बर्मिंगहॅम : भारतीय खेळाडूंनी बर्मिंगहॅम येथे रंगलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केली. भारताने या प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धांमध्ये २२ सुवर्ण, १६ रौप्य व २३ ब्राँझ अशा एकूण ६१ पदकांसह पदकतालिकेत चौथे स्थान पटकावले. भारताने सलग सहाव्यांदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये ५० पेक्षा जास्त पदके पटकावली आहेत. २००२ मँचेस्टरपासून सुरू झालेला हा प्रवास बर्मिंगहॅम येथेही कायम राहिला आहे. राष्ट्रकुलमधील ऑस्ट्रेलियन खेळाडूंची देदीप्यमान कामगिरी यंदाही कायम राहिली. त्यांच्या देशातील खेळाडूंनी ६७ सुवर्ण, ५७ रौप्य आणि ५४ ब्राँझ अशा एकूण १७८ पदकांची कमाई करीत पहिले स्थान कायम राखले. त्यांनी गोल्ड कोस्टमध्ये १९८ पदकांसह पहिले स्थान पटकावले होते.
१९९० मध्ये ऑकलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांपासून आतापर्यंत झालेल्या नऊ स्पर्धांपर्यंतच्या पदकतालिकेवर नजर टाकल्यास ऑस्ट्रेलियाने वर्चस्व दिसून येईल. यापैकी आठ वेळा हा संघ पहिल्या स्थानावर राहिला आहे. २०१४ मधील ग्लासगो राष्ट्रकुलमध्ये इंग्लंडने (१७४ पदके) ऑस्ट्रेलियाला (१३७ पदके) मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला होता. बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडने ५६ सुवर्णपदकांसह एकूण १७३ पदके जिंकत दुसरे स्थान मिळवले. कॅनडाने २६ सुवर्णपदकांसह एकूण ९२ पदकांसह तिसरे स्थान पटकावले. भारत एकूण ६१ पदकांसह चौथ्या स्थानी राहिला. भारताने अखेरच्या क्षणी न्यूझीलंडला मागे टाकले. न्यूझीलंडने २० सुवर्ण, १२ रौप्य व १७ ब्राँझ अशा एकूण ४९ पदकांसह पाचवे स्थान पटकावले.
भारताची मागील सहा राष्ट्रकुलमधील कामगिरी
२००२, मँचेस्टर - ६९ पदके (चौथे स्थान)
२००६, मेलबर्न - ५० पदके (चौथे स्थान)
२०१०, नवी दिल्ली - १०१ पदके (दुसरे स्थान)
२०१४, ग्लासगो - ६४ पदके (पाचवे स्थान)
२०१८, गोल्ड कोस्ट - ६६ पदके (तिसरे स्थान)
२०२२, बर्मिंगहॅम - ६१ (चौथे स्थान)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.