T20 World Cup: पाकिस्तान क्रिकेट संघाला नुकताच मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान संघ टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतून बाहेर गेला आहे.
यातच आता पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलचा एका व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो त्याचा धाकटा भाऊ उमर अकमलची तुलना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीशी करत आहे.
काही दिवसांपूर्वीच ३४ वर्षीय उमरने त्याच्या शर्टलेस फोटो शेअर करत म्हटले होते की हे त्या सर्वांसाठी आहे, ज्यांना असं वाटतं की तो फिट नाही. यानंतर आता कामरानचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
या व्हिडिओमध्ये कामरानने असा दावा केला आहे की उमर विराटपेक्षा चांगला खेळाडू आहे, त्याचबरोबर त्याने असंही म्हटलं की आकडेवारी दाखवायला फक्त त्यांच्याकडे पीआर एजन्सी नाही.
कामरानने पाकिस्तानमधील एआरआय न्युजशी बोलताना म्हटले, 'मला काल आकडेवारी मिळाली आहे. मी उमरबद्दल बोलत आहे. टी२० वर्ल्ड कप सामन्यांमध्ये उमरचे विराटपेक्षा जास्त चांगली आकडेवारी आहे. उमर विराटच्या एकूण कामगिरीच्या जवळपासही नाही, पण टी२० वर्ल्ड कपमध्ये उमरचा विराटपेक्षा चांगला स्ट्राईक रेट आहे आणि सर्वोत्तम धावसंख्याही आहे.'
टी२० वर्ल्ड कपमध्ये उमर अकमलने १३२.४२ च्या स्ट्राईक रेटने धावा केलेल्या आहेत, तर विराटने १३०.५२ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. तसेच विराटने नाबाद ८९ धावा ही सर्वोत्तम कामगिरी आहे, तर उमरची ९४ ही सर्वोत्तम खेळी आहे.
मात्र, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की विराट टी२० वर्ल्ड कपमध्ये सध्या सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने ३० सामन्यांत तब्बल ६७.४१ च्या सरासरीने आणि १४ अर्धशतकांसह ११४६ धावा केल्या आहेत. उमरने टी२० वर्ल्ड कपमध्ये २० सामन्यांमध्ये ३४.७१ च्या सरासरीने ४८६ धावा केल्या आहेत, ज्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
कामरान पुढे असंही म्हणाला, 'आमच्याकडे पीआर कंपनी नाहीत, ज्या आमची आकडेवारी सोशल मीडियावर शेअर करतील.'
त्याने असंही म्हटलं की सध्याच्या पाकिस्तान संघातील खेळाडूंची जर उमरसारखी आकडेवारी असती, तर विराटच्या महानतेवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं असतं.'
दरम्यान, सध्या कामरानच्या या वक्तव्यांमुळे तो चर्चेत आहे. कामराननेही पाकिस्तानसाठी टी२० वर्ल्ड कपमध्ये ३० सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ५२४ धावा केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.