David Warner Suffer With Head Injury : यंदाच्या ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपपूर्वी अनेक संघांना खेळाडूंच्या दुखापतींचा मोठा फटका बसला आहे. अनेक संघांनी तर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक महत्वाच्या खेळाडूंना थेट विश्रांतीच दिली. ऑस्ट्रेलियानेही भारत दौऱ्यासाठी डेव्हिड वॉर्नरला विश्रांती दिली होती. तो मायदेशात होत असलेल्या इंग्लंड विरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी संघात परतला. मात्र दुसऱ्या सामन्यावेळी त्याच्या डोक्याला दुखापत झालीच.
इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंड फलंदाजी करत असताना 15 व्या षटकात डेव्हिड वॉर्नरच्या डोक्याला दुखापत झाली. मिचेल स्टार्कच्या या षटकात दुसऱ्या चेंडूवर मोईन अलीने कव्हर्समध्ये हवेत फटका मारला. फिल्डिंग करत असलेल्या डेव्हिड वॉर्नरला या कॅचचा अंदाज आला नाही. तो थोडा पुढे निघून गेला. तरी देखील वॉर्नरने झेल पकडण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र या नादात त्याचे डोकं मैदानावर आदळलं. वॉर्नरला खूप वेदना होत होत्या. त्याला चक्कर देखील येत होती. या घटनेनंतर वॉर्नरने मैदान सोडले. यानंतर वॉर्नरची कनकशन चाचणी झाली त्यात तो ठिक असल्याचे सांगण्यात आले. डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या डावात फलंदाजीला देखील आला. मात्र त्याला 11 चेंडूत फक्त 4 धावाच करता आल्या.
कॅनबेरामध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने 20 षटकात 7 बाद 178 धावा केल्या. डेव्हिड मलानने 49 चेंडूत 82 धावा चोपल्या. तर मोईन अलीने 27 चेंडूत 44 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे क्षेत्ररक्षण गचाळ झाले. ऑस्ट्रेलियाने सामन्यात तीन झेल सोडले. पहिला ग्लेन मॅक्सवेलने त्यानंतर दुसरा डेव्हिड वॉर्नरने आणि तिसरा झेल स्टीव्ह स्मिथने सोडला. मार्कस स्टॉयनिसने 3 विकेट्स घेतल्या तर झाम्पाने 2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने 45 तर टीम डेव्हिडने 40 धावांची खेळी करत कडवी झुंज दिली. मात्र ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 6 फलंदाजांच्या मोबदल्यात 170 धावाच करता आल्या. इंग्लंडने दुसरा टी 20 सामना 8 धावांनी जिंकून तीन सामन्यांची मालिका 2 - 0 अशी जिंकली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.