बँकॉक : पुरुषांच्या ४-४०० मीटर रिले शर्यतीत भारतीय संघाने रौप्यपदकाची कमाई केली आणि एकूण २७ पदके (६ सुवर्ण, १२ रौप्य, ९ ब्राँझ) जिंकून आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेतील आपल्या सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी केली.
परदेशात झालेल्या स्पर्धेत मात्र, भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी यजमानपद भूषविताना २०१७ च्या भुवनेश्वर येथील स्पर्धेत भारताने नऊ सुवर्णपदकांसह २७ पदके जिंकली होती. भारताबाहेर म्हणजे १९८५ च्या जकार्ता स्पर्धेत भारताने १० सुवर्णांसह २२ पदके जिंकली होती. दरम्यान, शेवटच्या दिवशी भारतीय खेळाडूंनी १३ पदके जिंकली.
जपानने ३७ पदकांसह प्रथम, चीनने २२ पदकांसह दुसरे स्थान मिळविले. मात्र, चीनने भारतापेक्षा दोन सुवर्णपदके अधिक मिळवली. भारताने आज महिलांच्या गोळाफेक व २० किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पदक जिंकले.
महाराष्ट्राची असलेल्या आभा खटुआने गोळाफेकीत चौथ्या प्रयत्नात १८.०६ मीटर अंतरावर गोळा फेकला आणि रौप्यपदक निश्चित केले. या कामगिरीमुळे स्पर्धेच्या इतिहासात महिला गोळाफेकीत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. डोपिंगची शिक्षा भोगून पुनरागमन करणाऱ्या मनप्रीत कौरने १७ मीटर कामगिरीसह ब्राँझपदक जिंकले.
विकास सिंग आणि प्रियांका यांनी २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत सकाळी भारताचे पदकाचे खाते उघडले. विकासने १ तास २९ मिनिटे ३३ सेकंदात ब्राँझ, तर प्रियांकाने १ तास ३४ मिनिटे २४ सेकंदात रौप्यपदक जिंकले. पुरुषांच्या शर्यतीत १९९१ च्या स्पर्धेत सुचा सिंग यांनी भारतासाठी शेवटचे ब्राँझपदक जिंकले होते.
त्यानंतर विकासने ही कामगिरी केली. महिलांच्या शर्यतीत भारताला प्रथमच पदक जिंकता आले. ८०० मीटरच्या दोन्ही शर्यतीतही भारतीय धावपटूंनी पदक जिंकण्याची किमया केली. पुरुषांत हरियानाच्या क्रिशन कुमारने १ मिनिट ४५.८८ सेकंद, तर महिलांत दिल्लीच्या के. एम. चंदाने २ मिनिटे ०१.५८ सेकंद वेळ देत रौप्य जिंकले. टिंटू लुकानंतर चंदाने भारताला आठ वर्षांनंतर पदक मिळवून दिले. गुलवीर सिंगने पाच हजार मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकून लांब पल्ल्याच्या शर्यतीतील भारताची गौरवशाली परंपरा कायम राखली.
पारुल, ज्योतीचे दुसरे पदक
पारुल चौधरी व ज्योती यराजी यांनी आज स्पर्धेतील आपले दुसरे पदक जिंकले. तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पारुल चौधरीने पाच हजार मीटर शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. तिने १५ मिनिटे ५२.३५ सेकंद अशी वेळ दिली.
अंकिताला १६ मिनिटे ०३.३३ सेकंदात ब्राँझपदक मिळाले. २०१९ च्या स्पर्धेत पारुलने ब्राँझपदक जिंकले होते. १०० मीटर हर्डल्स शर्यतीत भारताला प्रथमच सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या ज्योती यराजीला २०० मीटर शर्यतीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने २३.१३ सेकंद अशी मोसमातील सर्वोत्तम वेळ दिली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऐश्वर्या मिश्राने ४०० मीटरमध्ये ब्राँझ, मिश्र रिलेत सुवर्ण व ४-४०० रिलेत ब्राँझ अशा तीन पदकांची कमाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.