महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड नव्हे; महाराष्ट्र सागरी मंडळ वापरा

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड नव्हे; महाराष्ट्र सागरी मंडळ वापरा

Published on

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड नव्हे
‘महाराष्ट्र सागरी मंडळ’च
नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डऐवजी आता ‘महाराष्ट्र सागरी मंडळ’ या मराठी शब्दांचा काटेकोरपणे वापर करावा, असे आदेश सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी आज दिले. गेल्या महिन्यात डॉ. गुरसळ यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेताच कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणण्याच्या कामाला सुरुवात केली. कर्मचाऱ्यांनी गणवेशातच कार्यालयात यायला पाहिजे, अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली आहे.
धूळ खात पडलेल्या फायली, अस्ताव्यस्त कागदपत्रे, इंग्रजीचा वाढता वापर आणि बेशिस्त कारभार असे महाराष्ट्र सागरी मंडळातील वातावरण बदलण्याचा संकल्प रसळ यांनी केला आहे. यापुढे मंडळाच्या सर्व शासकीय पत्रव्यवहारात ‘महाराष्ट्र सागरी मंडळ’ असाच उल्लेख करावा, असे लेखी आदेशच काढले आहेत.
दुसऱ्यांदा आदेश
१९९६ स्वतंत्र बंदर विभागाची स्थापना झाली, तेव्हा शासकीय अधिसूचनेत इंग्रजी ‘महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड’ आणि मराठी ‘महाराष्ट्र सागरी मंडळ’ असे होते. मात्र मंडळाच्या कामकाजात ‘महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड’ वापरले जायचे. २०१७ मध्ये तत्कालीन सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे आले. त्यांनी ‘महाराष्ट्र सागरी मंडळ’ उल्लेख करण्याचे आदेश दिले; मात्र त्यांची बदली होताच या आदेशाला हरताळ फासला गेला.
नव्या अधिकाऱ्यांची शिस्तप्रियता पाहून कर्मचारी धास्तावले आहेत. आतापर्यंत कार्यालयात गणवेशात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या नगण्य होती. गणवेश घातलाच नसल्यामुळे अनेकांवर नव्याने गणवेश शिवून घेण्याची परिस्थिती ओढावली आहे.

‘महाराष्ट्र सागरी मंडळा’च्या पत्रव्यवहारात आतापर्यंत इंग्रजीतील ‘महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड’ असा उल्लेख होत होता. यापुढे ‘महाराष्ट्र सागरी मंडळ’ असाच उल्लेख करण्याचे आदेश दिले आहेत. शासकीय कामकाजात मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा, हा उद्देश या मागे आहे.
- डॉ. माणिक गुरसळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.