T20 Cricket Captain Babar Azam vs Virat Kohli : नामिबिया विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत आणखी एक अर्धशतक झळकावले. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी घेण्याचा निर्णय सार्थ करताना त्याने दमदार कामगिरी नोंदवली. 49 चेंडूत 7 चौकाराच्या मदतीने त्याने 70 धावांचे योगदान दिले. टी-20 कारकिर्दीतील त्याचे हे 23 वे अर्धशतक आहे. याशिवाय या अर्धशतकाच्या माध्यमातून त्याने किंग कोहलीलाही मागे टाकले आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करताना सर्वाधिक अर्धशतके करण्याचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावे होता. 44 डावात कोहलीने 13 अर्धशतके झळकावली आहेत. बाबरने अवघ्या 27 व्या डावात कोहलीला ओव्हरटेक करुन दाखवलं. यापूर्वी अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यातही बाबर आझमने अर्धशतकी खेळी साकारली होती. यावेळीही त्याने कोहलीचा सर्वात जलदग हजारीचा विक्रम मागे टाकला होता. बाबर आझमने 26 डावात हजार धावांचा टप्पा पार केला होता.
यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघासह विराट कोहलीकडून मोठी अपेक्षा होती. पण दोन सामन्यातील पराभवामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात एकाकी झुंज देत स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले होते. टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 91 सामन्यातील 86 डावात कोहलीने 29 अर्धशतके झळकावली आहेत. सध्याच्या घडीला बाबर आझम रनमशिन कोहलीला तगडी फाईट देताना दिसते.
बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार कामगिरी करताना दिसत आहे. वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानने टीम इंडियाला पराभूत करुन दाखवले. सलामीच्या लढतीत उंचावलेल्या आत्मविश्वासानंतर पाकिस्तानने न्यूझीलंडलाही पराभवाचा दणका दिला. अफगाणिस्तानला नमवून त्यांनी स्पर्धेतील सेमीफायनलचे तिकीट जवळपास पक्के केले. नामीबीया आणि स्कॉटलंडला नमवून पाकिस्तानला सुपर 12 मधील पहिल्या गटात 10 गुणासह टॉपर राहण्याची संधी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.