता, हे मंदिराच्या अधिष्ठानाचे अथवा मंडोवराचे भाग आहेत. खुर, कुंभ, कर्णिका, अंतरपत्र यांसारखे कोरीव कामाचे जे थरावर थर असतात, त्यापैकी काही भागाचे हे अवशेष आहेत. या खणलेल्या खड्डयामधे जुन्या तटबंदीच्या पायाचे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे आज आढळणाऱ्या तटबंदीच्या सुमारे १० ते १२ फूट आत पूर्वी मूळ मंदिराची तटबंदी असावी. पुढे जीर्णोद्धाराच्यावेळी मंदिर परिसराची जागा विस्तारण्यासाठी हा तट काढून बाहेर सरकवून नवीन तट बांधला असावा.
- रणजित हिर्लेकर, प्राच्यविद्या अभ्यासक, कुणकेश्‍वर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.