मुंबई-गोवा महामार्गातील तीन टप्प्यांच्या राहिलेल्या कामामध्ये अपूर्ण असलेल्या आणखी दोन पुलांचा खोडा आहे.
रत्नागिरी : रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai-Goa Highway) पूर्ण होण्याच्या कामात आणखी एक खो मिळाला आहे. काँक्रिटीकरण लवकर पूर्ण झाले तरी या मार्गातील ५ फ्लायओव्हर ब्रिज (Flyover Bridge) आहेत. हे काम पूर्ण व्हायला आणखी दीड वर्षे जाणार आहेत. त्यामुळे महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण व्हायला २०२६ उजाडणार आहे. सार्वजनिक बांधकामच्या (Department of Public Works) अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.
चिपळूणच्या फ्लायओव्हरचे काम अर्धवट आहे. यापूर्वी गर्डर कोसळून हे काम थांबले होते. ते काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली १३ वर्षे सुरू आहे; परंतु अजूनही ते पूर्ण झालेले नाही. आरवली ते कांटे हा ३९ किमीचा टप्पा अपूर्ण आहे. आतापर्यंत १८ किमीचे चौपदरीकरण झाले आहे. २१ किमीचे अजून बाकी आहे.
कांटे ते वाकेड या दुसऱ्या टप्प्यात ४९ किमीचे काम आहे. त्यापैकी २९ किमी झाले असून २० किमी शिल्लक आहे. चिपळूण तालुक्यातील ४ किमीचे चौपदरीकरण शिल्लक आहे, असे एकूण ४५ किमीचे चौपदरीकरणाचे काम जिल्ह्यात अपूर्ण आहे. तीन टप्प्यांतील एकूण पाच फ्लाय ओव्हर ब्रिज आहेत. त्यामध्ये चिपळूण, लांजा शहर, पाली बाजारपेठ, हातखंबा, निवळी येथील ओव्हर ब्रिजचा समावेश आहे.
४५ किमीच्या काँक्रिटीकरणाचे काम डिसेंबर पर्यंत होण्याची शक्यता आहे; परंतु फ्लायओव्हरची कामे प्राथमिक स्थरावर आहेत. चिपळूण सोडले, तर उर्वरित फ्लायओव्हरचे पिलर उभारण्याचे कामही सुरू नाही. तोंडावर पावसाळा असल्याने हे काम चार महिने रखडणार आहे. त्यानंतर ते सुरू झाले, तरी पूर्ण व्हायला दीड वर्षे लागेल. ते पूर्ण व्हायला २०२६ उजाडणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मुंबई-गोवा महामार्गातील तीन टप्प्यांच्या राहिलेल्या कामामध्ये अपूर्ण असलेल्या आणखी दोन पुलांचा खोडा आहे. संगमेश्वरमधील महत्त्वाचा पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. बावनदीवरील पुलांचे पिलर पूर्ण झाले आहेत. त्यावर गर्डर चढविण्याचे काम लवकरच केले जाणार आहे. मात्र, त्यावेळी महामार्गावरील वाहतूक बंद करावी लागणार आहे. ती अन्यत्र वळविण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.