ते पत्र अन् आयुष्याला मिळालेली कलाटणी! Wimbledon विजेत्या बार्बोरा क्रेयचीकोव्हाची भावनिक कहाणी

Barbora krejcikova wimbledon ladies single winner विम्बल्डन २०२४च्या अंतिम सामन्यात शनिवारी बार्बोरा क्रेयचीकोव्हाने बाजी मारली आणि झेक प्रजासत्ताककडून ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारी ती पाचवी खेळाडू ठरली.
Barbora krejcikova wimbledon winner letter to Jana Novotna
Barbora krejcikova wimbledon ladies single winner letter to Jana Novotna sakal
Updated on

विम्बल्डन २०२४च्या अंतिम सामन्यात शनिवारी बार्बोरा क्रेयचीकोव्हाने बाजी मारली आणि झेक प्रजासत्ताककडून ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारी ती पाचवी खेळाडू ठरली. २८ वर्षीय बार्बोराने इटलीच्या जास्मीन पाओलिनीचा ६-२,२-६,६-४ असा पराभव केला. २०१७ नंतर विम्बल्डनमध्ये महिला एकेरीत ७ वेगवेगळ्या चॅम्पियन ठरल्या आहेत आणि त्यात बार्बोराचं नाव समावेश झालं आहे.

  • टिंग टाँग! दरवाजाची बेल वाजली...

  • दरवाजासमोर एक मुलगी तिच्या आईसोबत आणि एका हातात पत्र घेऊन उभी असलेली दिसते.

  • तिला नेमकं काय सांगायचे आहे, हे घरातील व्यक्तिला काहीच कळत नव्हते, पण त्या मुलीच्या डोळ्यांतील तेज बरंच काही सांगून जात होतं.

  • ज्युनियर टेनिस पूर्ण केल्यानंतर पुढे काय, हा प्रश्न तिला सतावत होता आणि याचं उत्तर शोधण्यासाठी ती व तिची आई, त्या घरापाशी आल्या होत्या.

  • मुलीने ते पत्र समोरील व्यक्तीला दिले आणि त्याच मुलीने २०२४ च्या Wimbledon स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावले.

  • मुलीने ज्या व्यक्तीला ते पत्र दशकापूर्वी दिले होते, त्या व्यक्तीने १९९८ मध्ये हा पराक्रम केला होता आणि झेक प्रजासत्ताककडून विम्बल्डनचे जेतेपद पटकावणारी ती पहिली महिला खेळाडू होती...

  • नेमकं असं काय होतं त्या पत्रात आणि कसं बार्बोराचं आयुष्य बदललं?

झेक प्रजासत्ताकच्या दक्षिण भागातील Brno येथे १८ डिसेंबर १९९५ मध्ये बार्बोराचा जन्म झाला. सहाव्या वर्षी तिने टेनिस खेळण्यास सुरूवात केली. बार्बोराने ज्युनियर टेनिस गाजवले आणि ऑक्टोबर २०१३ मध्ये ती ज्युनियर जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर होती. तिने आपल्याच देशाची सहकारी कॅटेरिना सिनिकोव्हासोबत फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेच्या ज्युनियर महिला दुहेरी गटाचे जेतेपद पटकावले. युक्रेनच्या अलेक्सांद्रा कोराशीवी सोबत ती ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनल पर्यंत पोहोचली होती. पण, तिला कॅलेंडर वर्षात ग्रँड स्लॅम जेतेपदाचे वर्तुळ पूर्ण करता आले नाही. मात्र, त्याचवर्षी तिने स्वित्झर्लंड येथे झालेल्या युरोपियन ज्युनियर अजिंक्यपद ( १८ वर्षांखालील) स्पर्धेत महिला एकेरी व दुहेरी जेतेपद नावावर केले.

Barbora krejcikova wimbledon winner letter to Jana Novotna
Wimbledon 2024 Final : जोकोविच बदला घेणार की कार्लोसचा 'राज' कायम राहणार? आज रंगणार विम्बल्डनचा फायनल थरार

कोर्ट कोणतंही असो, आक्रमक खेळ हा बार्बोराचा प्लस पॉईंट... वेगवान सर्व्ह, दमदार ग्राऊंड स्ट्रोक आणि नेट जवळील सुरेख कौशल्य व समयसूचकता, यात तिचा हात पकडणे अवघड. दोन्ही हातांनी मारलेल्या बॅक हँड ग्राऊंडस्ट्रोकला उत्तरच नाही. त्यामुळे ज्युनियर स्तरावर यश मिळवल्यानंतर पुढे काय, याचे उत्तर शोधण्यासाठी बार्बोरा त्या घरापाशी गेली. १९९८मध्ये झेक प्रजासत्ताकला विम्बल्डनचे महिला एकेरीतील पहिले विजेतेपद मिळवून देणाऱ्या याना नोव्होत्ना ( Jana Novotná) हिचे ते घर होते.

