खेड (रत्नागिरी) : पोलादपूर कुडपणच्या या अपघातात माझे सगे-सोयरे हिरावले आहेत, अशी गंभीर प्रतिक्रिया प्रकाश ढेबे यांनी दिली. प्रकाशच्या लग्नाच्या निमित्ताने हे सारे पाहुणे पोलादपूर तालुक्यातील कोंडशी-कुमठे येथे गेले होते. प्रकाशचे लग्न उरकून परतत असताना कुडपण मार्गावर शुक्रवारी (८) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
टेम्पोचालक बंटी दळवी हा आमच्या नेहमीच्या परिचयातला. आमच्या धनगरवाड्यावर कुणाचे लग्न असो किंवा इतर कोणतेही कार्य अगदी भाताची मळणी काढायची असेल तरीदेखील बंटीचा टेम्पो हा ठरलेला. आमच्या धनगरवाड्यावर साधारणत ३०-३५ घरे, पण या घरातील कोणतेही मंगलकार्य बंटीच्या उपस्थितीशिवाय झालेले नाही. कशाची तरी नेहमीचीच मदत बंटीची आम्हाला होतेच, पण काय माहिती काल काहीतरी विपरितच घडणार होते. त्यात दोन दिवस पावसाचा शिडकावा झाल्यामुळे सरळेच रस्ते निसरडे झालेले होते. त्यामध्ये कोंडशी-कुमठे ही तर दुर्गम आणि डोंगरातील गावे या ठिकाणी जाणारे रस्तेदेखील फारसे चांगले नाहीत.
हेही वाचा - लेकरांना पाहायला जीव झाला कासावीस
रस्त्यांना कोठेही सरंक्षक कठडे नाहीत, पण आता हे बोलून काय उपयोग? असा प्रश्न करीत प्रकाशने सांगितले की, या अपघातात गेलेले विठोबा झोरे (वय ६५) हे माझे काका (आत्याचा नवरा), तुकाराम झोरे (वय ४०) हा माझा आत्येभाऊ तर भावेश वोघाडे (वय २३) हादेखील माझा नातेवाईक याचे तर लग्न जमले होते. येत्या काही दिवसात त्याच्याही हाताला हळद लागणार होती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. त्यामुळे कालचा हा प्रसंग घडला, असे म्हणावे लागेल. शुक्रवार (ता. ८) सकाळी आनंदाच्या आणि उत्साहाच्या भरात न्हाऊन निघणारा धनगरवाडा रात्रीच्या अपघातामुळे सुन्न झाला आहे.
मी चक्रावून गेलोय
माझ्या हळदीच्या पिवळ्या हातानींच काल मी माझ्या घरच्या नातेवाईक मंडळींचे मृतदेह स्थानिकांच्या मदतीने घटनास्थळावर काढत होतो, तर काही नातेवाइकांना स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने मी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मी, माझी पत्नी आणि वडील या अपघातामुळे धास्तावलो आहोत. कारण नेमकं लग्नसोहळ्याच्या दिवशीच हा प्रसंग घडला. त्यामुळे मी चक्रावून गेलो आहे, अशा शब्दांत प्रकाशने आपली भावना ‘सकाळ’शी बोलताना मांडली.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.