IND vs ENG Guyana Weather Updates T20 World Cup Semi-Final : ऑस्ट्रेलियाचे हिशेब चुकते केल्यानंतर आता इंग्लंडला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारतीय संघ तयार झाला आहे. ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील भारत-इंग्लंड या उपांत्य फेरीची उत्सुकता ताणलेली असली, तरी पावसाच्या व्यत्ययावर सामन्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचे हिशेब भारताने सोमवारी पूर्ण केले होते. २०१९ मधील ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव केला होता. आज त्या पराभवाची परतफेड करण्याची भारताला संधी आहे.
भारत आणि इंग्लंडच्या संघाचे बलाबल अभ्यासता जास्त फरक आढळत नाही. दोनही संघांकडे अनुभवी खेळाडू आणि दर्जेदार फलंदाजांसोबत कल्पक फिरकी गोलंदाज आहेत. दोनही संघांच्या फिरकी गोलंदाजांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. दोनही संघांचे कप्तान गुणवान आक्रमक फलंदाज आहेत. किंचित फरक इतकाच वाटतो आहे की, भारतीय फलंदाज इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांसमोर तग धरून चांगली खेळी करण्याची शक्यता जास्त आहे.
इंग्लंडने जिंकलेल्या सामन्यात आदील रशीदच्या माऱ्याचा परिणाम स्पष्ट जाणवणारा आहे. कोणत्याच संघातील फलंदाजांना रशीदची फिरकी समजून आक्रमण करणे झेपले नाही. भारतीय संघातील फलंदाजांना नेमके तेच आव्हान खुणावत आहे. आदील रशीद आणि मोईन अलीच्या ८ षटकांत भारतीय फलंदाज काय परिणाम साधतात यावर सामन्याचा तोल हेलकावे खाणार आहे. दुसऱ्या बाजूला इंग्लंडच्या फलंदाजांसमोर खासकरून कुलदीप यादवच्या दर्जेदार फिरकीचे आव्हान आहे.
इंग्लंड संघाच्या फलंदाजीची मुख्य मदार कप्तान जॉस बटलरवर आहे. भारतात भरपूर क्रिकेट खेळल्याने बटलर फिरकी गोलंदाजांना सहजी खेळताना दिसला आहे. फिल सॉल्ट आणि जॉनी बेअरस्टोलाही आयपीएलचा अनुभव पाठीशी आहे. इंग्लंड संघात मोईन अली आणि सॅम करण हे दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहेत हे विसरून चालणार नाही.
ऑस्ट्रेलियासमोरच्या सामन्यात दडपणाखाली अशक्य आक्रमक खेळी करून रोहित शर्माने कप्तान म्हणून संघातील बाकी खेळाडूंसाठी पाठ घालून दिला आहे. इंग्लंडसमोर उपांत्य सामन्यात खेळताना भारतीय फलंदाज त्याच मार्गावरून जातील, असा अंदाज वाटतो. मधल्या फळीतील फलंदाज खूप मोठी खेळी करत नसले तरी योग्य योगदान संघाला धावफलक उभारून देताना करत आहेत. कळीचा मुद्दा सलामीला येणाऱ्या अपयशाचा कायम राहिला आहे.
असा आहे पावसाचा अंदाज
जॉर्जटाउनला गेले काही दिवस सतत रिमझिम पाऊस पडत असल्याने कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडन्स मैदानाची खेळपट्टी तयार करायला पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे खेळपट्टी कशी असेल याचा अंदाज वर्तवणे कठीण आहे, तसेच सामन्याच्या दिवशीसुद्धा पावसाची शक्यता आहे. फक्त पाऊस सतत पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला नाही.
...तर काय होणार
उपांत्य फेरीच्या या दुसऱ्या सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवलेला नाही, मात्र हा सामना पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ ठेवला आहे. ७ तास २० मिनिटांचा हा वेळ असेल. तरीही किमान पाच षटकांचा खेळ झाला नाही तर गटामध्ये अव्वल स्थान भारताने मिळवलेले असल्यामुळे त्यांना अंतिम फेरीत स्थान मिळेल.
विराटकडून अपेक्षा
विराट कोहलीला सलामीला फलंदाजी करायला भारतीय संघ व्यवस्थापनाने दिलेली संधी अजून कामी आलेली नाही. विराट सातत्याने लवकर बाद झाल्याने प्रश्न निर्माण झाले आहेत. विराट कोहलीला अपयश आले असतानाही उपांत्य फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्यात कप्तान संघात बदल करायची शक्यता कमी वाटत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.