Konkan News
Konkan Newsesakal

Konkan News : जैविक साखळीमधील महत्वाचा घटक म्हणजे कोळसूंद, काय आहे खासियत?

जंगली कुत्रा साधारण पाच, आठ, दहा, पंधरा अशा संख्येत कळपाने राहणारे आणि अत्यंत हुशार शिकारी म्हणून ते जगभर गणले जातात.
Published on
Summary

अनगड कोकणद्वारे हा विषय मांडता आला कारण, कोकण अनगड ठेवायचे असेल तर हे संशोधन हा महत्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे.

-पराग वडके (चिपळूण)
parag.vadake@gmail.com

अनगड कोकण घनघोर पावसात झोडपून निघत होते. त्यावर्षी निसर्गाने कहर केला होता. पावसासोबत कोरोनाचा प्रहार अनगड कोकणवर तुटून पडला होता. अशाच एका रात्री अकरा वाजलेले असताना राणीने खिडकीतून दूर पाहिले तर मिट्ट काळोख पडलेला होता आणि पाऊस जोरदार पडत होता. कसाबसा खिडकीतून हात बाहेर काढून खिडकीची खिटी ओढली. हात पूर्ण भिजला आणि खिडकी लावून घेतली. हात पुसून बेडवर पडणार तेवढ्यात मोबाईलवर मामा के. एस. असे नाव दर्शवणारी अक्षरे काळोखात चमकू लागली. हे मामा म्हणजे कासारखडक धनगर पाड्यावरचे एक जुने वृद्ध धनगर; पण गेल्या दहा-पंधरा वर्षातील जंगलप्रवासातील महत्वाचे साथीदार. त्यांचा अशावेळी फोन म्हणजे काहीतरी अडचण नक्कीच. बिबट्याने म्हैस मारली किंवा असाच काहीतरी असणार. मामांना सांगू उद्या येते, असं मनाशी म्हणत राणीने फोन उचलला....!

‘बाय, पाड्यावर जन्याची कुत्र्यांनी म्हैस खाल्ली असं म्हणत मामा रडू लागले. राणी चपापली, कुत्रा की बिबट्याने. अगं कुत्र्यांनी.’ राणीच्या मनात शंकेची पाल चपापली. फोन कानाला लावत, अंगात रेनकोट घालत राणी तशीच निघाली कारण, जर मामांना नुकसान भरपाई मिळवून द्यायची असेल तर आणि म्हैस कुत्र्यांनी खाल्ली असेल तर त्यासाठी राणीकडे अवघे काही तास शिल्लक होते. आता वरच्या, प्रसंगातील कुत्रे म्हणजे साधेसुधे कुत्रे नाहीत तर रानकुत्रा, कोलसुंदे, कोळशिंदे, कोळीसन, कोळसून अशा विविध स्थानिक नावाने ओळखला जाणारा आणि कळपाने राहणारा जंगली कुत्रा. हे साधारण पाच, आठ, दहा, पंधरा अशा संख्येत कळपाने राहणारे आणि अत्यंत हुशार शिकारी म्हणून ते जगभर गणले जातात. दिसायला साधारण कोल्ह्याचे छोटे रूप, तांबूस रंग, जगभरात फक्त अडीच हजार ब्रीड तयार करू शकतील एवढेच ढोल शिल्लक आहेत, असे जागतिक आययुसीएन या संस्थेने दिला आहे. त्यामुळे हे कुत्रे संकटग्रस्त प्रजातीमध्ये मोडतात.

Konkan News
Kokan News : मुरली आणि सालींदरांचे काटे

सर्वात महत्वाचे जैविक साखळीमधील अत्यंत महत्वाची जबाबदारी हे कुत्रे वाघ, सिंह, बिबटे, चित्ते यांच्या नंतर आपल्या खांद्यावर घेतात आणि त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक जबाबदारी नैसर्गिकरित्या ते निभावतात. राणी रात्री अकरा वाजता भरपावसात निघाली. जर शिकार रानकुत्र्यांनी केली असेल तर ती जास्तीत जास्त काही तास पाहायला मिळेल आणि नुकसान भरपाई मिळवून द्यायची असेल तर ७२ तासाच्या आत जवळ मालक उभा असलेले विविध कोनातून फोटो लागतात तरच भरपाई मिळते. राणीने बाईक काढली, रेनकोट, एक विजेरी, मोबाईल प्लास्टिक बॅगेत टाकून राणी निघाली. सोबत सदफला घेतले होते. सदफ राणीसारखाच जंगलखोऱ्यात धनगर पाड्यात जंगल संवर्धन करत फिरणारा राणीचा सहकारी. बाईक घाटाला लावली. मामा वाट पाहतच होते. चिखलातून आणि पाटातून वाट काढत किल स्पॉटपर्यंत ते पोचले. जमेल तसे फोटो काढले नंतर दुसऱ्या दिवशी सर्व कागदपत्रे तयार केली आणि मामांना चिपळूण फोरेस्ट ऑफिसमध्ये नुकसान भरपाई अर्ज करायला पाठवून दिले; पण विषय एवढ्यावरच थांबला नाही.

