Defense Expo : देशाची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन ; डिफेन्स एक्स्पो’चे उद्घाटन
पिंपरी : आपला देश शस्त्रसामग्रीसाठी परदेशावर अवलंबून होता. मात्र, आज जगातील उत्तम शस्त्रसामग्री देशात निर्माण होत आहे. यामुळे देशाचे लाखो कोटी रुपये वाचले आहेत आणि आपली वाटचाल आत्मनिर्भरतेकडे सुरू आहे. हीच क्षमता देशात निर्माण करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’वर भर देण्यात आला आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. २४) पिंपरी चिंचवडमध्ये व्यक्त केला.
मोशी येथील इंटरनॅशनल एक्झिबिशन ॲण्ड कन्व्हेन्शन सेंटर येथील ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग, एअर मार्शल विभास पांडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश शिंदे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, निबे लिमिटेडचे गणेश निबे, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, महापालिका आयुक्त शेखर सिंह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘‘पुण्यात पहिला ‘डिफेन्स एक्स्पो’ होत आहे, त्याबद्दल अत्यंत आनंद होत आहे. महाराष्ट्रात २०१७ मध्ये एअरोस्पेस आणि डिफेन्स धोरण तयार केले आणि या क्षेत्राला चालना देण्यासाठी १ हजार कोटीचा निधी तयार केला. त्यातून ६०० ‘एमएसएमई’ (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) तयार झाल्या आहेत. केवळ ३०० कोटीतून १२ ते १५ हजार कोटींचे मूल्य या उद्योग संस्थांनी तयार केले. विमान आणि युद्धनौकेसाठी लागणारा ३० टक्के दारूगोळा भारतात तयार होत आहे. महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल आणि या क्षेत्रातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल.’’
पुणे महत्त्वाचे केंद्र
पुणे हे भारताच्या सामरिक शक्तीच्यादृष्टीने महत्त्वाचे केंद्र असून, गेल्या अनेक वर्षात संरक्षण उत्पादनाची चांगली व्यवस्था पुण्यात निर्माण झाली आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रणी आहे. देशाच्या वायुसेनेचे मेंटेनन्स कमांड, लष्कराचे दक्षिण कमांड, नौदलाचे मुंबई डॉकयार्ड महाराष्ट्रात आहे. नाशिकमध्ये हिंदुस्थान एअरोनॉटीकल्समध्ये तेजस आणि सुखोई अशी लढाऊ विमाने तयार होतात. माझगाव डॉकमध्ये जहाज बांधणीची आधुनिक व्यवस्था आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्ससारखी संरक्षण क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानयुक्त काम करणारी यंत्रणा आपल्याकडे आहे. पुणे तंत्रज्ञानाची राजधानी आहे. अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग’ ही मोठी संधी असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘अतिशय भव्य प्रकारचे हे प्रदर्शन असून, अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हे उपयुक्त आहे. संरक्षण उद्योग हा देशात नव्याने विकसित होत आहे. नव्या शैक्षणिक धोरणात उद्योगांची गरज ओळखून अभ्यासक्रम विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.’’ उद्योगमंत्री सामंत म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या ‘एमएसएमई’ने संरक्षण क्षेत्रात ठसा उमटवला आहे. भविष्यात नागपूर, शिर्डी, पुणे आणि रत्नागिरी ‘डिफेन्स क्लस्टर’ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात येईल. संरक्षण क्षेत्रातील उद्योगांच्या मागणीप्रमाणे एक हजार एकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल.’’
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे मनोगत व्यक्त केले. प्रधान सचिव कांबळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मॅक्स एअरोस्पेस ॲण्ड एव्हिएशन प्रा. लि., एसबीएल एनर्जी लिमिटेड, निबे लिमिटेड आणि एमआयएल आणि महाराष्ट्र शासन यांच्यात संरक्षण उत्पादनाशी संबंधित विविध सामंजस्य कराराचे आदान प्रदान करण्यात आले.
हवाई दलप्रमुखांची प्रदर्शनाला भेट
पुणे प्रदर्शनाला हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी भेट दिली. वायुदलाच्या गरजांच्या अनुषंगाने सहभागी उद्योगांशी त्यांनी संवाद साधला. हवाई दलाकडून प्रदर्शनात आकाश आणि समर क्षेपणास्त्र प्रणाली, याशिवाय नवीन पिढीचे कमी वजनाचे प्रगत हेलिकॉप्टर एमके-चार, कमी वजनाचे लढाऊ हेलिकॉप्टर मांडण्यात आले. तरुणांना भारतीय वायुसेनेकडे आकर्षित करण्याकरिता विविध स्टॉलही उभारले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.