पत्तनच्या आदेशानंतरही मिऱ्या बंधाऱ्याचे काम ठप्प

पत्तनच्या आदेशानंतरही मिऱ्या बंधाऱ्याचे काम ठप्प

Published on

२७७७५

मिऱ्या बंधाऱ्याचे काम ठप्पच
‘पत्तन’चा आदेश धाब्यावर ः १२०० मीटर शिल्लक ः ठेकेदाराकडून चालढकल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : मिऱ्या बंधाऱ्याच्या अपूर्ण राहिलेल्या १२०० मीटरच्या टप्प्याचे काम अजूनही ठप्प आहे. पत्तन विभागाने काम सुरू करण्याचे आदेश तीन आठवड्यांपूर्वी देऊनही ठेकेदार काम सुरू करण्यास चालढकल करत असल्याचे पत्तन विभागाने सांगितले. या पावसाळ्यात बंधाऱ्याचा काही भाग वाहून गेला आहे. पुढच्या पावसाळ्यापर्यंत काम न झाल्यास मात्र जयहिंद चौक ते पांढरा समुद्र भागाला समुद्राच्या उधाणाचा धोका निर्माण होणार आहे.
मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. सुमारे साडेतीन किमीचा हा बंधारा असून, त्यापैकी अडीचशे मीटरचे काम शिल्लक आहे. पत्तन विभागाने केलेल्या सर्व्हेमधील सात डेंजरझोनपैकी एक वगळता सर्व टप्प्यांचे काम झाले आहे; परंतु पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतचा टप्पा शिल्लक आहे. या टप्प्याचे काम करताना यंत्रसामग्रीची ने-आण करण्यासाठी लागणाऱ्या जागेवरून वाद निर्माण झाला होता. जागामालकाने याला विरोध केल्यामुळे काम रखडले होते. हे काम व्हावे यासाठी स्थानिकांनी पत्तन विभागाला निवेदनही दिले; परंतु पावसाळा सुरू झाला आणि काम थांबले होते.
पावसाळा संपल्यामुळे पत्तन विभागाने तीन आठवड्यांपूर्वी ठेकेदाराची बैठक घेतली. लवकरात लवकर उर्वरित टप्प्याचे आणि बंधाऱ्याच्या टॉपचे काम सुरू करण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीला दिल्या होत्या. त्यानुसार आठवडाभरात हे काम सुरू होईल, असे पत्तन विभागाने सांगितले. गेले तीन आठवडे झाले तरी अजून मुहूर्त मिळालेला नाही.
मिऱ्या बंधाऱ्याच्या अपूर्ण राहिलेल्या सुमारे अडीचशे मीटरच्या टप्प्याच्या कामाचा मुहूर्त हुकला आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे या धोकादायक टप्प्याचे काम आता पावसाळ्यानंतर होणार आहे; परंतु उधाणाच्या भरतीमुळे काही धोका झाल्यास त्याची तयारी आम्ही ठेवल्याची माहिती पत्तन विभागाने दिली. त्यामुळे पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंत किनाऱ्याची धूप होण्याचा धोका कायम आहे.

बंधाऱ्याचा काही भाग गेला वाहून
या पावसाळ्यात जयहिंद चौकासमोरील संरक्षित केलेल्या बंधाऱ्याचा काही भाग समुद्राच्या आजस्र लाटांनी गिळंकृत केल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे उधाणाची भरती आणि भविष्यात पावसाळ्यापूर्वी या बंधाऱ्याचे काम सुरू होणे आवश्यक आहे अन्यथा वाहून गेलेल्या बंधाऱ्याच्या ठिकाणी मोठे भगदाड पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.