IND vs AUS 3rd Indore Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील इंदूर येथे खेळवला गेलेला तिसरा कसोटी सामना देखील पहिल्या दोन कसोटीप्रमाणे अवघ्या अडीच दिवसात संपला. मात्र यावेळी विजय भारताचा नाही तर ऑस्ट्रेलियाचा झाला. ऑस्ट्रेलियाने सामना 9 विकेट्स राखून जिंकत बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील आपल्या विजयाचे खाते उघडले. याचा अर्थ आता मालिकेचा निर्णय हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील चौथ्या कसोटीत लागणार आहे.
भारताने चौथ्या डावात ऑस्ट्रेलियासमोर विजयसाठी ठेवलेल्या 76 धावांचे आव्हान कांगारूंनी 33.2 षटकात एका फलंदाजाच्या मोबदल्यात पार केले. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने दुसऱ्या डावात नाबाद 49 धावांची खेळी करत मोलाचे योगदान दिले. मार्नस लाबुशानेने नाबाद 28 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक 11 बळी टिपले.
भारताने तिसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दोन कसोटींप्रमाणे इंदूरची खेळपट्टी देखील पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देणारी करण्यात आली होती. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतल्याने चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाला फलंदाजी करायची होती. त्यामुळे सर्व भारताच्या मनासारखे झाले अशी क्रिकेट चाहत्यांची भावना होती.
मात्र पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच भारताचे फासे उलटे पडले. कांगारूंच्या फिरकीच्या फिरकीने भारतीय फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. लंचपर्यंतचा खेळ पाहता भारत शंभरी गाठू शकणार नाही असे वाटत होते. मात्र तळातील फलंदाजांनी लाज वाचवली. भारताचा पहिला डाव दोन सत्राच्या आतच 109 धावात संपुष्टात आला.
इंदूरच्या खेळपट्टीवर भारताची अवस्था अशी झाली आहे म्हटल्यावर कांगारूही फार काळ तग धरणार नाहीत असे वाटत होते. मात्र कांगारूंनी झुंजारवृत्ती दाखवली. सलामीवीर उस्मान ख्वाजाने 60 धावांची झुंजार खेळी केली. मार्नस लाबुशेन 31, स्टीव्ह स्मिथ 26 आणि ग्रीनने 21 धावा जोडत संघाला 197 धावांपर्यंत पोहचवले.
भारताने दुसऱ्या दिवशी 11 धावात कांगारूंचे 6 फलंदाज बाद करत पहिल्या डावातील आघाडी आवाक्याबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली. तरी कांगारूंनी 88 धावांची आघाडी घेत सामन्यावर आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज आपल्या कामगिरीत सुधारणा करत पुनरागमन करतील असे वाटले होते. मात्र नॅथन लायनच्या वादळापुढे चेतेश्वर पुजाराच्या झुंजार 59 धावांव्यतिरिक्त इतर फलंदाजांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. भारताचा दुसरा डाव 163 धावात संपुष्टात आल्याने भारताकडे फक्त 75 धावांचीच आघाडी होती.
ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनने 64 धावात 8 विकेट्स घेतल्या. त्याने एकट्यानेच भारताचा जवळपास सगळा संघ गिळून टाकला. यानंतर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या दिवशी विजयासाठीचे 76 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरली. पहिल्याच षटकात दुसऱ्या चेंडूवर अश्विनने ख्वाजाला शुन्यावर बाद केले.
या विकेटनंतर भारत चमत्कार करणार अशी आशा पल्लवती झाली. मात्र या आशेवर ट्रॅव्हिस हेड (नाबाद 49) आणि मार्नस लाबुशाने (नाबाद 28) यांनी पाणी फेरले. ऑस्ट्रेलियाने मालिका 2 - 1 अशी आणत आपले आव्हान जिवंत ठेवले.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.