Commonwealth Games : २१२ किलो वजन उचलत पटकावले पदक

जॉय ठरली अपात्र; अन्‌ हरजिंदरला ब्राँझ
हरजिंदर कौर
हरजिंदर कौरsakal
Updated on

बर्मिंगहॅम : भारताची महिला वेटलिफ्टर हरजिंदर कौर हिचे नशीब बलवत्तर होते; अन्‌ याच जोरावर तिला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील वेटलिफ्टिंग या खेळातील महिलांच्या ७१ किलो वजनी गटात ब्राँझपदक जिंकता आले. सुवर्णपदकासाठीची प्रबळ दावेदार नायजेरियाची जॉय इज ही क्लीन आणि जर्कमध्ये अपात्र ठरली. त्यामुळे पदक जिंकण्याच्या शर्यतीतून बाहेर आलेल्या हरजिंदरला एकूण २१२ किलो वजनासह ब्राँझपदकाची लॉटरी लागली.

हरजिंदर स्नॅचमधील पहिल्या प्रयत्नात ९० किलो वजन उचलण्यात अपयशी ठरली; पण त्यानंतर तिने ९० किलो वजन उचलले. तसेच अखेरच्या प्रयत्नात तिने ९३ किलो वजन उचलत आपण पदकाच्या शर्यतीत असल्याचे दाखवून दिले. क्लीन अँड जर्कमध्ये भारताच्या या कन्येने पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या प्रयत्नात अनुक्रमे ११३, ११६ व ११९ किलो वजन उचलले. मात्र यानंतरही तिचे पदक पक्के नव्हते. इंग्लंडचा साराह डेव्हीसने २२९ किलो वजन उचलत सुवर्णपदक, तर कॅनडाच्या ॲलेक्सिस ॲशवर्थने २१४ किलो वजनासह रौप्यपदक पटकावले.

विकासरची पदकांची हॅट्‌ट्रिक

विकास ठाकूर याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील पदकांची हॅट्‌ट्रिक साजरी केली. त्याने पुरुषांच्या ९६ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली. याआधी त्याने ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्य; तर गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ब्राँझपदक जिंकले होते. भारताचे वेटलिफ्टिंगमधील हे आठवे पदक ठरले.

विकासने स्नॅचमध्ये १५५ किलो वजन उचलले; तर क्लीन अँड जर्कमध्ये त्याने १९१ किलो वजन उचलले. एकूण ३४६ किलो वजन उचलून त्याने दुसरा क्रमांक पटकावला. समोआच्या डॉन ओपलोग याने एकूण ३८१ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.

पूनम यादव अपयशी

भारताची महिला वेटलिफ्टर पूनम यादव हिच्याकडून पदक जिंकण्याची अपेक्षा बाळगली जात होती; पण तिला ७६ किलो वजनी गटात देशासाठी पदक काही जिंकता आले नाही. स्नॅचमध्ये तिने तिसऱ्या प्रयत्नात ९८ किलो वजन उचलले आणि पदकाच्या शर्यतीत कायम होती. स्नॅचमधील फेरीनंतर ती दुसऱ्या स्थानावर होती; पण क्लीन अँड जर्कमध्ये तिला ११६ किलो वजन उचलता आले नाही. तिन्ही प्रयत्नात ती अपयशी ठरली. त्यामुळे पूनम अपात्र ठरली. भारताला या वजनी गटात हमखास पदक मिळेल, अशी चिन्ह निर्माण झाली होती. कॅनडाच्या माया लायलोर हिने २२८ किलो वजन उचलत सुवर्ण, नायजेरियाच्या तायवो लियाडीने २१६ किलो वजन उचलत रौप्य आणि नॉरूच्या मॅक्सिमिना युएपाने २१५ किलो वजन उचलत ब्राँझपदक जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.