Cricket Test Match : चूक मान्य नाही, त्यामुळे बदलाची शक्यता नाही - मॅकलम आणि कर्णधार स्टोक्स

पहिल्या कसोटी सामन्यातील इंग्लंड संघाची नशा पुढील सामन्यात कमी झाली आणि राजकोटच्या पराभवाने खाडकन उतरली.
captain ben stokes and trainer macklam
captain ben stokes and trainer macklamsakal
Updated on

रांची - पहिल्या कसोटी सामन्यातील इंग्लंड संघाची नशा पुढील सामन्यात कमी झाली आणि राजकोटच्या पराभवाने खाडकन उतरली. तरीही इंग्लंड कर्णधार बेन स्टोकस् आणि प्रशिक्षक मॅकलम हे चूक असल्याचे मान्यच करत नसल्याने रांचीला होणार्‍या चौथ्या कसोटीत त्यांचा बॅझपॉल पवित्राच कायम रहाण्याची शक्यता आहे.

पहिल्या कसोटीत ऑली पोपच्या एका मोठ्या शतकाने किमया केली होती ज्याने बॅझबॉल विचार प्रणालीने खेळणे इंग्लंड संघाला अजून भूषणावह वाटू लागले होते. त्याच्या शतकाचा धडाका विलक्षण होता. त्या एका खेळीने सामन्याचा नूर पालटला होता.

भारतीय गोलंदाजांना वेगळेच फटके मारून आणि सतत आक्रमक धोरण स्वीकारून नामोहरम करायच्या योजनेला योजनेला अजून बळकटी मिळाली होती. मात्र मालिका पुढे गेल्यावर राजकोट कसोटीत चारशेपेक्षा जास्त धावांच्या पराभवाने इंग्लंड संघाच्या विचार पद्धतीवर टीका होऊ लागली आहे. पण मॅकलम आणि स्टोक्स आपल्या विचारावर ठाम आहेत.

गेली दोन वर्ष इंग्लंडचा संघ बॅझबॉल विचारांनी प्रेरित होऊन खेळला आहे. मायदेशात आणि परदेशात याच विचारांमुळे संघाला मोठे यश मिळाले आहे. अ‍ॅशेस मालिकेतही इंग्लंड संघाने कमालीचे आक्रमक धोरण स्वीकारून खेळ केला आणि प्रेक्षकांना त्याची भुरळ पडली. भारताच्या दौऱ्यावर येताना इंग्लंड संघाच्या याच वेगळ्या आक्रमक धोरणाचा बोलबाला होता. याच संघाने पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये जाऊन जबरदस्त धक्का दिला होता.

इंग्लंडचा कप्तान आणि प्रशिक्षकांना वाटले होते की विराट कोहली खेळत नसल्याने भारतीय संघालाही तसेच रेटता येईल. पहिल्या सामन्यातील यशाने विश्वास अजून वाढला होता. पण एकांगी विचार करताना पाहुणे हे विसरले की भारतीय संघाने केवळ खेळात चतुरच नव्हे तर विचारांनीही कणखर असल्याचे दाखवून दिले.

विशाखापट्टणम सामन्यात अडचणीतून मार्ग काढताना भारतीय संघाने कमालीची कल्पकता कौशल्य दाखवले. पाहुण्यांनी भारतीय फिरकीला कसे अडचणीत टाकायचे याची योजना आखली होती. पण जसप्रीत बुमराला सामोरे जायची वेगळी तयारी केली होती का अशी शंका मनात आल्यावाचून रहात नाही. भारतीय संघाने गेल्या दोन कसोटीत मिळवलेल्या यशात एकदा बुमरा आणि दुसर्‍यांदा सिराजची कामगिरी मोठा परिणाम साधून गेली.

विराट कोहली आणि के एल राहुलच्या गैरहजेरीत भारताच्या तरुण फलंदाजांनी संघाला गरज असलेली कामगिरी झोकात करून दाखवली. दोन द्विशतके ठोकत यशस्वी जयस्वालने क्रिकेट जगताला मान वळवून बघायला भाग पाडले आहे.

राजकोटहून रांचीला जाताना इंग्लंड संघातील खेळाडू, आम्हांला काही फरक पडत नाही, असा आविर्भाव बाळगून विमानात चढत असले तरी मनातून त्यांना फुटलेला घाम लपत नव्हता. उलटपक्षी भारतीय संघ कणभर माज न करता मोठ्या आत्मविश्वासाने रांचीकडे जायला निघाला होता.

उद्यापासून तयारी सुरु

राजकोटहून खास दुपारच्या विमानाने दोनही संघ रांचीला निघाले. विश्रांती घेऊन बुधवारी चौथ्या कसोटी सामन्याच्या तयारीला खेळाडू लागतील. तयारी करताना भारतीय संघाला लय टिकवायची आहे तर इंग्लंडच्या संघाला अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.