हैदराबाद : यजमान भारतीय क्रिकेट संघावर येथे पार पडलेल्या पहिल्या कसोटीत पराभवाची नामुष्की ओढवली. ओली पोपच्या १९६ धावांच्या देदीप्यमान ऐतिहासिक खेळीनंतर पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या टॉम हार्टली याने ६२ धावा देत टीम इंडियाच्या सात फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि इंग्लंडला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
भारतीय संघातील प्रमुख फलंदाजांची हाराकिरी या पराभवाचे कारण ठरली. इंग्लंडने २८ धावांनी विजय संपादन केला आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पोपची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. आता २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे दुसऱ्या कसोटीला सुरुवात होईल.
इंग्लंडच्या संघाने ६ बाद ३१६ या धावसंख्येवरून रविवारी पुढे खेळायला सुरुवात केली. भारतासाठी इंग्लंडचा डाव झटपट गुंडाळणे गरजेचे होते, पण ओली पोपने तळाच्या फलंदाजांना साथ घेऊन इंग्लंडसाठी मौल्यवान कामगिरी बजावली. पोप याने रेहान अहमदच्या साथीने ६४ धावांची भागीदारी रचत सुरुवात आश्वासक केली. जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर अहमद (२८ धावा) बाद झाला.
त्यानंतर ओली पोप व टॉम हार्टली या जोडीने ८० धावांची निर्णायक भागीदारी रचली. दोघांनी भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे मुकाबला केला. दोघांच्या दमदार फलंदाजीमुळे इंग्लंडने दुसऱ्या डावात ४०० धावांचा टप्पा ओलांडला.
भारतावर २०० पेक्षा जास्त धावांनी पुढे होण्याचा मान संपादन केला. ही जोडी आणखी मोठी भागीदारी करणार असे वाटत असतानाच रवीचंद्रन अश्विनच्या खाली राहणाऱ्या चेंडूवर हार्टलीचा ३४ धावांवर त्रिफळा उडाला.
त्यानंतर एक धावेच्या अंतरात मार्क वूड व पोप हेही बाद झाले. पोपने आपल्या १९६ धावांच्या खेळीत २१ नेत्रदीपक चौकारांचा पाऊस पाडला. जसप्रीत बुमराने ४१ धावा देत चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. इंग्लंडने दुसऱ्या डावात ४२० धावा फटकावल्या.
संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड - पहिला डाव २४६ धावा आणि दुसरा डाव ४२० धावा (ओली पोप १९६ - २७८ चेंडू, २१ चौकार, रेहान अहमद २८, टॉम हार्टली ३४, जसप्रीत बुमरा ४/४१, रवीचंद्रन अश्विन ३/१२६) विजयी वि. भारत - पहिला डाव ४२० धावा आणि दुसरा डाव २०२ धावा (रोहित शर्मा ३९, यशस्वी जयस्वाल १५, के. एल. राहुल २२, अक्षर पटेल १७, श्रेयस अय्यर १३, रवींद्र जडेजा २, श्रीकर भरत २८, रवीचंद्रन अश्विन २८, जसप्रीत बुमरा नाबाद ६, मोहम्मद सिराज १२, टॉम हार्टली ७/६२).
इंग्लंडकडून भारतासमोर २३१ धावांचे आव्हान उभे ठाकले. रोहित शर्मा व यशस्वी जयस्वाल या जोडीने ४२ धावांची भागीदारी करताना आश्वासक सुरुवात केली, पण टॉम हार्टली याने यशस्वी जयस्वालला ओली पोपकरवी २४ धावांवर झेलबाद केले आणि जोडी तोडली.
त्यानंतर त्याच षटकात शुभमन गिललाही पोपकरवीच शून्यावरच झेलबाद केले. हार्टलीने कर्णधार रोहित शर्माला ३९ धावांवर पायचीत बाद करीत टीम इंडियाला बॅकफूटवर फेकले. रोहितने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली, पण हार्टलीचा तो चेंडू पॅडला लागून स्टम्पवर आदळत होता हे स्पष्ट दिसले व रोहित बाद झाला.
भारताचे तीन प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनीही निराशाजनक कामगिरी केली. पाचव्या क्रमांकावर बढती मिळालेल्या अक्षर पटेलला संधीचे सोने करता आले नाही. हार्टलीच्या गोलंदाजीवर तो १७ धावांवर बाद झाला. पार्टटाईम फिरकीपटू ज्यो रुटने के. एल. राहुलला २२ धावांवर पायचीत बाद केले. रवींद्र जडेजा दोन धावांवर धावचीत झाला. श्रेयस अय्यरने जॅक लीचच्या गोलंदाजीवर १३ धावांवर विकेट गमावली.
धावांचा पाठलाग करताना ७ बाद ११९ धावा अशा संकटात असताना भारताच्या तळाच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली. श्रीकर भरत व रवीचंद्रन अश्विन या जोडीने ५७ धावांची भागीदारी करीत विजयाचे प्रयत्न कायम ठेवले.
पण टॉम हार्टलीने भरतला २८ धावांवर त्रिफळाचीत करीत जोडी तोडली. हार्टलीच्याच गोलंदाजीवर अश्विन २८ धावांवर बाद झाला. त्यानंतर मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमरा या अखेरच्या जोडीने २५ धावांची भागीदारी करीत आपल्या परिने प्रयत्न केले. हॉर्टलीने सिराजला १२ धावांवर बाद केले. भारताचा दुसरा डाव २०२ धावांवर आटोपला. हार्टलीने ६२ धावा देत सात फलंदाजांना तंबूत पाठवले.
१९२ धावा वि. श्रीलंका, गॉल, २०१५
१९० धावा वि. इंग्लंड, हैदराबाद, २०२४
१३२ धावा वि. इंग्लंड, बर्मिंगहॅम, २०२२
४४९ धावा वि. पाकिस्तान, बंगळूरू, २००५
४३६ धावा वि. इंग्लंड, हैदराबाद, २०२४
४२४ धावा वि. ऑस्ट्रेलिया, बंगळूरू, १९९८
१२ धावा वि. पाकिस्तान, चेन्नई, १९९९
१६ धावा वि. ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन, १९७७
१६ धावा वि. पाकिस्तान, बंगळूरू, १९८७
२८ धावा वि. इंग्लंड, हैदराबाद, २०२४
३१ धावा वि. इंग्लंड, बर्मिंगहॅम, २०१८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.