श्रीवर्धन- म्हसळ्यात वीज मीटरचा तुटवडा
श्रीवर्धन- म्हसळ्यात वीज मीटरचा तुटवडाSakal

Raigad News : श्रीवर्धन- म्हसळ्यात वीज मीटरचा तुटवडा, ग्राहकांना मनस्‍ताप; अतिरिक्‍त बिलाचा भुर्दंड

वीज वितरण कंपनीकडे वीज मीटर नसल्याने नवीन कनेक्शन देण्याची आणि मीटर बदलण्याची कामे रखडली आहेत.
Published on

श्रीवर्धन : वीज वितरण कंपनीकडे वीज मीटर नसल्याने नवीन कनेक्शन देण्याची आणि मीटर बदलण्याची कामे रखडली आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून वीज मीटरचा तुटवडा निर्माण झाला असून आणखी किती महिन्‍यांनी मीटरची उपलब्धता होईल, याबाबत अधिकाऱ्यांनादेखील निश्‍चित माहिती नसल्‍याने ग्राहकांना मनस्‍ताप होत आहे.

ग्राहकांनी चौकशी केल्यास मीटर नसल्याचे सांगत तुम्हीच खरेदी करा, अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यासह जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून वीज मीटरचा तुटवडा भासत असल्यामुळे महावितरणाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

वीज मीटर वेळेवर मिळत नसल्याने अनेकांना त्यामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ज्या नागरिकांनी नवीन घरे बांधली आहेत, त्यांना वीज मीटरअभावी वीज मिळण्यास अडचण येत आहे. तर ज्या ग्राहकांचे मीटर नादुरुस्त आहे त्यांना मीटर बदलून मिळत नसल्यामुळे देयकांतील जास्त रकमेचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. वीज ग्राहकांचे मीटर जळाले तरी नवीन बसविण्याकरिता मीटर उपलब्ध नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

सरासरीचा आर्थिक भुर्दंड ग्राहकालाच

श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी खराब मीटर झाले आहेत. अनेकांनी महावितरणच्या कार्यालयात अर्जदेखील केले. मात्र, कित्येक महिने नवीन मीटरच आले नाहीत. शिवाय महावितरणचे अधिकारी सरासरीच्या नावाखाली वाटेल तेवढे युनिट टाकून वीजबिले वितरित करत आहेत. वास्तविक वापराच्या कित्येक पटीने वीजबिले आल्याने ग्रामीण ग्राहकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे.

खराब मीटर बदलण्यासाठी श्रीवर्धन महावितरण कार्यालयाकडे अर्ज केला. मात्र, कित्येक महिन्यांपासून अद्यापपर्यंत मीटर मिळालेला नाही. तुम्ही परस्पर खरेदी करा, असे सांगण्यात येते.
- बाळाराम नाक्ती, वीज ग्राहक


सध्या आम्ही नवीन वीज जोडणीसाठी मीटर देतो. मात्र, खराब मीटर बदलण्यासाठी मीटर उपलब्ध नाहीत. ग्राहकाने स्वतःने खरेदी केल्यास मीटरची रक्कम महावितरण देते.
- विजयकुमार बोरसे, उपविभागीय अभियंता, महावितरण श्रीवर्धन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.