World Cup South Africa vs Netherlands : दक्षिण आफ्रिका विजयाच्या हॅट्‌ट्रिकसाठी सज्ज! नेदरलँड संघाकडून धक्कातंत्राची आशा

World Cup South Africa vs Netherlands : दक्षिण आफ्रिका विजयाच्या हॅट्‌ट्रिकसाठी सज्ज! नेदरलँड संघाकडून धक्कातंत्राची आशा
Updated on

2023 ODI World Cup South Africa vs Netherlands : आयसीसीच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये दबावाखाली गळपटणारा संघ म्हणून दक्षिण आफ्रिकेला ओळखले जाते. याच कारणामुळे त्यांना ‘चोकर्स’ म्हणून टोपणनावही देण्यात आले आहे; मात्र हाच दक्षिण आफ्रिकन संघ भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय विश्‍वकरंडकात कात टाकत आहे.

पहिल्या दोन लढतींमध्ये त्यांनी दिमाखदार विजय मिळवले आहेत. आता आज त्यांचा सामना नेदरलँडशी होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयाच्या हॅट्‌ट्रिकसाठी प्रयत्न करताना दिसेल; तर नेदरलँडचा संघ पराभवाच्या हॅट्‌ट्रिकपासून दूर राहण्याचा प्रयत्न करील.

दक्षिण आफ्रिकेने सलामीच्या लढतीत श्रीलंकेवर १०२ धावांनी विजय संपादन केला. त्यानंतर पाच वेळच्या ऑस्ट्रेलियाला १३४ धावांनी धूळ चारली. क्विंटॉन डी कॉक याने दोन्ही लढतीत शतक झळकावत आपले इरादे स्पष्ट केले आहेत. एडन मार्करम यांनी एक शतक व एक अर्धशतक साजरे करताना आपली धमक दाखवून दिली आहे. रॅसी वॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर व हेनरीच क्लासेन यांनीही महत्त्वपूर्ण खेळी साकारल्या आहेत. आता हाच फॉर्म कायम राखत दक्षिण आफ्रिकेला ऐतिहासिक यश मिळवून देण्यासाठी हे सर्व फलंदाज प्रयत्नांची शिकस्त करताना दिसतील.

दक्षिण आफ्रिकन संघाचे गोलंदाजही छान कामगिरी करीत आहेत. लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, मार्को यान्सेन हे वेगवान गोलंदाज भारतीय खेळपट्ट्यांवर चमक दाखवत आहेत. केशव महाराज व तबरेझ शम्सी हे फिरकी गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याची कामगिरी बजावत आहेत. नेदरलँडसमोर आज (ता. १७) कठीण पेपर असेल यात शंका नाही.

टी-२० विश्‍वकरंडकाची पुनरावृत्ती?

अफगाणिस्तानने रविवारी इंग्लंडला पराभूत करून यंदाच्या विश्‍वकरंडकातील पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद केली. नेदरलँडच्या संघामध्येही धक्कादायक निकाल लावण्याची क्षमता आहे. याच नेदरलँड संघाने २००९ मधील टी-२० विश्‍वकरंडकात इंग्लंडला नमवले होते. तसेच २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्‍वकरंडकात नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेवर मात करीत सनसनाटी विजयाला गवसणी घातली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशांना सुरुंग लागला होता. नेदरलँडकडून यंदाही तशाच प्रकारची अपेक्षा केली जाऊ शकते; मात्र टी-२० व एकदिवसीय हे दोन भिन्न प्रकार आहेत. त्यामुळे नेदरलँडचा कस लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.