वाफोली धरणाला गळती, पाईपलाईन फुटली

wafoli dam leakage konkan sindhudurg
wafoli dam leakage konkan sindhudurg
Updated on

बांदा (सिंधुदुर्ग) - वाफोली गावची जीवनदायिनी असणाऱ्या वाफोली धरणाच्या दुरवस्थेकडे लघुपाटबंधारे विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने धरणाला ठिकठिकाणी गळती लागली आहे. गेली 45 वर्षे गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण होऊन फुटल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या गळतीच्या समस्येमुळे धरणात जानेवारीतच अत्यल्प प्रमाणात पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. 

वाफोली गाव व परिसरात हरितक्रांती होण्यासाठी 1975 ला इंडो-जर्मन प्रकल्पाअंतर्गत वाफोली धरणाची निर्मिती करण्यात आली. यासाठी 11 लाख 80 हजार रुपये खर्च करण्यात आला. सुरवातीच्या काळात या धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने वाफोली, विलवडे परिसरात हरितक्रांती झाली. कालांतराने या धरणाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर झाला. 

वाफोली धरणाची लांबी 450 मीटर असून, धरणाची एकूण उंची 18.905 मीटर आहे. सरासरी पर्जन्यमान 4 हजार 330 मि. मी. आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र 1.92 चौ.कि.मी. असून, जलाशयाची पातळी 115 मीटर आहे. धरणाची पातळी 117.50 मीटर आहे. गाळ पातळी 103 मीटर आहे. या धरणातील जलाशयाचा एकूण पाणीसाठा 2.394 द.ल.घ.मी. आहे. एकूण जलनिष्पत्ती 5.68 द. ल. घ. मी. आहे. धरणाच्या कालव्याची लांबी 2.3 किलोमीटर आहे, तर सिंचन क्षेत्र 190 हेक्‍टर आहे. 

उन्हाळ्यात हे धरण पूर्णपणे कोरडे पडत असल्याने वाफोली नळपाणी योजनेवर दरवर्षी याचा विपरीत परिणाम होतो. गेली अनेक वर्षे गळतीमुळे धरणातील 80 टक्के पाणी वाहून जात आहे. यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली नळपाणी योजना व शेती, बागायती धोक्‍यात आली आहे. उन्हाळ्यात या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. पाण्याअभावी या परिसरातील शेती बागायतीही करपून जाते. 

धरण परिसरात वार्षिक सरासरी 170 इंच पाऊस पडत असल्याने वाफोली धरण पावसाळ्यात तुडुंब भरून वाहू लागते, मात्र या धरणाची डागडुजी करण्यात न आल्याने या धरणाला ठिकठिकाणी गळती लागली आहे. परिणामी पाण्याचा साठा योग्य होत नसल्याने उन्हाळ्यात हे धरण पूर्णपणे कोरडे पडते.

धरणाचे पाणी गावाला पुरविण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. याची लांबी 2.23 किलोमीटर (2 हजार 230 मीटर) आहे. ही वहिनी जंगल, झुडपे तसेच शेतकऱ्यांच्या शेती, बागायतीमधून टाकण्यात आली आहे. वहिनी जीर्ण झाल्याने ठिकठिकाणी फुटली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. काही ठिकाणी जलवाहिनी मोठ्या प्रमाणात फुटल्याने जलवाहिनी लगतच्या बागायतींना ओहोळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

जलवाहिनीचे पाणी लगतच्या शेतात घुसत असल्याने कित्येक एकर क्षेत्र पाणथळ झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेती करणेदेखील सोडून दिले आहे. गावातील अकरा वाड्यांसाठी धरणाचे पाणी सोडण्यात येते, मात्र पोटकालव्यात ठिकठिकाणी पाणी वळविण्यासाठी असलेली लोखंडी गेट तुटलेल्या स्थितीत आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या विहिरीचींही दुरवस्था झाली आहे. चार वर्षांपूर्वी विहिरीतील दगड कोसळल्याने पाणी सोडण्यात येणारा मुख्य दरवाजा तुटला होता. कालव्याचे बांधकामदेखील ठिकठिकाणी कोसळले आहे. त्यामुळे भविष्यात कालवा कोसळण्याची शक्‍यता आहे. 

धरणाच्या डागडुजीसाठी लघुपाटबंधारे विभाग लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी धरणाच्या देखभाल व साफसफाईसाठी श्री देवी माऊली पाणीवापर संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेमार्फत दरवर्षी धरणाची साफसफाई करण्यात येते. पाणीवापर संस्थेने वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याने दोन वर्षांपूर्वी जलवाहिनीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. जीर्ण वहिनी बदलून नवीन पाईपलाईन टाकण्याचा प्रस्तावदेखील तयार करण्यात आला; मात्र अद्यापपर्यंत याला मंजुरी न मिळाल्याने प्रशासन धरण कोसळण्याची वाट पाहत असल्याचा आरोप स्थानिकांमधून होत आहे. 

दरम्यान, आज या धरणाच्या गळतीची देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस, डी. बी. वारंग, पाणीवापर संस्थेच्या अध्यक्षा धनश्री गवस, तंटामुक्ती अध्यक्ष मंथन गवस, सोसायटी चेअरमन अनिल गवस, माजी सरपंच उल्हसिनी गवस, मारुती गवस, विनेश गवस यांनी पाहणी केली. धरणाच्या डागडुजीसाठी लघुपाटबंधारे विभागाला निवेदन देण्यात आले. 

दगडांचे ब्लास्टिंग धोकादायक 
वाफोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काळ्या दगडांच्या क्वारी राजरोसपणे सुरू आहेत. शासन नियमानुसार धरण, नदी, तलाव यांच्या पाणलोट क्षेत्रापासून तीस मीटर बाहेर काळ्या दगडांच्या उत्खननास परवानगी देण्यात येते, मात्र स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे व्यावसायिक राजरोसपणे धरणाच्या मुख्य पाणलोट क्षेत्रातच उत्खनन करत आहेत. दगड फोडण्यासाठी ब्लास्टिंग करण्यात येत असल्याने ता स्फोटांची तीव्रता जास्त असते. या स्फोटांमुळे वाफोली धरणाला धोका निर्माण झाला असून, धरणाच्या गळतीसाठी अनधिकृत ब्लास्टिंगच कारणीभूत असल्याचा आरोप पाणीवापर संस्थेचे संचालक डी. बी. वारंग यांनी केला आहे. 

वाफोली धरणाला गळती लागल्याने यासंदर्भात आम्ही पाणीवापर संस्थेच्या वतीने पाटबंधारे विभागाकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र अद्यापपर्यंत कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही. पाटबंधारे विभागाकडून निधी उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात येत आहे. पाणीवापर संस्था ही शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आली आहे. जोपर्यंत पाटबंधारे विभाग संपूर्ण धरणाची डागडुजी करून सुस्थितीत करत नाहीत, तोपर्यंतच पाणीवापर संस्था धरण ताब्यात घेणार नाही. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे व उदासीन धोरणामुळे धरणाची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे भविष्यात प्रशासनाला जाग आणण्यासाठी जलसमाधी जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. भविष्यात धरण कोसळून दुर्घटना घडल्यास याला सर्वस्वी जबाबदार पाटबंधारे विभाग राहणार आहे.'' 
- धनश्री गवस, अध्यक्ष, वाफोली पाणीवापर संस्था.

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.