Asian Games 2023 : आयएसएल क्लबने प्रमुख खेळाडूंना मुक्त करण्यास नकार दिल्यानंतर घाईगडबडीत संघबांधणी झाल्यामुळे कमजोर बनलेल्या भारतीय फुटबॉल संघाला गुरुवारी कर्णधार सुनील छेत्रीच्या पेनल्टी गोलमुळे दिलासा मिळाला. या गोलमुळे इगोर स्टिमॅक यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने बांगलादेशला १-० असे नमविले आणि १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुष फुटबॉलमधील अ गटातील आव्हानही कायम राखले.
पहिल्या लढतीत यजमान चीनकडून १-५ फरकाने दारुण हार पत्करलेल्या नवोदित भारतीय संघाने गुरुवारी झुंझार खेळ केला. कर्णधार छेत्री आणि बचावपटू संदेश झिंगन यांचा अपवाद वगळता बाकी सारे खेळाडू आंतरराष्ट्रीय अनुभवात कमीच होते. छेत्रीने ८५व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर गोल केला, त्यामुळे भारतीय संघाला अ गटात पहिला विजय नोंदविता आला. आता भारतीय संघ अखेरच्या साखळी लढतीत रविवारी म्यानमार संघाविरुद्ध खेळेल.
पावसाळी वातावरणात झालेला सामना गोलशून्य बरोबरीकडे झुकत असताना बांगलादेशचा कर्णधार रहमत मियाँ याने चूक केली. गोलक्षेत्रात त्याने भारताच्या ब्राईस मिरांडा याला पाडले. रेफरीने पेनल्टी फटक्याची खूण केली. यावेळी कर्णधार छेत्रीने सारा अनुभव पणाला लावत प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चकविले, अखेरीस हाच गोल सामन्यात निर्णायक ठरला. बांगलादेशचा गोलरक्षक मितुल मार्मा याने चेंडू अडविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण फटक्याच्या वेगासमोर तो हतबल ठरला. हा अपवाद वगळता गोलरक्षक मार्मा भारतीय आक्रमणांना भारी ठरला.
अ गटातील सध्याची स्थिती
गुरुवारी संध्याकाळी झालेल्या अ गटातील आणखी एका सामन्यात सलग दुसरा विजय नोंदविताना चीनने म्यानमारचा ४-० असा धुव्वा उडविला. चीन सहा गुणांसह गटात अग्रस्थानी आहे. भारत व म्यानमार यांचे प्रत्येकी दोन लढतीनंतर समान तीन गुण असून गोलसरासरीत भारत दुसऱ्या, तर म्यानमार तिसऱ्या स्थानी आहे. बांगलादेशला दोन्ही सामने गमवावे लागले. साखळी फेरीतील सहा गटांतील पहिले दोन संघ उपउपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. याशिवाय गटसाखळीत सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकावरील चार संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार असल्याने भारताला संधी असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.