Asian Champions Trophy 2024 Hockey : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत बुधवारी मलेशियावर ८-१ अशा दणदणीत विजय मिळवला. जपान, चीन आणि मलेशिया यांना पराभूत करून भारताने विजयी हॅटट्रिक साजरी केली आहे. राजकुमार पालने सर्वाधिक ३ गोल केले, तर अराइजित सिंगने दोन, जुगराज सिंग, हरमनप्रीत सिंग व उत्तम सिंग यांनी प्रत्येकी १ गोल केले.
क्रेग फुल्टनच्या संघाचा हा मलेशियावरील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला. तब्बल ५२ वर्षांनंतर भारताने सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचा पराक्रम केला होता.
राजकुमार पालने तिसऱ्या मिनिटाला भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यात ३ मिनिटानंतर अराइजीतने गोल केला. पहिल्या क्वार्टरच्या ८व्या मिनिटाला जुगराज व सुखजित सिंग यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताची आघाडी ४-० अशी मजबूत केली.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये हरमनप्रीत सिंग आणि राज कुमार पालने प्रत्येकी १ गोल केले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये राज कुमार, अराइजीत आणि उत्तम सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करून भारताचा ८-१ असा विजय पक्का केला. मलेशियाकडून अनुअर अखिमुल्लाहने गोल केला. भारतीय खेळाडूंनी या संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवले आणि आता १२ सप्टेंबरला त्यांच्यासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान असणार आहे. भारत सलग तीन विजय मिळवून तालिकेत अव्वल स्थानावर आहे. आशियाई हॉकी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात भारतीय पुरुष हॉकी संघाने वर्चस्व गाजवले आहे.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय हॉकी संघाचे वर्चस्व राहिले आहे. २०११ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने आतापर्यंत सर्वाधिक ४ जेतेपदं जिंकली आहेत. २०१८ मध्ये भारत व पाकिस्तान यांना संयुक्त जेतेपद दिले गेले होते. भारताने (२०११, २०१६, २०१८^, २०२३) चार आणि पाकिस्तानने (२०१२, २०१३, २०१८^) तीन जेतेपद जिंकली आहेत. दक्षिण कोरियाने २०२१ मध्ये बाजी मारली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.