बघा कोकण, जगा कोकण
संगमेश्वर : सुंदर चित्रे तर नेहमीच पाहण्यात येतात; मात्र येथील प्रत्येक चित्राचा-शिल्पाचा बाजच वेगळा आहे. त्यातील कल्पकता आम्हाला भावली. चित्रांचे विषय वेगळे असून ते उत्तमरित्या हाताळले आहेत. ज्या कष्टातून विद्यार्थ्यांनी कलादालनाची निर्मिती केली आहे, त्याला तोड नाही. अनेक गोष्टींच्या अभावातून मार्ग काढून येथे कलेची केलेली साधना नजरेला दिसून येत असल्याने या साधनेला आमचा सलाम. प्रत्येक चित्रामागे इतिहास, कथा आणि प्रयत्नांची पराकाष्ठा ऐकून तर आम्ही भारावून गेलो, अशी भावना पुणे येथील पर्यटक भारती केळकर यांनी आज ता. २५ रोजी संगमेश्वर येथील पैसाफंडच्या कलादालनाला भेट दिल्यानंतर व्यक्त केली.
इतिहासतज्ञ आणि प्रसिद्ध लेखक डॉ. आशुतोष बापट यांच्यासमवेत ''बघा कोकण, जगा कोकण'' या पर्यटन उपक्रमांतर्गत तीन दिवस संगमेश्वर तालुक्यातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी आलेल्या मुंबई-पुणे येथील पर्यटकांनी आज पैसाफंडच्या कलादालनाला भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत पर्यटक मंडळींसह राई पर्यटनस्थळाचे अमोल लोध, ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत आदी उपस्थित होते. प्रशालेच्या कला विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या ''कलासाधना'' या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे पर्यटकांनी कौतुक केले.
ते व्रत स्वागतार्ह
कलावर्ग आणि कलादालन हा गेल्या दहा वर्षातील यशस्वी प्रवासही या वेळी पर्यटक मंडळींनी जाणून घेतला. लॉकडाउनच्या १६ महिन्यांच्या कालावधीत माजी विद्यार्थ्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून परिसराचा चेहरामोहरा तर बदललाच, शिवाय एकापेक्षा एक शिल्पे आणि चित्रे पाहण्यासाठी उपलब्ध करून देऊन कलारसिक निर्माण करण्याचे जे व्रत स्वीकारले आहे, ते स्वागतार्ह असल्याचे मत पर्यटन संदीप कुंटे यांनी व्यक्त केले.
एक अनमोल ठेवा..
संगमेश्वर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार-शिल्पकार (कै.) अरुण पाथरे यांची या गॅलरीत असणारी शिल्पे म्हणजे एक अनमोल ठेवा असल्याचे मत या वेळी पर्यटकांनी व्यक्त केले.
कसबा येथील ऐतिहासिक स्थळे आणि शिल्पकलेचा आविष्कार असणारी मंदिरे चित्रबद्ध करण्यासाठी आलेले आम्ही युवा कलाकार जवळपास दीड तास पैसाफंड कलादालनात रमलो. कला विभागाचे विविध उपक्रम पाहून आज आम्ही येथे येऊन नव्याने काही शिकलो.
- प्रणय फराटे, युवा चित्रकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.