जिद्दीच्या जोरावर सर्वकाही शक्य असल्याचे हरियाणाच्या तायक्वांदो खेळाडूने दाखवून दिले आहे. कुटुंबियांनी दिलेली साथ आणि मेहनतीच्या जोरावर अरुणा तन्वर हिने पॅरा ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. टोकियो पॅरा ऑलिम्पिकसाठी (Tokyo Paralympics) साठी पात्र ठरताच अरुणा तन्वरच्या नावे खास विक्रमाची नोंद झालीये. अरुणा तन्वर (Aruna Tanwar) हिला वाइल्ड कार्डच्या माध्यमातून टोकियो पॅरा ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले. (Aruna Tanwar becomes 1st Indian taekwondo athlete to qualify for Tokyo Paralympics)
भारताकडून तायक्वांदो खेळ प्रकारात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी ती पहिली खेळाडू आहे. आई-वडिलांच्या सहाकार्यामुळे इतपर्यंतचा प्रवास शक्य झाला, असे तिने एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे माझ्या ऐतिहासिक कामगिरीत त्यांचा वाटा मोलाचा आहे, असे तिने सांगितले . लहानपणापासूनच मार्शल आर्टमध्ये रुची होती. सुरुवातीच्या काळात सामान्य गटातून खेळाचे. यावेळी मला म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यानंतर पॅरा तायक्वांदो प्रकारातून खेळायला सुरुवात केल्याची ती म्हणाली.
हरियाणातील भिवानी जिल्ह्यात जन्मलेल्या अरुणाच्या हाताची बोटे छोटी असल्याचे त्यांच्या पालकांच्या लक्षात आले. आपल्यात काही उणीव आहे, अशी भावना न बाळगता अरुणा आपल्या आवडीच्या क्षेत्रात मेहनत घेत राहिली. या मुलीचे वडील एका खासगी बसवर ड्रायव्हरचे काम करतात. लेकीने क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव उंचवावे, असे स्वप्न त्यांनी पाहिले होते. अरुणाला त्यांनी खेळ क्षेत्रात करियर करण्यास स्वातंत्र्य दिले. आज ती पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. हा क्षण देशवासियांसह तिच्या कुटुंबियांना अभिमानास्पद असाच आहे.
भारतीय तायक्वांदो महासंघाचे अध्यक्ष नामदेव शिरगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणाची दमदार कामगिरी पाहून तिला वाइल्ड कार्ड एन्ट्री देण्याचा निर्णय घेण्यात आला. पॅरा ऑलिम्पिकमध्ये पात्रता सिद्ध करणारी ती तायक्वांदोमधील पहिली भारतीय खेळाडू आहे. तिच्यामुळे अनेक नवोदित खेळाडूंसाठी ऑलिम्पिकचे दरवाजे खुले होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अरुणा सध्याच्या घडीला महिलांच्या अंडर 49 गटातील जगातील चौथ्या क्रमांची खेळाडून आहे. पाच वेळच्या राष्ट्रीय चॅम्पियन अरुणाने मागील चार वर्षांत आशियाईम पॅरा तायक्वांदो चॅम्पियनशिप आणि विश्व पॅरा तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पदकाची कमाई केली आहे. 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरमध्ये टोकियोत होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत तिच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.