Bangladesh Women vs India Women 1st T20I : चार महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मैदानात परतलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे आणि टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात सहज विजयाची नोंद केली. स्वतः कर्णधार कौरने दमदार अर्धशतक झळकावत संघाला 7 गडी राखून विजय मिळवून दिला. नवोदित फिरकीपटू मिन्नू मणीनेही भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
फेब्रुवारीमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. ही मालिका सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया या मालिकेसाठी काही नवीन खेळाडूंनाही संधी देत आहे.
मालिकेतील पहिल्याच सामन्यात कर्णधार कौरने 20 वर्षीय डावखुरा फिरकीपटू बरेड्डी अनुषा आणि 24 वर्षीय ऑफस्पिनर मिन्नू मणी यांना संधी दिली. दोन्ही गोलंदाजांनीही प्रभावित केले. बांगलादेशसमोर भारताला फारशी अडचण येईल असे वाटत नसले तरी भारतीय गोलंदाजांनी यजमानांना केवळ 114 धावांवर रोखले. बांगलादेशकडून शोर्ना अख्तरने सर्वाधिक 28 धावा केल्या. संघाने पूर्ण 20 षटके खेळली आणि फक्त 5 विकेट गमावल्या. भारताकडून वस्त्रकार, मिन्नू आणि शेफाली यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हे लक्ष्य भारतासाठी काही कठीण नव्हते, पण सलामीवीर शेफाली वर्मा या सामन्यात अपयशी ठरली. डावाच्या तिसऱ्या चेंडूवर ती खातेही न उघडताच बाद झाली. त्याचवेळी चौथ्या षटकापर्यंत जेमिमा रॉड्रिग्जही पॅव्हेलियनमध्ये परतली. भारताची धावसंख्या 2 बाद 21 धावा होती.
बांगलादेशी संघ काही उलथापालथ करू शकण्यापूर्वी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मानधना यांनी 70 धावांची भागीदारी केली. विजयाच्या जवळ आल्यावर स्मृती बाद झाली, पण कर्णधार कौरने 17व्या षटकात एक चौकार आणि षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. यासोबतच हरमनप्रीतने 11 वे टी-20 अर्धशतकही पूर्ण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.