सिंगापूर ओपन ही ऑलिंपिक पात्रता मालिकेतील अखेरची स्पर्धा होती. खेळाडू, स्पर्धा पदाधिकारी तसेच सिंगापूरमधील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : जागतिक बॅडमिंटन महासंघाने (BWF) बुधवारी (ता.१२) कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) पार्श्वभूमीवर प्रवासावर निर्बंध घातल्यामुळे सिंगापूरमधील ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा रद्द केली आहे. यामुळे भारताची बॅडमिंटन क्वीन सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि किदंबी श्रीकांतच्या (K. Srikanth) टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) पात्रतेच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. सिंगापूर बॅडमिंटन असोसिएशन (SBA) आणि बीडब्ल्यूएफ या स्पर्धेच्या आयोजकांनी १ ते ६ जून दरम्यान होणारी सिंगापूर ओपन स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला. (Chances of Saina Nehwal and Srikanth qualifying for Tokyo Olympics virtually over with Singapore Open cancellation)
साईना आणि श्रीकांतच्या टोकियो ऑलिंपिक बॅडमिंटन स्पर्धेत खेळण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. इंडिया ओपन पाठोपाठ मलेशिया ओपन आणि आता सिंगापूर ओपन रद्द झाल्यामुळे साईना आणि श्रीकांतला पात्रतेसाठी स्थान उंचावणे अवघड होणार आहे. सिंगापूर ओपन ही ऑलिंपिक पात्रता मालिकेतील अखेरची स्पर्धा होती. खेळाडू, स्पर्धा पदाधिकारी तसेच सिंगापूरमधील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. ही स्पर्धा नव्याने होणार नाही, असे जागतिक बॅडमिंटन महासंघाने स्पष्ट केले. अखेरची ऑलिंपिक पात्रता स्पर्धा रद्द झाली असली, तरी ऑलिंपिक पात्रता खेळाडूंबाबत महासंघ लवकरच निर्णय घेईल, असे जागतिक महासंघाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे साईना आणि श्रीकांतच्या धूसर आशा कायम आहेत.
लंडन ऑलिंपिकची कांस्य पदक विजेती साईना आणि श्रीकांतची ऑलिंपिक एन्ट्री सिंगापूर ओपनवर अवलंबून होती. कारण याआधी मलेशिया ओपनही रद्द करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय बॅडमिंटन महासंघाने (BAI) बीडब्ल्यूएफकडे खेळाडूंच्या पात्रतेबाबत स्पष्टीकरण मागितले होते.
सिंगापूरने भारतातून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतूकीवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे भारतीय खेळाडूंना अंतिम पात्रता स्पर्धेत भाग घेण्यासाठी जाणे अवघड झाले होते. भारताकडून महिला एकेरीत पी.व्ही.सिंधू, पुरुष एकेरीत बी. साईप्रणीत आणि पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांनी ऑलिंपिकसाठी पात्रता मिळवली आहे.
महासंघाच्या बैठकीकडे लक्ष्य
कोरोना महामारीमुळे जगभरातील अनेक ऑलिंपिक पात्रता स्पर्धा रद्द झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक बॅडमिंटन महासंघ लवकरच बैठक घेणार आहे. सर्वांना समान न्याय मिळेल या दृष्टीने निर्णय घेण्यात येतील, असे महासंघाने म्हटले आहे. त्यामुळे साईना आणि श्रीकांतच्या आशा अजूनही कायम आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.