महाड : औद्योगिक जिल्हा म्हणून नावारूपाला आलेल्या रायगड जिल्ह्यातील विविध कारखान्यात होणारे जीवघेणे अपघात चिंतेचा विषय बनला आहे. औद्योगिक विकासाबरोबरच एकीकडे रोजगार निर्मिती होत आहे, मात्र दुसरीकडे महाडमधील ब्ल्यू जेट कारखान्यात होरपळून मृत पावलेल्या ११ कामगारांच्या दुर्घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्यात महाड, माणगाव, रोहा, नागोठणे, पाली, खोपोली, रसायनी, पाताळगंगा, तळोजा या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र विकसित झाले आहे. जिल्ह्यांमधील बहुतांशी कंपन्या रासायनिक व औषध निर्माण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आहेत.
यामुळे औद्योगिक सुरक्षेबाबत अधिक सजग असण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत कारखान्यांमध्ये झालेल्या अपघातांवरून कंपनी व्यवस्थापन, केवळ उत्पादन वाढीवर भर देते, कामगारांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. २०२० मध्ये २४ अपघातात १४ जणांनी प्राण गमावले. अनेक छोटे-मोठ्या अपघातांची तर कंपन्यांकडून नोंदही केली जात नाही.
औद्योगिक क्षेत्रात काम करणारे अनेक कामगार सुरक्षा साधनांपासून वंचित आहेत. कंपनी व कामगार ठेकेदार आपल्या फायद्यासाठी कामगारांना पुरेशी सुरक्षा साधने पुरवण्याकडे दुर्लक्ष करतात. कामगारांसाठी हेल्मेट, सेफ्टी बूट, मास्क अशी साधने पुरवणे आवश्यक आहे. अनेक कंपन्यांमध्ये अकुशल व कमी शिकलेले कामगार मोठ्या संख्येने काम करतात.
त्यांनी यंत्रसामुग्रींची योग्यप्रकारे हाताळणी, रसायनांची हाताळणी व त्यांची दाहकता, रासायनिक अभिक्रियांची माहिती, स्फोट होणारी कारणे व स्वतःची सुरक्षिततेबाबत फारसे ज्ञान अवगत नसते.
त्यामुळे कारखान्यात होणाऱ्या स्फोटांत त्यांना जीव गमवावा लागतो. सुशिक्षित कामगारांना जुजबी प्रशिक्षण देत स्वतंत्र कार्यभार सांभाळण्यास देणे, हे देखील अपघातामागील कारण दिसून येते. वर्षातून दोन वेळा कंपनीमध्ये मॉक ड्रिल, फायर व स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक आहे.
अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, असे सुसज्ज रुग्णालय जिल्ह्यात नाहीत. डॉक्टरांचा अभाव, औषधांचा तुटवडा, उपकरणांची कमतरता, वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अपघातग्रस्तांच्या जीव वाचवण्यात अडचणी येतात. औद्योगिक क्षेत्रातील अपघातात भाजण्याचे प्रकार अधिक असते. याचाच भाग म्हणजे बर्न सेंटरची गरज.
अनेक रुग्णालयांत योग्य व्यवस्था नसल्याने रुग्णांना मुंबई-पुण्यात हलवावे लागते. त्यात वेळ जात असल्याने कामगारांना जीव गमवावा लागण्याची शक्यता असते. महाड येथील ट्रामा केंद्र धूळखात आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालयाची अवस्थाही भयावह आहे. त्यामुळे कंपन्या उभ्या करण्याबरोबरच सुरक्षेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी महत्त्वाची आहे.
अपघातात जखमी झालेल्यांना तसेच मृत कामगारांच्या वारसांना मिळणारी नुकसान भरपाईही तुटपुंजी असते. अनेक कंपन्या कामगारांच्या नातेवाईकांना ठराविक रक्कम देऊन त्यांची बोळवण करतात. बहुतांश कंपन्यांमध्ये राजकीय नेत्यांचे व्यवहारिक लागेबांधे असल्याने याबाबत फारसा आवाजही उठवला जात नाही.
महाड - ब्ल्यू जेट ३ नोव्हेंबर २०२३, ११ मृत, ७ जखमी.
महाड - प्रसोल केमिकल २०२२-२३, दोन अपघात - ३ मृत, ४ जखमी
थळमधील आरसीएफ कंपनीत स्फोट - ३ मृत.
खोपोली - जसनव्हा केमिकल कंपनीत स्फोट - २ मृत.
विळे भागाड - क्रिप्टझो कंपनी - २ मृत, १६ जखमी.
महाड - बंद कंपनीमध्ये स्फोट पाच ठार. या शिवाय युनिकॉन, एफडीसी, रिलायन्स या मोठ्या कंपन्यातही अपघात घडले आहेत.
जिल्ह्यात मोठे, मध्यम व लहान १ हजार ४८१ उद्योग कार्यरत असून उत्पादन प्रक्रियेशी निगडित ८३ हजार ४९० कामगार काम करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.