प्रो कबड्डीला आजपासून सुरुवात; 'या' पाच गोष्टी माहिती आहेत का?

Pro Kabaddi
Pro Kabaddiesakal
Updated on

बंगळुरु : प्रो कबड्डीचा आठवा हंगाम आजपासून ( दि. 22 ) बंगळुरु येथे सुरु होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा बायो बबलमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व सामने बंगळुरु येथेच होणार आहेत. प्रो कबड्डीच्या (Pro Kabaddi) आठव्या हंगामाचा नारळ हा तीन सामन्यांनी फुटणार आहे. पहिला सामना हा यू मुंबा ((U Mumba) आणि बंगळुरु बुल्स (Bengaluru Bulls) यांच्यात रंगणार असून त्यानंतर तेलगू टायटन्स (Telugu Titans) आणि तामिळ थलायवाज यांच्यात दुसरी लढत होईल. पहिल्या दिवसाची सांगता ही यूपी योद्धा आणि गतविजेता बंगाल वॉरियर्स यांच्यातील सामन्याने होईल.

बंगळुरुमध्ये प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामाचा शड्डू ठोकला जाईल. कोरोनामुळे 2020 ला प्रो कबड्डीचा हंगाम झाला नव्हता. 2014 पासून सुरु झालेल्या प्रो कबड्डीचे आतापर्यंत 7 हंगाम झाले असून ही स्पर्धा आता भारतीय कबड्डी शौकिनांसाठी परवणी ठरत आहे. आठव्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी चाहत्यांना प्रो कबड्डी बाबतच्या या पाच गोष्टी जाणून घेण्यास नक्कीच आवडेल.

प्रो कबड्डीत विजेतेपदाची हॅट्ट्रिक कोणी केली?

प्रो कबड्डीमध्ये (Pro Kabaddi) यू मुंबा (U Mumba) आणि जयपूर पिंक पँथर (Jaipur Pink Panthers) हे दोन संघ ग्लॅमर संघ म्हणून ओळखले जातात. अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथरने आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाप्रमाणे 2014 ला झालेला प्रो कबड्डीचा पहिला हंगाम जिंकला होता. मात्र त्यानंतर जयपूर पिंक पँथरला पुन्हा हंगाम जिंकण्यात अपयश आले. 2016 ला जयपूर पिंक पँथरला पुन्हा विजेतेपद मिळवण्याची संधी होती मात्र त्यांना पटाना पायरेट्सकडून मात खावी लागली आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

अशीच कहाणी यू मुंबाची देखील आहे. यू मुंबा पहिल्या हंगामात फायनलमध्ये पोहचला होता. मात्र जयपूर पिंक पँथरने त्यांना मात देत पहिले विजेतेपद आपल्या नावावर केले होते. यू मुंबाला आतापर्यंत एकदाच विजेतेपदावर आपले नाव कोरता आले आहे. 2015 च्या हंगामात यू मुंबाने विजेतेपदाला गवसणी घातली होती.

मात्र 2016 ला झालेल्या तिसऱ्या आणि चौथ्या अशा दोन हंगामात पटाना पायरेट्सने (Patna Pirates) विजेतेपद मिळवले. पटना पायरेट्सने तिसऱ्या हंगामात यू मुंबाला आणि चौथ्या हंगामात जयपूर पिंक पँथरला अशा दोन माजी विजेत्यांना मात दिली होती. त्यानंतर 2017 ला त्यांनी गुजरात फॉर्च्युन जायंटला मात देत विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली. मात्र त्यानंतर सहाव्या आणि सातव्या हंगामात पटना पायरेट्सला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.

Pro Kabaddi
PKL Season 8 : जाणून घ्या 12 संघातील Raiders अन् Defenders

सर्वाधिकवेळा बेस्ट रेडरचा पुरस्कार कोणाच्या नावावर?

आतापर्यंत प्रो कबड्डीचे 7 हंगाम झाले आहेत. या सात हंगामात सर्वाधिकवेळा बेस्ट रेडर्सचा पुरस्कार मिळवण्याच्या शर्यतीत प्रदीप नरवाल पाचव्या हंगामापर्यंत आघाडीवर होता. त्याने तिसऱ्या आणि पाचव्या हंगामात बेस्ट रेडरचा पुरस्कार मिळवला होता. मात्र प्रो कबड्डीच्या (Pro Kabaddi) सहाव्या हंगामापासून पवन शेरावतने प्रदीप नरवालला कडवी टक्कर दिली. त्याने सहाव्या आणि सातव्या अशा सलग दोन हंगामात बेस्ट रेडरचा पुरस्कार मिळवत सर्वाधिकवेळा बेस्ट रेडरचा पुरस्कार मिळवण्याच्या यादीत प्रदीप नरवालशी बरोबरी साधली. आता आठव्या हंगामात पवन शेरावतला बेस्ट रेडर पुरस्काराची हॅट्ट्रिक साधण्याची संधी आहे. अनुप कुमार, काशीलिंग अडके, राहुल चौधरी यांनी हंगामाचा बेस्ट रेडर पुरस्कार प्रत्येकी 1 वेळा मिळवला आहे.