विम्बल्डन २०२४ महिला एकेरीच्या चषकावर नाव कोरल्यानंतर बार्बोरासमोर पहिला प्रश्न आला तो, याना नाव्होत्ना व त्या पत्राचा... दशकापूर्वी टॉप रँक असलेली ज्युनियर खेळाडू नोव्होत्नाच्या घराचा दरवाजा ठोठावते, तिच्या हातात एक पत्र देते आणि त्यानंतर ती मुलगी जेतेपदाची ट्रॉफी घेऊन समोर उभी आहे. ''यानाच्या घराच्या दरवाजा ठोठावणे, तिला पत्र देणे, याने माझे आयुष्य बदलले.''

Barbora krejcikova wimbledon winner letter to Jana Novotna
Wimbledon Womens Final 2024 : बार्बोरा क्रेयचीकोव्हाने जिंकले ग्रँड स्लॅम! इटलीच्या जास्मीनची झुंज अपयशी

चकचकीत व्हीनस रोझवॉटर डिश धरून संध्याकाळच्या सूर्याच्या मंद प्रकाशात बोलत असलेल्या बार्बोराच्या डोळ्यांतील पाणी मात्र तेजोयम दिसत होते. व्हीनस रोझवॉटर डिश स्वीकारतानाच बार्बोरा प्रचंड भावनिक झाली होती, आज सर्वकाही साध्य झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता, परंतु सोबत कुणीतरी नसल्याने ती खिन्न झाली होती. ती म्हणाली, “जेव्हा मी ज्युनियर टेनिस पूर्ण केले, तेव्हा मी काय करावे हे मला माहित नव्हते, यानाने मला सांगितले की माझ्यात क्षमता आहे आणि मी नक्कीच प्रो टेनिसपटू बनले पाहिजे. तिचे निधन होण्यापूर्वी, तिने मला जा आणि ग्रँड स्लॅम जिंक असे सांगितले, मी २०२१ ममध्ये ग्रँड स्लॅम जिंकले. माझ्यासाठी तो एक अविश्वसनीय क्षण होता. याना १९९८ मध्ये विम्बल्डनमध्ये जशी ट्रॉफी जिंकली होती तशीच ट्रॉफी मी जिंकेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. ही एक आश्चर्यकारक क्षण आहे.”

बार्बोराने त्या पत्रात तिची झालेली कोंडी सांगितली होती. टेनिस खेळणं सुरू ठेवावे की शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत करावे, असा प्रश्न तिने यानाला विचारला होता. यानाने तेव्हा तिला प्रो टेनिस खेळण्यास सांगितले.. इतकेच नाही तर तिने बार्बोराच्या प्रशिक्षक व मार्गदर्शनकाची भूमिकाही बजावली. पण, आज जेव्हा बार्बोराने विम्बल्डन जिंकले, ते पाहण्यासाठी याना या जगात नाही.

याना नोव्होत्ना १९९९ मध्ये निवृत्त झाली. १४ वर्षांच्या कारकीर्दित तिने १०४ ( २४ एकेरी, ७६ दुहेरी व ४ मिश्र दुहेरी) जेतेपद जिंकली. २००५मध्ये तिचा आंतरराष्ट्रीस टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला गेला. २००० ते २००२ या दोन वर्षांत ती BCC साठी विम्बल्डनचे समालोचन करायची. २००६ मध्ये तिने विम्बल्डनमध्ये महिलांच्या निमंत्रित दुहेरी स्पर्धेत खेळण्यास सुरुवात केली आणि २००६, २००७, २००८, २०१० व २०१४ मध्ये बाजी मारली. मायदेशात परतण्यापूर्वी २०१० पर्यंत ती फ्लोरिडा येथे राहत होती. येथील Omice गावात तिने घर व काही जागा खरेदी केली. तिथे ती तिची जोडीदार पोलिश टेनिस खेळाडू इवोना कुचझीन्स्कासोबत राहत होती. १९ नोव्हेंबर २०१७ मध्ये याना नोव्होत्नाचे कॅन्सरमुळे निधन झाले. तिने कॅन्सरबाबत तिच्या जवळचे मित्र आणि नातेवाईक यांच्याशिवाय कोणाला सांगितले नव्हते.

२०२४ मध्ये तिच्या विद्यार्थीनीने विम्बल्डन जेतेपदाची ट्रॉफी जिंकली, परंतु ते पाहण्याचं भाग्य यानाला मिळाले नाही. यानाच्या आठवणीने बार्बोरा शनिवारी प्रचंड भावनिक झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.