भारतीय फुटबॉल संघ आज ऑस्ट्रेलियाशी लढणार ; आशियाई फुटबॉल करंडक

एएफसी आशियाई करंडकात २४ देशांचा सहभाग असून प्रत्येक गटातील अव्वल दोन देश बाद फेरीत प्रवेश करणार आहेत. तसेच तिसऱ्या स्थानावरील सर्वोत्तम चार संघही पुढल्या फेरीत प्रवेश करणार आहेत.
भारतीय फुटबॉल संघ आज ऑस्ट्रेलियाशी लढणार ; आशियाई फुटबॉल करंडक
Updated on

अल रय्यान (कतार) : भारतीय फुटबॉल संघ उद्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. एएफसी आशियाई फुटबॉल करंडकाच्या सलामीच्या लढतीत भारतीय संघाचा कस लागणार हे निश्‍चित आहे. ऑस्ट्रेलियन संघ फिफाच्या क्रमवारीत २५व्या स्थानावर असून भारतीय संघ १०२व्या स्थानावर आहे. फुटबॉलच्या रणांगणात मात्र इतकी तफावत दिसायला नको, अशी आशा भारतीय फुटबॉलप्रेमी करीत असतील. कतार येथे ही स्पर्धा होत आहे.

एएफसी आशियाई करंडकात २४ देशांचा सहभाग असून प्रत्येक गटातील अव्वल दोन देश बाद फेरीत प्रवेश करणार आहेत. तसेच तिसऱ्या स्थानावरील सर्वोत्तम चार संघही पुढल्या फेरीत प्रवेश करणार आहेत. फिफाच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियन संघ २५व्या व उझबेकिस्तान ६८व्या स्थानावर आहे. त्यामुळे साहजिकच या दोन्ही देशांचा दर्जा भारतापेक्षा चांगला असेल. मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक व कर्णधार सुनील छेत्री यांनीही याबाबत आपले मत व्यक्त केले. त्यांच्याकडून पहिल्या दोन स्थानांसाठी ऑस्ट्रेलिया व उझबेकिस्तान यांना पसंती देण्यात आली आहे.

मात्र पहिल्या दोन लढती (ऑस्ट्रेलिया, उझेबकिस्तान) झाल्यानंतरही भारताला बाद फेरीची आशा करता येणार आहे. भारताचा अखेरचा साखळी फेरीचा सामना सीरियाशी होणार आहे. भारतीय संघाने २००७ व २००९मध्ये सीरियाला पराभूत केले आहे. त्यामुळे यंदाही त्यांना मोठ्या फरकाने पराभूत केल्यास सहाही गटातील सर्वोत्तम तिसरा संघ म्हणून त्यांना पुढे वाटचाल करता येऊ शकते. सहाही गटामधून तिसऱ्या स्थानावरील चार सर्वोत्तम देश आगेकूच करणार आहेत.

१९५७ च्याआधी यश

भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आतापर्यंत आठ लढती झालेल्या आहेत. त्यापैकी चार लढतींमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. भारतीय संघाने तीन लढतींमध्ये विजय संपादन केला आहे. दोन देशांमधील एक सामना ड्रॉ राहिला आहे. भारतीयांनी मिळवलेले तीनही विजय हे १९५७ सालाच्या आधीचे आहेत. त्यामुळे सध्या ऑस्ट्रेलियन संघाचे पारडे जड आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

अनुभवी ऑस्ट्रेलियन संघ

आशिया खंडातून ऑस्ट्रेलियन संघ अधिकांश वेळा फिफा विश्‍वकरंडकासाठी पात्र ठरतो. त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडे बलाढ्य संघ म्हणून बघितले जाते. ऑस्ट्रेलियन संघातील २६ फुटबॉलपटूंपैकी १९ खेळाडू हे युरोपियन लीगमधून खेळत आहेत. तसेच तीन खेळाडू जपान व सौदी अरेबिया येथील स्पर्धांमधून खेळत आहेत.

ऑस्ट्रेलियन संघाच्या पॅलेस्टाईन व बहरीन यांच्याविरुद्धच्या लढती आम्ही बघितल्या आहेत. त्यांचे खेळाडू कोणत्या लीगमधून खेळत आहेत, याचीही माहिती आम्हाला मिळालेली नाही. अर्थात त्यांचा दर्जा आमच्यापेक्षा चांगला असला तरी आमच्यासमोर कोणते आव्हान असणार आहे, याची जाणीव आहे.

- सुनील छेत्री,

भारतीय फुटबॉल संघ

सुनील छेत्रीला अखेरची संधी

सुनील छेत्रीचे सध्याचे वय ३९ आहे. त्यामुळे पुढील आशियाई करंडकात तो सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. ही त्याच्यासाठी अखेरची संधी असणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला बाद फेरीत पोहोचवण्यासाठी तो प्रयत्नांची शिकस्त करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.