Raigad News : पर्यारण रक्षणासाठी दीड कोटीचा आराखडा; महाडमध्ये विकासकामांनाही गती
Mahad News : पर्यावरण रक्षणासाठी राज्यभर ‘माझी वसुंधरा’ अभियान राज्यभर राबवले जात असून महाड नगरपालिकेने यासाठी पुढाकार घेतला आहे. अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणासाठी दीड कोटींचा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. यामुळे पुढील काळात शहरात पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम राबवले जाणार असून विकासकामे सुरू करण्यात येणार आहेत. (1.5 crore scheme for environment protection speeding up development work in Mahad)
‘माझी वसुंधरा’ अभियानातून जमीन, वायू, पाणी, ऊर्जा आणि आकाश या पंचमहाभुतांवर लक्ष केंद्रित करून त्यात सुधारणा घडवण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही विविध स्तरावर भरघोस बक्षिसांची स्पर्धा आयोजित करून स्थानिक स्वराज्य संस्थांना अभियानामध्ये सहभागी करून घेतले आहे. महाड नगरपालिका क्षेत्रामध्ये वृक्षारोपण, जनजागृती, स्वच्छता अभियान व विविध उपक्रम राबवले जात आहेत.
याच अभियानामुळे महाड नगरपालिकेने सहभाग घेत २०२३ मध्ये कोकण विभागात अव्वल क्रमांक प्राप्त करत दीड कोटीचे बक्षीस मिळविले आहे. बक्षिसाच्या रकमेतून स्वच्छता विषयक कामे करून घेण्यासाठी नगरपालिकेने सविस्तर प्रकल्प आराखडाही तयार केला आहे.
नगरपालिकेच्या तसेच इतर मोकळ्या जागेमध्ये वृक्ष लागवड करणे, शहरामध्ये वनराई तयार करणे, मियावाकी वने निर्माण करणे, ऊर्जा बचत, सौर ऊर्जेसाठी प्रकल्प राबवणे इत्यादी कामे यामधून केली जाणार आहेत.
सध्या महाड नगरपालिकेची इमारत तसेच बायोगॅस प्रकल्प या ठिकाणी सौर ऊर्जा व बायोगॅस ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जात आहे. त्याचा वापर नगरपालिका कार्यालयामध्ये केला जात आहे. यामुळे नगरपालिकेची मोठ्या प्रमाणात विजेची बचत होत आहे.
आता नगरपालिका क्षेत्रातील विविध पाणीपुरवठा योजनांमध्येही सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे. नगरपालिका आपल्या स्वतःच्या मालकीच्या इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार आहे. तसेच जमिनीत पाणी झिरपण्यासाठी पर्क्युलेशन पीटही तयार केले जाणार आहे.
महाड नगरपालिकेकडून शहरातील चवदार तळे व इतर परिसरामधील पथदिवेही सौरऊर्जेवर करण्यात आले आहेत ते चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. नजीकच्या काळामध्ये माझी वसुंधरा अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जा व पारंपरिक ऊर्जा स्रोत तसेच स्वच्छता अभियानावर विशेष भर दिला जाणार आहे.
- परेश साळवी, अभियंता, स्वच्छता विभाग, महाड
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.