India vs Australia 1st T20I : ऑस्ट्रेलियाने भारताचे 209 धावांचे आव्हान 19.2 षटकातच पार करत तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने सामना 4 विकेट्स राखून जिंकला. भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी करताना सुरूवात खराब झाली होती. तर गोलंदाजीचा शेवटही अत्यंत खराब झाला. भारताने शेवटच्या तीन (17, 18, 19) षटकात तब्बल 56 धावा दिल्या.
ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने आक्रमक 61 धावा केल्या तर पडझडीनंतर मॅथ्यू वेडने डाव सावरत 21 चेंडूत 45 धावांची आक्रमक खेळी केली. भारताकडून अक्षर पटेलने 3 तर उमेश यादवने 2 विकेट घेत चांगली झुंज दिली.
भारताने ठेवलेल्या 209 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज सुरूवात केली. कॅमेरून ग्रीनला सलामीला पाठवत कांगारूंनी आपले इरादे आधीच स्पष्ट केले. त्याने उमेश यादवच्या दुसऱ्याच षटकात सलग 4 चौकार मारत धडाक्यात सुरूवात केली. फिंच 12 चेंडूत 22 धावा बाद झाल्यानंतर ग्रीनने अक्षरने दिलेल्या जीवनदानाचा फायदा उचलत 24 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 10 व्या षटकातच शतक पार केले.
मात्र त्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले. उमेश यादवने 12 व्या षटकात स्मिथ (35) आणि मॅक्सवेल (1) या दोघांना पाठोपाठ बाद करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. या दोन्ही विकेट्समध्ये रोहित शर्माच्या स्मार्ट DRS रिव्ह्यूचा मोठा वाटा होता. त्यानंतर अक्षर पटेलने 17 धावांवर इग्निसचा त्रिफळा उडवत कांगारूंचा पाचवा फलंदाज माघारी धाडला.
ऑस्ट्रेलियाच्या 12 ते 17 षटकात पाठोपाठ विकेट्स पडल्याने ते बॅकफूटला गेले होते. मात्र स्लॉग ओव्हरमध्ये मॅथ्यू वेड आणि टीम डेव्हिडने आक्रमक फलंदाजी करत सामन्यात पुनरागमन केले.
तत्पूर्वी, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॉस हेजलवूड आणि नॅथन एलिसने हा निर्णय पॉवर प्लेमध्येच सार्थ करून दाखवला. हेजलवूडने रोहित शर्माला 11 धावांवर बाद केले. तर एलिकने विराट कोहलीला 2 धावेवर माघारी धाडले.
मात्र त्यानंतर केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी सुरूवातीच्या पडझडीनंतर तिसऱ्या विकेटसाठी 31 चेंडूत नाबाद 51 धावांची अर्धशतकी भागीदारी रचत संघाला 10 षटकात 86 धावांपर्यंत पोहचवले. राहुल 47 धावांवर नाबाद होता तर सूर्याने 16 चेंडूत 23 धावा केल्या होत्या.
केएल राहुलने अर्धशतकी खेळी करत भारताला शंभरी पार करून दिली. मात्र जॉस हेजलवूडने भारताचा दुसरा सलामीवीर देखील गळाला लावला. त्याने केएल राहुलला 55 धावांवर बाद करत तिसऱ्या विकेटसाठी रचलेली 68 धावांची भागीदारी तोडली. यानंतर सूर्यकुमारने आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. मात्र त्याने 25 चेंडूत 46 धावा चोपल्या असताना कॅमेरून ग्रीनने त्याला बाद केले. भारताची अवस्था 13.3 षटकात 4 बाद 124 धावा अशी झाली.
सूर्यापाठोपाठ अक्षर पटेल देखील 6 धावांची भर घालून परतला. दरम्यान, हार्दिक पांड्याने डावाची सूत्रे हातात घेत भारताला 17 षटकात 160 धावांपर्यंत मजल मारून दिली. त्याने दिनेश कार्तिकला साथीला घेत स्लॉग ओव्हरमध्ये झपाट्याने धावा करण्यास सुरूवात केली. मात्र एलिसने दिनेश कार्तिकला 6 धावांवर बाद करत भारताला सहावा धक्का दिला. एलिसची ही तिसरी विकेट होती. दरम्यान, हार्दिकने 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने शेवटच्या षटकात कॅमेरून ग्रीनला सलग तीन षटकार मारत भारताला 208 पर्यंत पोहचवले. हार्दिकने 30 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.