Brian Lara Predicted Afghanistan in Semifinals : अफगाणिस्तानने मंगळवारी बांगलादेशला पराभूत करीत टी-२० विश्वकरंडकाची उपांत्य फेरी गाठली. प्रतिष्ठेच्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची त्यांची ही पहिलीच वेळ. कोणाच्याही खिजगणतीत नसताना अफगाणिस्तानने ऐतिहासिक कामगिरी केली.
याप्रसंगी अफगाणिस्तानचा कर्णधार राशीद खान याने ब्रायन लाराबद्दल आदर व्यक्त करताना म्हटले की, ब्रायन लारा या एकमेव व्यक्तीने आमचा संघ उपांत्य फेरीत पोहोचणार, असे म्हटले होते. त्यानंतर आम्ही ब्रायन लाराला भेटलो, तेव्हा तुमचा विश्वास सार्थ ठरवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करू, असे आमच्याकडून त्यांना सांगण्यात आले होते.
राशीद खान पुढे म्हणाला, ब्रायन लारासारख्या महान व्यक्तीने आमच्याबद्दल विश्वास दाखवल्यानंतर खेळाडूंमध्ये नवा उत्साह संचारतो. आम्ही साध्या पद्धतीच्या खेळावर लक्ष केंद्रित केले. काही वेळा आमच्यासमोर आव्हानात्मक स्थिती होती; पण आम्ही दबावाखाली ढेपाळलो नाही. त्यामधून बाहेर आलो.
१९ वर्षांखालील स्पर्धेत आमच्याकडून चमकदार खेळ झाला होता; पण वरिष्ठ गटाच्या आयसीसी स्पर्धांमध्ये आम्हाला सुपर आठची फेरीही गाठता आली नव्हती. त्यामुळे अफगाणिस्तानचा संघ पहिल्यांदाच उपांत्य फेरीत पोहोचणारी घटना देशवासीयांचा आनंद द्विगुणीत करणारी आहे. तसेच युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी आहे, असेही राशीद खान म्हणाला.
ब्रायन लाराची भविष्यवाणी
ब्रायन लारा याने टी-२० विश्वकरंडक सुरू होण्याआधी उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या चार संघांबाबत भाकित व्यक्त केले होते. त्याने यजमान वेस्ट इंडीजसह भारत, इंग्लंड व अफगाणिस्तान या संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश होईल, अशी भविष्यवाणी केली होती. वेस्ट इंडीजच्या संघात सामन्याला कलाटणी देणाऱ्या खेळाडूंचा समावेश असून भारतीय संघामध्ये गुणवान खेळाडूंची कमी नाही. दोन भारतीय संघ खेळू शकतील, अशा अव्वल दर्जाच्या खेळाडू त्यांच्याकडे आहेत.
इंग्लंडने गेल्या काही वर्षांमध्ये सफेद चेंडूने खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये छान कामगिरी केली असून जॉस बटलरच्या नेतृत्वात हा संघ चांगला खेळ करीत आहे. अफगाणिस्तानने मागील काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लक्षणीय झेप घेतली आहे, असे ब्रायन लाराने मत व्यक्त केले होते. त्याने निवडलेल्या चारपैकी तीन संघांनी यंदाच्या टी-२० विश्वकरंडकात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. वेस्ट इंडीजऐवजी दक्षिण आफ्रिकन संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या लढतीत आम्ही आणखी १५ ते २० धावा करायला हव्या होत्या; पण गोलंदाजांनी अचूक टप्प्यात गोलंदाजी करीत प्रतिस्पर्ध्यांना बांधून ठेवले. आम्ही संपूर्ण स्पर्धेत दमदार खेळ केला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत पोहोचण्याचा आमचा हक्क आहे.
- राशीद खान, कर्णधार, अफगाणिस्तान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.