Raigad News : महाडमध्ये वीर सुतारवाडीतील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची भेट
Mahad News : शाळेतील जे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा आणि नवोदय परीक्षेमध्ये पात्र ठरतील, अशा विद्यार्थ्यांना विमानाने दिल्लीची सहल घडवू, असा शब्द शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिला होता. परीक्षेच्या निकाल लागल्यावर त्यांनी आपल्या वीर सुतारवाडी या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना विमानाने दिल्लीची सैर घडवून आणली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये नेहमी पुढे राहावे हा उद्देश सहलीमागे होता. महाड तालुक्यातील वीर सुतारवाडी या ग्रामीण भागामध्ये असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक संभाजी खोत नेहमीच विविध उपक्रम राबवतात.
जागतिक पातळीवरील भविष्यवेधी शिक्षण घेणारे विद्यार्थी घडावेत, यासाठी प्राथमिक शाळेतच पाया रचला जातो, यासाठी शाळांमध्ये आव्हानात्मक उपक्रम राबवले जातात. स्पर्धात्मक परीक्षांसाठी मुलांकडून तयारी करून घेणे, हा असाच एक उपक्रम आहे.
शाळेमध्ये दुसरीपासूनच स्पर्धात्मक परीक्षांसाठी मुलांना तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. त्यामुळे दरवर्षी या शाळेतील अनेक मुले शिष्यवृत्ती परीक्षा तसेच नवोदय परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात. या उपक्रमामध्ये ग्रामीण भागातील शाळेचा पटही वाढत आहे.
जी मुले शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेस पात्र ठरतील, त्या विद्यार्थ्यांना विमानाने प्रवास घडवू, हा शब्द शिक्षक संभाजी खोत यांनी विद्यार्थ्यांना दिला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची ओढ आणि चिकाटी निर्माण केली. काही मुलांनी दिवसरात्र अभ्यास करून शिष्यवृत्ती मिळवली तर काहींनी नवोदय परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले.
शाळेतील ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले, अशा सहा विद्यार्थ्यांना मुंबई, आग्रा, दिल्ली या ठिकाणी अविस्मरणीय सहल घडवून संभाजी खोत यांनी वचनपूर्ती केली. सहलीदरम्यान इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गणित, विज्ञान, हिंदी, इंग्रजी या विषयांशी समन्वय साधला गेल्याने विद्यार्थ्यांच्या कुतूहलाचे, शंकेचे निरसनही सहजरीत्या झाले.
परतीच्या प्रवासात दिल्ली ते मुंबई हा जीवनातील पहिला विमान प्रवास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केला. या सहलीसाठी स्वतः संभाजी खोत, विद्यार्थ्यांचे पालक, त्यासोबत सुतारवाडी गावच्या सरपंच संध्या उमासरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांत गोठल,
अलिबागचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण नावले, गटशिक्षणाधिकारी सुनीता पालकर यांचे दिल्लीमधील मित्र सतीश जाधव यांचे सहकार्य लाभले. या सर्वांच्या आर्थिक तसेच इतर योगदानामुळे मुलांना सहलीचा आनंद घेता आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थी बुद्धिमत्तेमध्ये सरस असतात. ते कुठल्या क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतात, त्यांना केवळ मार्गदर्शनाची गरज आहे. सहलीच्या माध्यमातून आम्ही त्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त केले.
- संभाजी खोत, शिक्षक, वीर सुतारवाडी शाळा
प्रेक्षणिक स्थळांना भेटी
सहलीमध्ये मुलांनी ताजमहल, लाल किल्ला, बेबी ताज (आग्रा), राष्ट्रपती म्युझियम, राष्ट्रपती भवन, संसद भवन, कुतुबमिनार, लोटस टेम्पल, हुमायून टॉम्ब, इंडिया गेट, कर्तव्य पथ, वॉर म्युझियम, प्रधानमंत्री म्युझियम, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (दिल्ली), छत्रपती शिवाजी टर्मिनस (मुंबई) गेटवे ऑफ इंडिया इत्यादी स्थळे पाहिली. महाडमधील वीर सुतारवाडीसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विमान, कार, मेट्रो, ट्रेन, डबल डेकर बस, टॅक्सी आदी वैविध्यपूर्ण वाहनांनी प्रवास केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.