लंडन : आयपीएलमध्ये परिश्रम केल्यानंतर भारतीय संघ आता कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी प्रामुख्याने वेगवान गोलंदाजांवरील वर्कलोडचे नियोजन करण्यास प्राधान्य देत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा निर्णायक सामना ७ जूनपासून सुरू होत आहे.
मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल हे ज्या संघातून खेळत होते, त्या आयपीएल संघांचे आव्हान अगोदरच संपुष्टात आल्यामुळे हे खेळाडू पहिल्या टप्प्यात लंडनमध्ये आले. जयदेव उनाडकट आणि उमेश यादव यांनी दुखापतीमुळे आयपीएलच्या काही सामन्यांनंतर माघार घेतली.
त्यामुळे तेसुद्धा पहिल्या टप्प्यात दाखल झाले. आयपीएल अंतिम सामना पावसामुळे एक दिवस लांबल्याने मोहम्मद शमी उशिरा लंडनमध्ये आला. आता सर्व खेळाडू लंडनमध्ये दाखल झालेले असून सराव सुरू झाला आहे.
चेतेश्वर पुजारा लंडनध्ये अगोदरपासूनच असून तो ससेक्स संघातून कौंटी क्रिकेट खेळत होता. तोही आता संघासोबत आहे, असे भारतीय संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. ससेक्स येथीलच अरुंदेल कॅस्टल क्रिकेट क्लबवर भारतीय संघाचा सराव सुरू आहे. ओव्हलवर जाण्यापूर्वी येथेच काही दिवस सराव करण्यात येणार आहे.
खेळाडू टप्प्याटप्प्याने जसे येत गेले, तसा सराव आम्ही सुरू केला आणि योग्य दिशेने सराव सुरू आहे; पण सर्वच खेळाडू आल्याने गेल्या दोन सत्रांतील सराव उत्तमरीत्या झाला. वेगवान गोलंदाजांची तंदुरुस्ती पाहून आम्ही त्यांच्याकडून सराव करून घेत आहोत. वर्कलोडचे नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे, असे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनी बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओत सांगितले.
सरावासाठी असलेल्या सुविधांवर आम्ही समाधानी आहोत. मैदानसुद्धा फार चांगले आहे. अशाच सुविधा आणि मैदानाची अपेक्षा आम्ही केली होती. हवामानही उत्तम आहे. चांगला सूर्यप्रकाश असतो. हलका वारा आणि काहीशी थंडी इंग्लंडमधील हे नेहमीचे वातावरण अल्हाददायक असल्यामुळे सराव करताना आनंद मिळत आहे, असेही म्हांबरे म्हणतात.
सराव सुरू झालेला असला, तरी वेगवान गोलंदाजांना आम्ही टप्प्या-टप्प्याने काही सत्र विश्रांती देणार आहोत. त्यांच्याकडून सध्या तरी मोजकाच सराव करून घेण्यात येणार आहे आणि सामन्याच्या एक-दोन दिवस अगोदर मात्र त्यांना पूर्ण तयार करण्यात येईल, अरुंदेल कॅस्टल क्रिकेट क्लबवर अजून दोन दिवस आमचा सराव असेल, अशी माहिती म्हांबरे यांनी दिली.
जवळच्या झेलांचा सराव
आयपीएलमध्ये तंदुरुस्तीसाठीचे व्यायाम झालेले असल्यामुळे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांनी व्यायामाचे हे प्रकार टाळून जवळच्या झेलांच्या सरावावर भर दिला. प्रत्येक जण कमीत कमी आयपीएल सामने खेळलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील ताण कमी करून सरावाचे नियोजन करण्याला आम्ही प्राधान्य देत आहे. प्रत्येकाने किती धावायचे आणि किती विश्रांती घ्यायची, याचेही गणित आम्ही तयार केले आहे, असे दिलीप यांनी सांगितले.
ते पुढे म्हणतात, प्रत्येकाने आयपीएलमध्ये मैदानी क्षेत्ररक्षण केले आहे. त्यामुळे खास करून फलंदाजाच्या जवळचे झेल, स्लीपमध्ये, मैदानाच्या समांतर असलेले झेल पकडण्याच्या सरावावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.
दीर्घकाळ फलंदाजीवर भर
‘आयपीएल’मुळे झटपट खेळ करण्याच्या मोडमध्ये आपले फलंदाज होते. आता दीर्घकाळ फलंदाजीसाठी त्यांची मानसिकता तयार करण्यावर आमचा भर आहे, असे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी सांगितले. प्रत्येक खेळाडू भरपूर क्रिकेट खेळला आहे. आता आमच्याकडे जो काही वेळ शिल्लक आहे, त्यातून व्हाईटबॉलमधून रेड बॉलची मानसिकता आम्हाला बदलावी लागणार आहे. काही सत्रांत अशी दीर्घकाळ फलंदाजी केली की आपोआप बदल होत जाईल, असेही राठोड म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.