Indian Super League 2024-25: इंडियन सुपर लीग (ISL) 2024-25 मीडिया डे चा दुसरा दिवस कोची इथे ५ सप्टेंबर रोजी पार पडला. यावेळी बंगळुरू एफसी, हैदराबाद एफसी, एफसी गोवा, चेन्नईयन एफसीसह गतवर्षीच्या आयएसएल चषक विजेत्या मुंबई सिटी एफसी आणि केरला ब्लास्टर्स एफसी या संघांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.
यावेळी प्रत्येक संघाच्या प्रतिनिधिनींनी आगामी हंगामाबद्दल आपली मतं व्यक्त केली. आपल्या संघाच्या तयारीबाबत आणि ध्येयाबाबतही भाष्य केले.
सर्वातआधी मुंबई सिटी एफसीचे प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी मुंबईचे प्रशिक्षक पीटर क्रॅटकी यांच्यासह खेळाडू फुरबा लाचेनपा, जॉन टोरल, आयुष चिकारा हे उपस्थित होते.
दरम्यान, या हंगामापूर्वी राहुल भेके, अल्बर्टो नोगुएरा आणि जॉर्ज पेरेरा डियाझ या तीन प्रमुख खेळाडूंनी बंगळुरू एफसीमध्ये सामील झाल्यामुळे मुंबई सिटी एफसीने संघाचा एक छोटासा फेरबदल केला. याबाबत बोलताना क्रॅटकी यांनी विश्वास व्यक्त केला की असे बदल होणे सामान्य आहेत.
ते म्हणाले, “आम्ही एक नवीन अध्याय सुरू करत आहोत, म्हणूनच मी खूप उत्साहित आहे. आमच्याकडे नवीन खेळाडू आणि स्टाफ आहे. आमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आम्ही पडद्यामागे खूप कठोर परिश्रम करत आहोत. प्रक्रिया सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे, आम्हाला नेहमीच अव्वल राहायचे आहे. बदल हा फुटबॉलचा भाग आहे, लोक येतात आणि जातात, परंतु आम्ही नेहमी एकत्र काम करण्याचा आणि पूर्वीप्रमाणेच काम करण्याचा प्रयत्न करतो.”