मंडणगड : भारतातील पश्चिम किनारपट्टीवर येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजातींना सॅटलाईट ट्रान्समीटर लावून त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली आहे. या उपक्रमातील पहिल्या दोन मादी कासवांना हे उपकरण बसवण्यात पथकाला यश आले आहे. कोकण किनारपट्टीवर विणीसाठी येणाऱ्या या सागरी कासवांना या अभ्यासाकरिता हे यंत्र बसवण्यात आले आहे.
कोकणातील वेळास व आंजर्ले येथील दोन मादी कासवांना मध्यरात्री सॅटलाईट ट्रान्समीटर लावून समुद्रात सोडण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रथमच समुद्री कासवांना सॅटलाईट ट्रान्समीटर लावून त्यांचा स्थलांतराचा अभ्यास करण्यात येत आहे. हा अभ्यासप्रकल्प कांदळवन कक्ष, मँग्रोव्ह फाऊंडेशन आणि भारतीय वन्यजीव संस्थान मार्फत (डब्लूआयआय) राबवण्यात आला आहे. दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यादरम्यान ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी कासवे कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात. अरबी समुद्रातील त्यांचा अधिवास आणि स्थलांतर जाणून घेण्यासाठी त्यांना सॅटलाईट ट्रान्समीटर लावण्याचा निर्णय मँग्रोव्ह फाऊंडेशनने घेतला. याअंतर्गत पाच मादी कासवांना सॅटलाईट ट्रान्समीटर लावण्यात येणार आहेत. यामधील दोन कासवांना मंगळवारी मध्यरात्री सॅटलाईट ट्रान्समीटर लावण्यात आले.
मंडणगड तालुक्यातील वेळास किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या ऑलिव्ह रिडले मादी कासवाला डब्लूआयआयचे शास्त्रज्ञ डॉ.आर.सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शना अंतर्गत सॅटलाईट ट्रान्समीटर लावण्यात आले. तिच्या पाठीवर हे ट्रान्समीटर बसवण्यात आले असुन तिला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. पश्चिम किनारपट्टीवर प्रथमच सागरी कासवाला सॅटलाईट ट्रान्समीटर लावण्यात आल्याने तिचे नाव ‘प्रथमा’ ठेवण्यात आले. यावेळी कांदळवन कक्षाचे रत्नागिरी वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पाटील, मँग्रोव्ह फाऊंडेशनचे उपसंचालक डॉ. मानस मांजरेकर, सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे, धनश्री बगाडे, संशोधन समन्वयक मोहन उपाध्ये उपस्थित होते.
याच चमूच्या माध्यमातून दापोली तालुक्यातील आंजर्ले किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या ऑलिव्ह रिडले मादी कासवाला सॅटलाईट ट्रान्समीटर लावण्यात आले. तिचे नामकरण ‘सावनी’ असे करण्यात आले असून तिलाही पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. या कासवांच्या स्थलांतरावर 'डब्लूआयआय'चे संशोधक नजर ठेवून असणार आहेत. सॅटलाईट ट्रान्समीटर लावलेल्या मादी श्वास घेण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर आल्यानंतर सॅटलाईट ट्रान्समीटर हे त्यांच्या स्थानांचे संकेत उपग्रहाला पाठवतील. त्यानंतर संशोधकांना त्यांच्या स्थानांची माहिती मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.