Bhuvneshwar Kumar : स्लॉग ओव्हरमधला बिनकामाचा भुवनेश्वर; 'या' 5 कारणांमुळे भारत हरला!

Bhuvneshwar Kumar Useless In Slog Over
Bhuvneshwar Kumar Useless In Slog Overesakal
Updated on

India Vs Australia 1st T20I : ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी 20 सामन्यात भारताचा चार विकेट्सनी पराभव करत तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे टार्गेट ठेवून देखील भारताचा पराभव झाला. वर्ल्डकपची तयारी म्हणून जरी या मालिकेकडे पाहिले जात असले तरी भारत अजून अनेक विभागात कच्चा असल्याचे जाणत आहे. आशिया कप आणि आता ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताची गोलंदाजी खूप सुमार दर्जाची झाली. विशेष करून स्लॉग ऑव्हरमध्ये भारताने पुन्हा एकदा हाराकिरी केली. याचबरोबर क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीतही काही चुका केल्या. भारताला पुढील पाच कराणांमुळे पराभवाला सामोरे जावे लागले

Bhuvneshwar Kumar Useless In Slog Over
IND vs AUS : भारताची सुरूवात अन् शेवटही खराब; कांगरूंनी घेतली आघाडी

सामन्याची सुरूवातच खराब

भारताने मोहाली सारख्या हाय स्कोरिंग मैदानावर नाणेफेक गमावली. त्यामुळे त्यांना त्यांची स्ट्रेंथ धावांचा पाठलाग करण्याची संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत भारताने मोठी धावसंख्या उभारणे गरजेचे होते. मात्र भारताला पॉवर प्लेमध्येचे रोहित शर्मा (11) आणि विराट कोहली (2) असे दोन धक्के पचवावे लागले. त्यानंतर केएल राहुल आणि सूर्यकुमार यादवने भागीदारी रचत भारताला 10 षटकात 86 धावांपर्यंत पोहचवले. मात्र मोहालीसारख्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना पहिल्या 10 षटकात 100 धावा करणे गरजेचे असते. जरी हार्दिक पांड्याने 71 धावांची खेळी करत ही उणीव भरून काढली असली तरी भारताला खराब सुरूवातीमुळे 15 ते 20 धावा कमी पडल्या.

पॉवर प्लेमध्ये खराब गोलंदाजीचा फटका

भारताने ऑस्ट्रेलियासमोर 209 धावा जरी ठेवल्या असल्या तरी गोलंदाजीत देखील टिच्चून मारा करणे गरजेचे होते. अशा हाय स्कोरिंग सामन्यात पॉवर प्लेमधील गोलंदाजी खूप महत्वाची असते. तेथे जर तुम्ही नियंत्रण गमावले तर सामन्यावरील पकड ढिली होते. तेच आजच्या सामन्यात झाले. पॉवर प्लेच्या दुसऱ्याच षटकात उमेश यादवने सलग चार चौकार खाल्ले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पॉवर प्लेमध्ये 10 च्या सरासरीने 60 धावा चोपल्या.

गचाळ क्षेत्ररक्षणाचा व्हायरस अजूनही देतोय त्रास

ऑस्ट्रेलियाने प्रयोग म्हणून सलामीला पाठवलेल्या कॅमेरून ग्रीनने आल्यापासून फटकेबाजी करण्यास सुरूवात केली होती. भारताच्या दृष्टीकोणातून त्याची विकेट मिळवणे खूप महत्वाचे होते. मात्र अक्षर पटेलने पॉवर प्ले संपल्या संपल्या हार्दिकच्या गोलंदाजीवर ग्रीनचा झेल सोडला. त्यानंतर पुढच्याच षटकात केएल राहुलने स्मिथचा झेल सोडला.

बर त्यानंतरही अक्षर पटेल आणि उमेश यादवने कांगारूंना पाठोपाठ धक्के देत सामन्यावर पुन्हा नियंत्रण मिळवले. मात्र 18 व्या षटकात हर्षल पटेलने मॅथ्यू वेडचा झेल सोडला. वेडने 21 चेंडूत 45 धावा चोपून सामनाच संपवला.

Bhuvneshwar Kumar Useless In Slog Over
Jasprit Bumrah : भारतासाठी वर्ल्डकपपूर्वी धोक्याची घंटा; बुमराहचा अजूनही फिटनेस इश्यू?

स्लॉग ओव्हरमधला बिनकामाचा भुवनेश्वर!

आशिया कपमध्ये भुवनेश्वर कुमारच्या स्लॉग ओव्हरमधील मर्यादा दिसून आल्या होत्या. आजच्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात देखील त्याने 19 व्या षटकात धावांची खैरात वाटली. ऑस्टेलियाने शेवटच्या 17, 18 आणि 19 षटकात मिळून 56 धावा चोपल्या. तेथेच सामना भारताच्या पारड्यातून ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात गेला. 19 वे षटक टाकणाऱ्या भुवनेश्वरने 16 धावा दिल्या. यामुळे शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या विजयाची फक्त औपचारिकताच शिल्लक राहिली. वर्ल्डकपच्या तोंडावर आपल्याला जसप्रीत बुमराहव्यतिरिक्त जर कोणी स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट सापडत नसेल. तर ती संघाच्या दृष्टीने मोठी डोकेदुखी आहे.

कॅमेरून ग्रीनने दिला भारताला 'रेड' सिग्नल

ऑस्ट्रेलियाचा नेहमीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तसेच मिचेल मार्श या दोघांनाही भारत दौऱ्यावर विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत कर्णधार अॅरोन फिंचने कॅमेरून ग्रीनसोबत सलामी दिली. ग्रीनने आल्यापासूनच आक्रमक फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांवर चांगला दबाव निर्माण केला. त्याने पॉवर प्लेमध्ये संघाला 60 धावांपर्यंत पोहचवले.

भारताच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे जीवनदान मिळेलेल्या ग्रीनने पहिल्या 10 षटकात ऑस्ट्रेलियाचे शतक धावफलकावर लावत पुढच्या येणाऱ्या फलंदाजांसाठी काम सोपे करून ठेवले. त्याने 30 चेंडूत 61 धावांची धडाकेबाज खेळी करत भारताचा विजयी घास हिरावून घेण्यात मोलाचा वाटा उचलला. ग्रीनने घातलेल्या पायावर मॅथ्यू वेडने नाबाद 45 धावांची खेळी करत विजयी कळस चढवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.