टी-20 विश्वचषकात भारताविरुद्धच्या विजयानंतर संपूर्ण पाकिस्तानात जल्लोषाचं वातावरण आहे.
इस्लामाबाद : टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) भारताविरुद्धच्या (India Pakistan Match) विजयानंतर संपूर्ण पाकिस्तानात जल्लोषाचं वातावरण आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट संघानं पहिल्यांदाच विश्वचषकात भारताविरुद्ध सामना जिंकलाय. या विजयानं पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद (Home Minister Sheikh Rashid) देखील आनंदी झाल्याचं पाहायला मिळतंय. रशीद म्हणाले, 'पाकिस्तानी संघाचा हा विजय आलमी इस्लामचा विजय असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांच्या या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यामुळं अनेकजण संताप व्यक्त करत आहेत.
काय म्हणाले शेख रशीद?
शेख रशीद म्हणाले, मला खेद आहे की भारत-पाकिस्तान यांच्यातील हा पहिला सामना, जो मी माझ्या राष्ट्रीय जबाबदाऱ्यांमुळं मैदानावर पाहू शकलो नाही. परंतु, मी इस्लामाबाद-रावळपिंडीच्या रस्त्यावर ठेवलेले कंटेनर काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून हा उत्सव साजरा केला जाईल. सध्या पाकिस्तानातील कट्टर टीएलपीच्या समर्थकांनी केलेल्या दंगलीमुळे इस्लामाबादकडे जाणारे रस्ते बंद झाले आहेत.
रशीद पुढे म्हणाले, पाकिस्तानी संघाचं, पाकिस्तानी जनतेचं अभिनंदन! आज भारताविरुद्ध आमचा अंतिम सामनाच होता. आमची ही फायनल मॅच होती. पाकिस्तान झिंदाबाद.. इस्लाम जिंदाबाद! जगभरातील मुस्लिमांसह भारतातील मुस्लिमांच्या भावना पाकिस्तानी संघासोबत होत्या, असंही त्यांनी म्हटलंय. मात्र, या त्यांच्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यामुळं अनेकांनी संताप व्यक्त केलाय.
पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी टी-20 विश्वचषकात भारताविरुद्ध मिळवलेल्या विजयाबद्दल पाकिस्तानी संघाचं अभिनंदन केलंय. यासोबतच, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनीही संघाच्या उत्कृष्ट खेळाबद्दल आनंद व्यक्त केलाय.
पाकिस्तानची भारतावर 10 विकेट्सनी मात
सुपर 12 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्ताननं भारताचा 10 गडी राखून पराभव केलाय. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं भारताला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी झालेल्या 12 सामन्यांमध्ये केवळ भारतीय संघानं विजय मिळवला होता. 50 षटकांच्या विश्वचषकाच्या 7 लढतीत भारताने वर्चस्व राखलं आहे. ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या आतापर्यंतच्या पाचही लढतीत भारतानेच विजय मिळवला होता. मात्र, हा सगळा इतिहास आणि आकडेवारी बाजूला सारत पाकिस्तानने दणदणीत विजय मिळवला. कर्णधार बाबर आझमने 52 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 68 धावांची खेळी केली. रिझवानने 55 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 78 धावांची खेळी करत पाकिस्तानला विश्वचषकात भारताविरुद्ध पहिलावहिला विजय मिळवून दिला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.