मंडणगड : वेळासचा स्वयंसहाय्यता समूह महिलांसाठी 'संजीवनी'

व्यावसायिक दृष्टीकोनाने वाटचाल; ५ गुंठ्यावर हळद लागवड, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण
हळद लागवड केली जाते.
हळद लागवड केली जाते.sakal
Updated on

मंडणगड : महिलांच्या कृतिशील सक्रियतेमुळे विविध उत्पादनांची निर्मिती, लागवड व त्याला दिलेली व्यावसायिक दृष्टीकोनाची जोड, यामुळे तालुक्यातील वेळासचा संजीवनी स्वयंसहाय्यता समूह खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक आधार देणारी संजीवनी ठरला आहे. ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबी बनविणारा हा बचत गट तालुक्यात नेहमीच अग्रेसर राहिला आहे.

अकरा महिलांनी एकत्र येवून संजीवनी समूहाची २४ ऑक्टोबर २०१८ ला स्थापना करण्यात आली. मंडणगड येथील दिवाळी फराळ विक्री केंद्रात सहभाग घेत चांगला नफा कमविला. सर्व प्रथम कोकणी मसाला, मालवणी मसाला बनविण्यास सुरवात करीत उडीदाचे पापड, पोह्याचे पापड, तांदूळ फेणी, साबुदाणे फेणी तयार करून विक्रीला सुरवात केली. वेळास कासव उमेद अभियानांतर्गत खाद्य पदार्थ विक्री केंद्र उभारून आंबापोळी, कोकमसाल, कोकम सरबत, फणसपोळी या पदार्थांसह जायफळ, जायपत्री, काळीमिरी या मसाला पिकांची विक्री केली. त्याला पर्यटकांचा प्रतिसाद लाभला.

रत्नागिरी सरसमध्ये सहभागी होत २४ प्रकारच्या पदार्थांची विक्री करीत प्रेरणात्मक अनुभव घेत सातत्य कायम ठेवले. समूहातील पाच महिलांनी कुक्कुटपालन योजनेंतर्गत एक दिवसांचे ५०० पक्षी घेत त्यांचे संगोपन करून बाजारपेठेत विक्रीला पोहचविले. त्यातून आर्थिक फायद्यासोबत अनुभव मिळाला.

हळद लागवड केली जाते.
जालना : कपाशीचा एकाच वेचणीत खराटा

त्यातील तीन महिला कुक्कुटपालनचे प्रशिक्षण घेत चांगला व्यवसाय करीत आहेत. बचत गटाचा व्यवसाय वृद्धिंगत व्हावा व त्यातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, यासाठी उमेदचे अधिकारी रुपेश मर्चंडे, समिधा सापटे यांचे विशेष मार्गदर्शक लाभले. महिला व्यावसायिक शेतीकडे वळल्याने आर्थिक उन्नतीची गणिते मांडताना दिसत आहेत.

पाच गुंठे क्षेत्रावर हळद लागवड

महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने गतवर्षी समूहांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहित केले होते. त्याचाच परिणाम यावर्षी समूह व क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली. विविध कृषी उत्पादने घेणाऱ्या संजीवनी बचत समूहाने यावर्षी पंचायत समितीने राबविलेल्या हळद लागवड उपक्रमांतर्गत सहभाग घेत पाच गुंठे क्षेत्रावर एसके ४ जातीच्या १२५० रोपांची लागवड केली. तीन वेळा मातीचा थर, सेंद्रिय खते, जीवामृत दिल्याने रोपांची वाढ चांगली झाली.

'समुहातील महिलांनी अनेक विक्री केंद्रात सहभागी होत अनुभव घेतला. एकाच उत्पादनावर अवलंबून न राहता, विविध उत्पादने घेत सातत्य ठेवले. व्यावसायिक दृष्टीने वाटचाल सुरू असून सर्व महिला सदस्यांचे कृतिशील सहभाग महत्वाचा ठरतो आहे.'

-विभा दरीपकर, अध्यक्षा, संजीवनी समूह

Related Stories

No stories found.