ओरोस : आगामी जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक ही शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांच्यातच होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असणार आहे; मात्र प्रमुख लढत शिवसेना विरुद्ध भाजप अशीच होणार आहे. कारण सध्यातरी जिल्ह्यात आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी ताकदवान दिसत नाही; मात्र या दोन्ही पक्षाचा फायदा शिवसेनेला होईल असे चित्र आहे. हे पक्षीय समीकरण असले तरी जिल्हा परिषदेत अनेक समस्या आहेत. भरती प्रक्रियेपासून खरेदी प्रक्रियेत सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. हे सत्ताधारी रोखण्यास अपयशी झालेले दिसत आहेत. प्रशासनाची मक्तेदारी रोखण्याचे काम पुढे सत्तेत येणाऱ्या पक्षावर राहणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक खासदार व तीन आमदार अशी संख्या आहे. यातील दोन आमदार व खासदार शिवसेनेचे आहेत. केवळ एकच आमदार भाजपाचे आहेत. लोकसभा व विधानसभा या वरच्या सभागृहात जिल्ह्यात सेनेचे वर्चस्व आहे; परंतु जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेत सध्या भाजपची एकहाती सत्ता आहे. जिल्ह्यात आठ पंचायत समित्या आहेत. यातील दोडामार्ग व वेंगुर्ले या दोन पंचायत समित्या शिवसेनेच्या ताब्यात आहेत. उर्वरित मालवण, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगड व वैभववाडी या सहा पंचायत समितीवर भाजपाचे सभापती आहेत. जिल्ह्यात सध्या आठ नगरपंचायती आहेत. यातील मालवण शिवसेनेच्या ताब्यात आहे, देवगड शिवसेना-राष्ट्रवादी, कुडाळ काँग्रेस-शिवसेनेच्या ताब्यात आहे. वैभववाडी, कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग या पाच नगरपंचायती भाजपकडे आहेत. जिल्ह्यात ४३१ ग्रामपंचायती आहेत. यामध्ये सुद्धा भाजपचे वर्चस्व आहे.
राज्य किंवा केंद्रस्तरावरील राजकारणात जिल्ह्यातील मतदारांचा सेनेवर विश्वास दिसतो; परंतु जिल्हास्तर, तालुकास्तर, शहर व गाव पातळीवरील राजकारणात जनतेचा विश्वास भाजपवर आहे. त्यामुळे जिल्ह्यात केवळ शिवसेनेचे चालते किंवा भाजपचे चालते, असे म्हणता येत नाही. नागरिकांनी दोन्ही पक्षाना समसमान ठेवले आहे. २०१७ च्या निवडणुकीत जिल्ह्याच्या अर्ध्या भागांत शिवसेना-भाजप युती करून लढली होती. काही भागांत स्वबळावर लढले होते. तर काँग्रेस स्वतंत्र लढली होती. केवळ दोडामार्ग तालुक्यात आघाडी झाली होती. त्यावेळी नारायण राणे काँग्रेसमध्ये होते. आता राणे भाजपात आहेत. हा मोठा फरक काँग्रेस बॅकफुटवर जाण्यास व भाजपा फ्रंटफुटवर येण्यास कारणीभूत आहे.
पाच वर्षात पुला खालून बरेच पाणी गेले आहे. राणेंकडे असलेले सतीश सावंत आता शिवसेनेकडे आहेत. राणेंच्या क्षेपणास्त्रातील हे प्रमुख अस्त्र होते. सोबत त्यांनी तीन जिल्हा परिषद सदस्य नेले आहेत. माजी अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर, विकास कुडाळकर यांनीही राणेंना जय महाराष्ट्र करीत शिवसेनेची वाट धरली आहे. भाजपा जवळ असलेले संदेश पारकर, अतुल रावराणे हे नेते शिवसेनेत गेले आहेत. ही शिवसेनेसाठी जमेची बाजू आहे; मात्र याचवेळी भाजपाची मुळ ताकद राणेंना मिळाली आहे. एकंदरीत उलथापालथ झाली असलीतरी राजकीय ताकद इकडची तिकडे व तिकडची इकडे अशी गेलेली आहे. नेते जरी एकडून तिकडे गेले असलीतरी कार्यकर्ते कुठे आहेत? हे महत्वाचे असल्याने नेमके हे स्पष्ट करणारी ही निवडणूक असणार आहे.
भाजपा व सेना या दोन्ही पक्षासाठी ही निवडणूक महत्वाची ठरणार आहे. त्यादृष्टीने दोन्ही पक्षाचे चाणाक्ष रणनीती ठरवित आहेत. ''अबकी बार अपनी सरकार'', ''अभी नहीं तो कभीं नहीं'' अशाप्रकारे व्यूहरचना सुरु आहे. सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेनेला एकसंघ लढत द्यावी लागणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी या आघाडीतील दोन्ही पक्षाना न दुखावता त्यांना समाधानकारक मतदार संघ वाटपात संधी दिली पाहिजे. सत्तेत राहण्यासाठी भाजपाला सुद्धा कसरत करावी लागणार आहे. भाजपत जुने-नवे वाद सध्यातरी नाही. तरीही राणेंना उमेदवार निवड करताना जुन्या भाजपा कार्यकर्त्यांना विश्वासात घेतानाच समाधान होईल, अशी संधी दिली पाहिजे. विशेष म्हणजे देवगड तालूका, बांदा, दोडामार्ग या ठिकाणी भाजपचे पहिल्यापासून प्राबल्य आहे. तेथे संधी मिळाल्यास भाजप सत्ता राखू शकते.
३३ वा अध्यक्ष कोणाचा?
रत्नागिरी जिल्ह्यापासुन सिंधूदुर्ग जिल्हा स्वतंत्र झाल्यानंतर सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेत सुरूवातीचा प्रशासकीय कालावधी वगळता ३२ अध्यक्ष बसले आहेत. यात ७ प्रभारी तर २२ नियमित अध्यक्ष आहेत. पहिले अध्यक्ष होण्याचा मान य. बा. दळवींना मिळाला आहे. विद्यमान अध्यक्षा संजना सावंत यांना दोनवेळा अध्यक्ष होण्याचा तर भाजप गटनेते रणजीत देसाई यांना दोनवेळा प्रभारी अध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे. मार्च २०९७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नारायण राणे यांनी आपल्या तत्कालीन शिवसेना पँनेलची सत्ता आणली. तेथून सलग २५ वर्षे राणे असलेल्या पक्षाकडे सत्ता राहिली आहे. शिवसेनेचे पहिले अध्यक्ष म्हणून राणेंनी भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना संधी दिली होती. योगायोगाने तेली त्यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. आताही ते भाजपा जिल्हाध्यक्ष आहेत. २५ वर्षे सत्ता ताब्यात ठेवणाऱ्या राणेंना सत्ता कायम टिकविण्याचे आवाहन आहे. त्यांच्या हातातील सत्ता खेचुन घेण्याचे आव्हान सेने समोर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.