- स्वदेश घाणेकर
परशुराम घाटाच्या पायथ्याशी, वाशिष्ठी नदीच्या काठा जवळ वसलेल्या 'कोळकेवाडी'चा तरूण मोठी स्वप्न घेऊन मुंबईत दाखल झाला अन् मायानगरीने त्याच्या पंखांना उत्तुंग भरारी घेण्याचे बळ दिले. निसर्ग संपन्नतेने नटलेल्या कोकणात तशी क्रीडा सुविधांची बोंबच. कोकणात भात कापणीनंतर शेताचंच मैदान करून पोरं खेळतात. शिमग्याला तर क्रिकेटचे सामने अशाच बांधा बांधांच्या शेतात भरवले जातात. अशा परिस्थितीतून उभा राहिलेला कोकणातला खेळाडू Pro Kabaddi League गाजवतोय. घरच्यांचा पाठिंबा अन् काहीतरी करण्याची जिद्द त्याला इथपर्यंत घेऊन आली आहे.