Yashasvi Jaiswal : पदार्पण नव्हतं सोपं! संघर्ष पाचवीला पुजलेला तरी घवघवीत 'यश'स्वी

Yashasvi Jaiswal Century In Debut Test
Yashasvi Jaiswal Century In Debut Testesakal
Updated on

Yashasvi Jaiswal Century In Debut Test : भारताने इंग्लंडमध्ये झालेली WTC Final हरली. भारत फानलमध्ये जाऊन पहिल्यांदाच हरला नव्हता. ही भारताची सलग दुसरी हार होती. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांपासून जाणकारांपर्यंत सर्वांनाच कसोटी संघातील ही जुनी खोंड काढून नव्या दमाचा कसोटी संघ उभारला पाहिजे असा आरडा ओरडा सुरू केला.

भारताचा पुढाच कसोटी दौरा हा वेस्ट इंडीजविरूद्ध एक महिन्याने होता. या दौऱ्यासाठी भारतीय संघ कधी घोषित होतो याची सर्वांनाच आस लागली होती. कारण ही संघाची घोषणा ऐतिहासिक आणि भविष्याचा वेध घेणारी ठरणार होती. विंडीज दौऱ्यावरील कसोटी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली अन् सर्वांना एक आश्चर्याचा धक्का बसला. कारण या संघात तीन सलामीवीरांची निवड करण्यात आली होती.

यशस्वी जैसवाल, ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल (Shubman Gill) हे तीन सलामीवीर संघात होते. गिल कसोटीतील नियमीत खेळाडू होता. तर ऋतुराज देखील अनेक दिवसांपासून संघासोबत होता. मात्र आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडणारा यशस्वी जैसवाल संघात निवडला गेला त्यावेळी मानत समिश्र भावना होत्या. त्याच्यासाठी वयाच्या 21 व्या वर्षी कसोटी संघाचे दार उघडल गेल्यानं आनंद होता. (West Indies Vs India 1st Test)

संधी आयपीएलमुळं की रणजी ट्रॉफीमुळं?

दुसरीकडे कसोटी संघाची निवड करताना आयपीएलच्या कामगिरीचा आधार निवडसमितीने घेऊन मोठी चूक केली का असाही प्रश्न मनात होता. मात्र आयपीएल आपल्या डोक्यात एवढं बसलं आहे की यशस्वीने रणजी ट्रॉफीमध्ये देखील मोठमोठ्या खेळी करून आपण तिनही फॉरमॅटचा खेळाडू असल्याचं सिद्ध केलं होतं हे आपल्या ध्यानी मनीच आलच नाही.

असो आयपीएलमध्ये शतकी खेळी करणऱ्या यशस्वीला टी 20 संघात संधी दिली जाईल मग तो हळूहळू वनडे संघात येईल त्यानंतर या दोन फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली तर त्याला कसोटीपटूचा दर्जा देण्याचा विचार होईल असे वाटत होते. मात्र थेट 21 व्या वर्षी कसोटीपटू होण्याचा हक्क यशस्वीचाच होता.

आयपीएल 2023 ते वेस्ट इंडीजविरूद्धच्या कसोटी मालिकेत संघात वर्णी लागणं हे यशस्वीचं फास्ट फॉरवर्ड आयुष्य असू शकतं. मात्र या फास्ट ट्रॅक झालेल्या कारकिर्दीच्या थोडं मागं जाऊन पाहिलं तर त्याचा संघर्ष आपल्याला दिसून येईल. गरिबीमुळं क्रिकेट खेळण्यासाठी बेकरीत झोपणं, मुंबईच्या मैदानावरील टेंमध्ये निवारा शोधणं याच्या कहाण्या आपण ऐकल्याच आहेत.

ग्लॅमरस अर्जुन तेंडुलकरच्या छायेत!

मात्र यशस्वीचा संघर्ष फक्त पाणीपूरी विकण्यापर्यंतच मर्यादित नाही. तुम्हाला आठवत असेल की यशस्वी हा अर्जुन तेंडुलकर सोबतच अंडर 19 खेळत होता. त्यावेळी तो त्याच्या सोबतच श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. मात्र चर्चा होती ती फक्त अर्जुन तेंडुलकरची! त्याच्या वडिलांच्या वलयामुळे सगळा फोकस त्याच्यावरच होता.

