राजापूर - "वाचाल तर वाचाल' या उक्तीप्रमाणे माणूस विविधांगी वाचनाने घडतो. मात्र सध्याच्या दृक-श्राव्य माध्यमासह सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे वाचनापासून नवी पिढी दूर जात आहे. दुरावलेल्या या पिढीला पुन्हा वाचन प्रवाहामध्ये आणून वाचन संस्कृती रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयातील रद्दीतील ग्रंथालय करीत आहे. प्रशालेतील उपक्रमशील शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी आई कै. सावित्री केरू गोंडाळ यांच्या स्मरणार्थ हे ग्रंथालय सुरू केले आहे.
गारगोटी येथील कर्मवीर हिरे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राजन गवस यांच्या सूचनेनुसार विविधांगी वर्तमानपत्रांमधील अग्रलेखांचा संग्रह गोंडाळ यांनी केला. हा उपक्रम त्यांनी पुढेही कायम ठेवला. या कात्रणांकडे रद्दी म्हणून पाहिले जात असले तरी ही रद्दी नव्या पिढीच्या सर्वांगीण जडणघडणीसाठी उपयुक्त ठरविण्याच्या उद्देशाने गोंडाळ यांनी जुवाठी प्रशालेत रद्दीतील ग्रंथालय सुरू केले आहे.
साहित्याच्या वाचनातील टिप्पणी काढून त्याची नोंद करणे, विविधांगी साहित्य लेखनाची सवय व्हावी म्हणून "विद्यार्थी डायरी' हा उपक्रम राबविला आहे. प्रशालेने वाचन कट्टा हा उपक्रम राबविला आहे. विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करण्यासह पुस्तक परीक्षण करणाऱ्या विद्यार्थ्याला "उत्तम वाचक पुरस्कार' देवून गौरविण्यात येते. त्यासाठी बक्षीसही दिले जाते. प्रशालेतील या वाचन उपक्रमामध्ये सातत्य ठेवण्यासाठी गोंडाळ यांच्यासह प्रशालेचे मुख्याध्यापक वासुदेव गोवळकर, दीपक सूर्यवंशी, राजेंद्र मयेकर, वासुदेव भिवंदे, सुरेश गोसावी आणि विद्यार्थी प्रयत्नशील आहेत.
विद्यार्थी देतात वाढदिवशी ग्रंथभेट
प्रशालेतील विद्यार्थी वाढदिवसादिवशी चॉकलेट वा अन्य गोड पदार्थ देण्याऐवजी ग्रंथालयाला एक पुस्तक भेट देतो. विद्यार्थी आणि दात्यांनी दिलेली पुस्तके मिळून ग्रंथालयामध्ये वर्षभरात आठशेहून अधिक ग्रंथसंपदा झाली आहे.
प्रत्येक वर्गात ग्रंथालय
प्रशालेच्या प्रत्येक वर्गामध्ये ग्रंथालय उभारण्यात आले आहे. त्यामध्ये दैनंदिन अभ्यासासाठी लागणाऱ्या पुस्तकांसह जनरल नॉलेज वा स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी विविध पुस्तके आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी आणि सुटल्यानंतर पुस्तके सहज वाचता यावी यादृष्टीने हे ग्रंथालय उभारण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.