राणीच्या मनात ढोलचे ढोल वाजू लागले होते. तिने माहिती मिळवायला सुरू केली तर २०२० ते २४ या चार वर्षात नोंद माहिती, वृत्तपत्र, ऐकीव यातून असे लक्षात आले की, हे ढोल पूर्वी जे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि चांदोली अभयारण्य येथे होते तेथून कदाचित आता कोकणच्या उताराकडे म्हणजे सह्याद्रीच्या उताराकडे दिसू लगले असावेत, अशी पुष्टी मिळाली. मागे सिंधुदुर्गमध्ये विहिरीत कोल्हा समजून एक ढोल पकडला गेला होता तर रायगडमध्ये एका वाईल्ड फोटोग्राफी करणाऱ्या दाम्पत्यांना स्पॉट झाले होते आणि सर्वात महत्वाचे राणीने गेल्या वर्षभरात जवळ जवळ पंधराजणांना नुकसान भरपाई धनगर पाड्यात मिळवून दिली, ही नोंद प्रकरणे आहेत. राणीने आता या विषयावरच पीएचडी करायचे ठरवले आहे कारण, जर हे नैसर्गिक शिफ्ट होत असतील तर कदाचित जंगलच्या प्रवेशद्वारावर जे धनगर पाडे आहेत ते शिफ्ट होतील. खरेतर, हे धनगर पाडे जंगलचे रक्षक आहेत. पूर्वी कोकणात वाघाच्या शिकारी किंवा डुकराच्या शिकारी चालत; पण या धनगर पाड्यात आता वाघाबद्दल मैत्रीची भावना जागवावी या हेतूने राणी आणि सदफने वाघबारस हा कोकणातील पारंपरिक सण धनगरपाड्यात साजरा करायला सुरवात केली आणि दोघेही वाघामुळे किंवा जंगली कारणांमुळे होणारे नुकसान भरपाई मिळावी म्हणून मध्यस्थ म्हणून संस्थेमार्फत मदत करू लागले. त्याचा फायदा असा झाला आज वाघाच्या शिकारी नकळत कमी झाल्या.

Konkan News
Kokan News: अशमयुगीन मानवी अस्तित्वांच्या खुणांचा शोध

हे धनगरपाडे, कोण अनोळखी माणसे दिसून आली की, लगेच फॉरेस्ट कार्यालयात कळवू लागली. त्यामुळे हे धनगरपाडे जिवंत असणे, जंगल जिवंत असण्याचे महत्वाचे कारण आहे. त्यासाठी या ढोल म्हणजेच जंगली कुत्र्यांवर विशेष अभ्यास होणे आवश्यक आहे. ते शिफ्ट का होत आहेत? त्यांच्या सवई बदलत आहेत का? त्यांना कोणते राहणीमान पसंत पडत आहे? एका महिन्यात किती शिकार होत आहे? कारण, हे ढोल प्राणी जगले पाहिजेत. अन्नसाखळीमधील अत्यंत महत्वाचे घटक आहेत. कोकणी शेतकऱ्याला डुक्कर, नीलगायी, भेकर, सांबर या प्राण्यांपासून नुकसान होते; पण त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचे काम निसर्गाने अगोदरच बिबटे आणि या ढोल, कोल्हे, लांडगे यासारख्या मांसाहारी प्राण्यांद्वारे केले आहे.

विविध देशात संख्या वाढली की, मारून टाकल्याची उदाहरणे पण आहेत; पण कुठलाही निर्णय हा विविध कोनातून विचार करूनच घ्यावा लागतो. आता माकडे हे बीज वाहून नेणारे उत्तम उदाहरण आहे. जंगल जे वाढते त्यात माकडाचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. त्याने खाऊन टाकलेल्या बिया आणि विष्ठेतील बिया विविध ठिकाणी रूजू लागतात. डुकराच्या विष्ठेतून विविध कंदमुळे रूजून येतात त्यामुळे निसर्ग चहुबाजूंनी जिवंत असतो तसे हे रानकुत्रे, सांबर, निलगाई, भेकर यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. त्यांच्यावर संशोधन करणे आवश्यक आहे. त्यासाठी राणीला मॅपिगं करायला जीपीएस उपकरणे, कॅमेरे ट्रॅप याची गरज आहे. ती तिच्यापरीने वनविभागाच्या सहकार्याने करत आहे; पण विविध अडचणी असतात. उदाहरणार्थ, ढोलची विष्ठा तपासायची असेल तर सरकारची परवानगी लागते.

अर्थात, राणीला महाराष्ट्र सरकारचे आणि केंद्र सरकाचे वनखाते विविध परवानग्या द्यायला मदत करते. कारण, राणी आणि सदफ या धनगरपाड्याच्या टचमध्ये असल्यामुळे त्या विविध कार्यात योजना राबवण्यात त्यांना मदत होते; पण एखाद्या विषयात दूरगामी परिणाम अभ्यासायचे असतील तर पूर्ण वैज्ञानिक संशोधन होणे आवश्यक आहे. राणी एकाचवेळी अलिबागपासून सिंधुदुर्गपर्यंत पोहचू शकत नाही. त्यासाठी टीम तयार करणे, कोळशिंदे यांच्या हालचाली टिपणे यासाठी ती एकटी लढत आहे. अनगड कोकणद्वारे हा विषय मांडता आला कारण, कोकण अनगड ठेवायचे असेल तर हे संशोधन हा महत्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे.

(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.