दरम्यान, यशस्वी जैसवालने 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरूद्ध शतकी खेळी केली होती. यानंतर यशस्वी माध्यमांमध्ये इतका चर्चेचा विषय नव्हता. तो आपल्या या कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सच्या संघात आयपीएलसाठी देखील निवडला गेला. मात्र आपल्या सर्वांचे लक्ष फक्त अर्जुन तेंडुलकरवर किती बोली लागते याच्याकडेच होते.

अंडर 19 ते आयपीएल प्रवासही नव्हता सोपा

दुसरीकडे यशस्वी मिळालेली ही आयपीएलची संधी कशी साधायची याची तयारी करत होता. आयपीएलचे पहिले दोन हंगाम त्याच्यासाठी फार खास नव्हते. त्याची कामगिरी देखील टी 20 फॉरमॅटला साजेशी नव्हती. झपाट्याने बदलत्या आधुनिक क्रिकेटमध्ये बॉल टू रन खेळणारा यशस्वी फिट बसणारा नव्हता. त्यामुळे त्याचे नाव देखील चर्चेतून मागं पडत होतं. मात्र परिस्थितीसमोर कधीही हार न मानलेला यशस्वी इथं तरी हार कुठं मानणार होता?

यशस्वीने आपल्या गुणवत्तेला कष्टाची जोड देत देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडण्यास सुरूवात केली. त्याने आपल्या भात्यात एक एक करत आधुनिक शॉट्स वाढवण्यास सुरूवात केली. आपल्या बॅटिंगमध्ये अजून आक्रमकता आणत स्वतःला मोठ्या स्टेजचा खेळाडू बनवलं. त्याने 2018 ते 2023 या 5 वर्षात तब्बल 49 शतके ठोकली.

2023 चा आयपीएल हंगाम त्याच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. तो हंगामात आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोलंदाजांना आक्रमकपणे सामोरा गेला. त्याने आपल्या आकर्षक फलंदाजीने जॉस बटलरलाही बॅकफूटवर टाकले. इथंच यशस्वी हा इंडिया खेळणार हे पक्क झालं होतं. तसही यशस्वी हा टीम मॅन असल्यामुळे कोणत्याही कर्णधाराला तो आपल्या संघात हवा होताच.

कसोटीत निवड ठरलं कसोटी पाहणारं

यशस्वी विंडीज दौऱ्यावरील टी 20 संघात निवडला जाणार याची सर्वांनाच खात्री होती. मात्र निवडसमितीने यशस्वीला कसोटी संघात स्थान देत यशस्वीची थेट मोठी परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांना माहिती आहे की रोहित शर्माला देखील आपले कसोटीतील स्थान पक्के करण्यासाठी वयाची तिशी ओलांडावी लागली होती.

यशस्वी जैसवाल तर अवघा 21 वर्षाचा आहे. ज्यावेळी कसोटी संघाची घोषणा झाली त्यावेळी यशस्वी फक्त कसोटी संघासोबत असेल त्याला प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही. तो शुभमन गिलचा बॅकअप प्लॅन असेल असे वाटत होते. मात्र जसजशी पहिल्या कसोटीची तारीख जवळ येऊ लागली तस तसं यशस्वी फक्त सामना खेळणार नाही तर तो रोहित शर्मासोबत सलामीला येणार हे पक्कं झालं होतं.

शुभमन गिलने सलामीची जागा सोडली तरी...

भारताला अनेक वर्षापासून डावखुरा सलामीवीर मिळाला नव्हता. तो यशस्वीच्या रूपाने मिळणार होता. त्यामुळे यशस्वी कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यात भविष्यातील कसोटी संघ तयार करताना यशस्वी अपला हुकमी एक्का असेल अशी चर्चा देखील होती. त्यामुळे यशस्वीवर दबाव तर नक्कीच होता.

त्यात शुभमन गिलने तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा निर्णय घेतल्याने रोहित आणि यशस्वी हे कॉम्बिनेशन जुळणार की नाही याबाबत देखील शंका होती. कारण गिलने कसोटीत सलामीवीर म्हणून मोठ्या खेळी करत आपला जम बसवला होता. ते सेट कॉम्बिनेशन मोडून आता रोहित - यशस्वी असा नवा संसार थाटायचा होता.

विंडीजविरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी प्लेईंग 11 जाहीर झाली. त्यात यशस्वीचं नाव देखील आलं. मात्र नाणेफेक विंडीजनं जिंकली अन् फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र खेळपट्टीवर पहिल्या दिवशीच भारतीय फिरकीपटूंचा चेंडू चांगलाच वळत होता. वेगवान गोलंदाज देखील चेंडू चांगलाच स्विंग करत होते. अशा आव्हानात्मक खेळपट्टीवर भारताने विंडीजला 150 धावात गुंडाळले.

विंडसरच्या खेळपट्टीनं परीक्षा पाहिली

पदार्पणाच्या सामन्यातच पहिल्या दिवसापासून चेंडू धडकी भरवणारा स्पिन होत असेल तर 21 वर्षाच्या फलंदाजाची अवस्था कशी असेल याची कल्पनाच केलेली बरी. भले भले फलंदाज अशी खेळपट्टीवर गडबडतात. पदार्पणाचा सामना खेळणारा यशस्वी देखील पहिल्या 15 चेंडूत असा गडबडला होता. त्याला या 15 चेंडूत एकही धाव करता आली नव्हती. मात्र यशस्वीने आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीप्रमाणे आपली पहिली कसोटी इनिंग देखील बिल्ड केली.

यशस्वीने 16 चेंडू खेळून काढल्यानंतर अचानक अल्झारी जोसेफला पूल शॉटवर चौकार मारत आपली कसोटी इनिंग सुरू केली. यानंतर यशस्वीने मागं वळून पाहिलंच नाही. त्या एक फटक्याने त्याच्या आत्मविश्वासाला हवा मिळाली होती.

त्याने पहिल्या दिवशीच नाबाद 40 धावा करत रोहित शर्माला देखील मागं टाकलं. यशस्वीने पहिल्या दिवसाच्या शेवटच्या षटकात रिव्हर्स स्विप मारत आपल्या आत्मविश्वासाचा परिचय सर्वांना करून दिला.

हा रिव्हर्स स्विप जर हुकला असता तर यशस्वीला आपण बेजबाबदार ठरवलं असतं. मात्र सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात यशस्वीने जो सुज्ञपणा दाखवला तो याच्या बरोबर उलटा होता. पहिल्या सत्रात चेंडू चांगला वळत होता.

त्यावेळी यशस्वीने सावध भुमिका घेतली. त्याला माहिती होतं की या खेळपट्टीवर सेट होणं खूप अवघड आहे. धावा सहजासहजी होत नाहीत.

माझी भूक मोठी.. यशस्वीनं दाखवून दिलं

अजिंक्यने देखील सामन्यापूर्वी विंडीजमध्ये खूप सांभाळून आणि धैर्याने फलंदाजी करावी लागते असं सांगतलं होतं. हा कानमंत्र यशस्वीने आत्मसात केला अन् आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र त्यानंतर त्याने कोणतंही आत्मसंतुष्टीवालं सेलिब्रेशन केलं नाही. त्याला काहीतरी मोठं करायचं होतं. त्यानं फक्त अर्धशतकी खेळी करण्यासाठी बेकरी, मैदानावरील टेंटमध्ये झोपून, पाणीपुरी विकून दिवस काढले नव्हते.

त्याला काहीतरी मोठं करण्याची भूक आहे. म्हणूच त्याने अर्धशतकानंतर मोठी खेळी करण्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं. तो रोहितच्या साथीने मजल दलमजल करत आपल्या शतकाजवळ पोहचला. अखेर 215 चेंडू खेळल्यानंतर त्याने आपलं हेलमेट काढलं अन् बॅट उंचावली.

त्याची ही खेळी त्याच्या टेम्प्रामेंट आणि गुणवत्तेची साक्ष देत होतं. ज्या खेळपट्टीवर रोहितलाही धावा करणं अवघड जात होतं. त्या खेळपट्टीवर यशस्वीनं त्याच्या आधी शतक ठोकलं. शतकानंतरही त्याची भूक शमलेली नाही. तो अजून काहीतरी मोठं करणार हे नक्की.

यशस्वीसाठी एवढंच म्हणावं वाटतं....

कौन कहता है कि आसमां में छेद नहीं हो सकता!

जरा एक पत्थर तो तबियत से उछालो यारो!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.