हांग् चौऊ - अनुष अगरवल्ला, हृदय छेडा, दिव्यक्रिती सिंग व सुदीप्ती हजेला या भारतीय खेळाडूंनी मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये इतिहास रचला. भारताने घोडेस्वारी या खेळामधील सांघिक ड्रेसेज प्रकारात सुवर्णपदक पटकावले. आशियाई या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये तब्बल ४१ वर्षांनंतर भारताला सुवर्णपदकावर मोहोर उमटवता आली आहे. याआधी १९८२ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये भारताने घोडेस्वारी या खेळामध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.
सांघिक ड्रेसेज प्रकाराची शर्यत तब्बल १० तास रंगली. भारताच्या चारही खेळाडूंनी या शर्यतीत सर्वस्व पणाला लावले. अनुष याने त्याच्या ‘इट्रो’ नावाच्या घोड्यासह सर्वाधिक ७१.०८८ गुणांची कमाई केली. हृदय व त्याचा घोडा ‘इमराल्ड’ यांनी ६९.९४१ गुण कमवले. दिव्यक्रिती हिने ‘ॲड्रेनलीन फिरदोद’ या घोड्यासह ६८.१७६ गुणांवर मोहोर उमटवली. तसेच सुदीप्ती हिने ‘चिन्स्की’ या घोड्यासह ६६.७०६ गुण कमवले.
तीन रौप्य व सहा ब्राँझपदकांची कमाई
भारतीय खेळाडूंनी मागील ४० वर्षांमध्ये घोडेस्वारी या प्रकारात सुवर्णपदक पटकावले नसले, तरी रौप्य व ब्राँझपदक पटकावण्यात त्यांना यश मिळाले आहे. या दरम्यान भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धेमध्ये तीन रौप्य व सहा ब्राँझपदकांची कमाई केली आहे. १९८२मध्ये गुलाम मोहम्मद खान यांनी,
२०१८मध्ये फौद मिर्झा यांनी तसेच २०१८मध्येच सांघिक जम्पिंग प्रकारात भारतीय खेळाडूंनी रौप्यपदकावर नाव कोरले होते. तसेच १९८२मध्ये प्रल्हाद सिंग यांनी वैयक्तिक प्रकारात ब्राँझपदक पटकावले होते. त्यानंतर १९८६मध्ये दोन, १९९८, २००२ व २००६ या वर्षी प्रत्येक एक ब्राँझपदक जिंकण्यात भारतीय खेळाडूंना यश मिळाले. ही सर्व ब्राँझपदके सांघिक प्रकारातील होती हे विशेष.
१९८२मध्ये तीन सुवर्णपदकांची कमाई
१९८२मध्ये भारतातील नवी दिल्ली येथे आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भारताने त्या स्पर्धेमध्ये १३ सुवर्ण, १९ रौप्य व २५ ब्राँझ अशी एकूण ५७ पदके पटकाविली होती. यामध्ये घोडेस्वारी या प्रकारात एकूण पाच पदकांना गवसणी घातली होती. यामध्ये तीन सुवर्ण व एक रौप्य, एक ब्राँझपदकाचा समावेश होता.
रघुबीर सिंग यांनी पुरुषांच्या प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. तसेच पुरुषांच्या सांघिक प्रकारातही सुवर्णपदक जिंकण्यात भारताला यश मिळाले होते. तसेच रुपी ब्रार यांनी घोडेस्वारी टेंट पेगिंग या प्रकारात सुवर्णपदकावर हक्क सांगितला होता. त्यानंतर तब्बल ४१ वर्षांनंतर भारताला घोडेस्वारी या प्रकारात सुवर्णपदक जिंकता आले आहे.
चीनवर वर्चस्व
भारतीय खेळाडूंनी एकूण २०९.२०५ गुणांसह सुवर्णपदकाची माळ आपल्या गळ्यात घालताना यजमान असलेल्या चीनवर वर्चस्व राखले.चीनच्या खेळाडूंनी २०४.८८२ गुणांची कमाई करताना रौप्यपदकावर समाधान मानले.हाँगकाँगच्या (चीन) खेळाडूंनी २०४.८८२ गुणांसह ब्राँझपदक पटकावले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.