बेस्ट डिफेंडरमध्ये भारताला इराणची कडवी टक्कर

कबड्डीमध्ये जितके महत्व रेडरला असते तेवढेच महत्व डिफेंडरला देखील असते. प्रो कबड्डीच्या आतापर्यंतच्या हंगामात एकापेक्षा जास्त वेळा बेस्ट डिफेंडरचा पुरस्कार मिळवण्यामध्ये भारताचा मनजीत छिल्लर (Manjeet Chhillar) आघाडीवरी होता. त्याने प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामात बेस्ट डिफेंडरचा पुरस्कार मिळवला होता. त्यानंतर त्याने तिसऱ्या हंगामात पुन्हा बेस्ट डिफेंडरचा पुरस्कार आपल्या नावावर केला.

प्रो कबड्डीच्या इतिहासात दोनवेळा बेस्ट डिफेंडर होण्याचा हा मान सहाव्या हंगामापर्यंत भारताच्या मनजीत छिल्लरला मिळाला. मात्र सातव्या हंगामात इराणच्या फैझल अत्राचलीने (Fazel Atrachali) मनजीच छिल्लरशी बरोबरी केली. फैझलने चौथ्या हंगामात पहिल्यादा बेस्ट डिफेंडरचा पुरस्कार मिळवला होता. त्यानंतर त्याने सातव्या हंगामात पुन्हा एकदा बेस्ट डिफेंडरचा पुरस्कार मिळवत मनजीत छिल्लरच्या सर्वाधिकवेळा बेस्ट डिफेंडरचा पुरस्कार मिळवण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

Pro Kabaddi
PKL 2021 : 'ले पंगा' कधी कुठे अन् कसे पाहायचे सामने?

सातव्या हंगामातील सर्वात यशस्वी रेडर कोण?

प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात नवीन कुमार सर्वात यशस्वी रेडर ठरला होता. त्याने हंगामात 263 यशस्वी रेड केल्या होत्या. या यादीत दुसऱ्या स्थानावर 234 रेडसह प्रदीप नरवाल हा दुसऱ्या स्थानावर होता. त्या खालोखाल कोल्हापूरच्या सिद्धार्थ देसाईने 177 यशस्वी रेड केल्या होत्या.

मात्र जरी नवीन कुमारने सर्वात यशस्वी रेड करण्यात बाजी मारली असली तरी त्याला सर्वाधिक रेडपॉईंट मिळवणाऱ्यांच्या यादीत प्रदीप नरवालने त्याला अवघ्या एका पाईंटने मागे टाकले. प्रदीप नरवालने हंगामात 302 रेड पॉईंट मिळवले. तर नवीव कुमारने 301 रेड पॉईंट मिळवले. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सिद्धार्थ देसाई आहे. त्याने 177 यशस्वी रेडद्वारे 217 रेडपॉईंटची कमाई केली होती.

प्रो कबड्डीच्या इतिहासात सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू कोण?

आठव्या हंगामाच्या लिलावात कबड्डीपटूंनी कोटीच्या कोटी उड्डाणे केली आहेत. यूपी योद्धाने प्रदीप नरवालला (Pardeep Narwal) तब्बल 1 कोटी 65 लाखाची बोली लावत आपल्या गोटात सामिल करुन घेतले. तो प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. प्रदीप नरवालने गेल्याच हंगामात सर्वाधिक रेडपॉईंट मिळवले होते.

प्रदीप पाठोपाठ कोल्हापूरच्या सिद्धार्थ देसाईला (Siddharth Desai) तगडी बोली लागली. तेलुगू टायटन्सने त्याला 1 कोटी आणि 30 लाखांची बोली लावत रिटेन केले. रिटेन करताना तेलुगू टायटन्सने एफबीएम कार्डचा वापर केला होता. 2019 च्या बोलीत सिद्धार्थला 1 कोटी 45 लाखांची बोली लागली होती. मात्र यंदाच्या हंगामात त्याला 1 कोटी 30 लाखांची बोली लागली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()