वैभववाडी : आरोग्याला पोषक; परंतु तरीही नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील अशा ५२ पारंपरिक भातबियाण्यांची बिजोत्पादनाच्या हेतूने दीड एकरामध्ये लागवड करण्यात आली आहे. रानबांबुळी आणि डिगस या दोन गावांतील ६० शेतकऱ्यांच्या शेतात लागवड केलेले हे भातपीक सीडबँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पारंपरिक बियाणे वाचवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण प्रयोग मानला जात आहे.
एकीकडे पारंपरिक आणि सेंिद्रय पद्धतीने पिकविलेल्या तांदुळाला शहरातील ग्राहकांकडून मोठी मागणी येत असून १०० रुपये दराने लाल, काळा तांदूळ ग्राहकांकडून खरेदी केला आहे; परंतु दुसरीकडे पोषणमूल्य असलेली पांरपरिक भातबियाणे नामशेष होण्याच्या मार्गावर होती; मात्र गेल्या काही वर्षांपासून ग्रीकार्ट शेतकरी कंपनी, हुमरमळा कुडाळ, बाएफ पुणे, वसुंधरा संस्था आणि राजीव गांधी आयोग या संस्थांच्या माध्यमातून पारंपरिक भातबियाण्यांचे संकलन, संर्वधन करण्याचे काम सुरू झाले आहे. नामशेष होत चाललेल्या भातबियाण्यांचे संकलन करण्यासोबतच सीड बँक निर्माण करण्याचा मानस या संस्थांचा आहे.
आतापर्यत सिंधुदुर्गासह राज्याच्या विविध भागातील ६० हुन अधिक पारंपरिक बियाण्यांचे संकलन करण्यात आले आहे. बियाणे संकलनासाठी सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते आणि समाजकल्याण विभागाचे उपआयुक्त प्रमोद जाधव यांनी मोठे सहकार्य केले आहे. संकलन केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४५ तर रत्नागिरी जिल्ह्यातील ७ अशा एकूण ५२ भातबियाण्यांची रानबांबुळी आणि डिगस या दोन गावातील ६० शेतकऱ्यांच्या शेतात लागवड केली आहे. यामध्ये ‘वालय’, ‘सोंफया’, ‘बेळा’, ‘पाटणी’, ‘लवेसाळ’, ‘कोथिंबीरी’, ‘सोरटीसह’ विविध बियाण्यांचा समावेश आहे. ९०, ११०, १२० ते १४० दिवसांची ही सर्व बियाणे आहेत. दीड एकरामध्ये लागवड केलेल्या या भातपिकांचा वापर बियाण्यांसाठी करण्यात येणार आहे. सीडबँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सध्या लाल तांदुळ, काळा तांदुळ आणि एकूणच पोषणमूल्य असलेल्या पारंपरिक भातांच्या तांदुळाला शहरात मोठी मागणी आहे. आरोग्याच्या दृष्टीने विविध फायदे असलेल्या तांदुळ सध्या बाजारपेठेत कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. संकलन करताना बाएफ आणि ग्रीकार्टला छोटा बेळासारखी बियाणी उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे येत्या काळात पारंपरिक भातबियाण्यांचे क्षेत्र वाढण्यासाठी मदत होणार आहे. या भातबियाण्यांचे क्षेत्र वाढवुन त्यातुन होणारे उत्पादनाचे मुल्यवर्धनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
‘वालय’ होणार जिल्ह्याचा ब्रँड
कधी काळी ताप, अशक्तपणा आणि विविध आजारपणात वालय,सोंफळा आणि बेळा या जातीच्या तांदुळांची पेज रुग्णांना दिली जात असे. आजारपणात प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी या बियाण्यांचा वापर होत असे.त्यातील वालयभातबियाण्याला सिंधुदुर्ग जिल्हयाचा ब्रॅड बनविण्याचा मानस शेतकरी कपंनी आणि बाएफचा आहे. जिल्हयातील ३९ गावातुन वालय जातीचे नमुने संकलित करून त्याची लागवड करण्यात आली आहे.
लागवड केलेली भातबियाणे
वालय, बेळा, पाटणी, कोथींबीरी, लवेसाळ, विक्रम, करमळी, डामगा, छोटा बेळा, सरवट मुणगा, सोरटी, खारा मुणगा, जांभळा भात, शिर्डी, यलकट, रूची, जाड मुणगा, आंबे मोहर, रत्ना ७, महाडी, बारीक पाटणी, तुर्या, भद्रा, फोंडा लाल, खारल, वरंगळ, खामडी, सरवट, सनाना, दोडत, पाठेरे, सफेद वालय, नवाण, वरगंळ सफेद, राजवेल, सफेद बेळा, घाटी पंकज लाल, घाटी पंकज सफेद, चकहाओ, करहानी, ब्लँक राइस, याशिवाय चार ओळख न पटलेली बियाणे आहेत.
एक नजर
नामशेष होत असलेल्या ६० बियाण्यांचे संकलन
बीज उत्पादन करून शेतकऱ्यांना उपलब्ध करणार
पारंपरिक बीज उत्पादन ज्ञान, बीज साठवणूक, पाक कलाकृतीचे ज्ञान देण्याचा मानस
लाल, काळा याशिवाय पारंपरिक तांदळाला प्रतिकिलो १०० रुपयांपेक्षा दर
कमी उंचीच्या बियाण्यांचा शोध
"शेती करणे प्रत्येकाला शक्य नसले तरी प्रत्येकाने बहुमूल्य असलेल्या बियाण्यांचे संकलन आणि संवर्धनाचे काम करीत असलेल्या संस्थांना मदत केली पाहिजे. आतापर्यंत ३५ भातबियाणे आणि १६ कडधान्यांच्या जाती उपलब्ध करून दिल्या आहेत. काही यशस्वी प्रयोग केले आहेत."
- प्रमोद जाधव, उपआयुक्त समाजकल्याण विभाग
"कोकणातील शेतीचा शाश्वत विकास घडवायचा असल्यास स्थानिक पिके आणि त्यांची मुल्य वर्धित उत्पादने पुढे येणे आवश्यक आहेत. त्याकरीता आपल्याच बियाण्यांची जोपासना व सुधारणा करण्याचे ज्ञान शेतकऱ्यांना दिले गेले पाहिजे. त्याच हेतूने आम्ही हे काम करीत आहोत."
- सचिन चोरगे, प्रकल्प समन्वयक, बाएफ पुणे
"कोकणातील पांरपरिक बियाण्यांचे संवर्धन करण्याची गरज होती.बाएफ आणि विविध संस्थांच्या माध्यमातून आम्ही संकलन आणि संवर्धन करीत आहोत.सीड बँक कायम कार्यरत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत."
- संतोष गावडे, अध्यक्ष-ग्रीकार्ट शेतकरी कंपनी, हुमरमळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.