England vs South Africa, T20 World Cup 2024 : क्विंटॉन डी कॉकची ६५ धावांची अन् डेव्हिड मिलरची ४३ धावांची खेळी, तसेच कागिसो रबाडा, केशव महाराज व ॲनरिक नॉर्किया यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकन संघाने टी-२० विश्वकरंडकातील सुपर आठ फेरीमधील सलग दुसरा विजय नोंदवला. इंग्लंडवर सात धावांनी मिळवलेल्या विजयासह दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीच्या दिशेने दमदार पाऊल टाकले. इंग्लंडच्या हॅरी ब्रुक (५३ धावा) व लियाम लिव्हींगस्टोन (३३ धावा) यांचे प्रयत्न अपयशी ठरले.
दक्षिण आफ्रिकेकडून इंग्लंडसमोर १६४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. कागिसो रबाडा, ओटनील बार्टमॅन व केशव महाराज यांनी प्रभावी गोलंदाजी करीत इंग्लंडची अवस्था चार बाद ६१ धावा अशी केली. फिल सॉल्ट (११ धावा), जॉस बटलर (१७ धावा), जॉनी बेअरस्टो (१६ धावा) व मोईन अली (९ धावा) यांना अपयश आले. त्यानंतर हॅरी ब्रुक व लियाम लिव्हींगस्टोन या जोडीने विजयासाठी अथक परिश्रम केले. दोघांनी ७८ धावांची भागीदारी करीत इंग्लंडच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात लिव्हींगस्टोन ३३ धावांवर बाद झाला. ॲनरिक नॉर्कियाच्या गोलंदाजीवर हॅरी ब्रुक ५३ धावांवर बाद झाला आणि त्यांच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.
दरम्यान, याआधी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. रिझा हेंड्रीक्स व क्विंटॉन डी कॉक या सलामी जोडीने ९.४ षटकांत ८६ धावांची खणखणीत भागीदारी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. अर्थात यामध्ये हेंड्रीक्सचा वाटा होता १९ धावांचा. डी कॉक याने ३८ चेंडूंमध्ये चार चौकार व चार षटकारांसह ६५ धावांची खेळी साकारली. मोईन अलीने हेंड्रीक्सला बाद करीत जोडी तोडली.
कर्णधार जॉस बटलर याच्या कल्पकतेमुळे इंग्लंडला या लढतीत पुनरागमन करता आले. आधी जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर त्याने डी कॉकचा उत्कृष्ट झेल टिपला. यामुळे डी कॉकचा झंझावात तिथेच थांबला. त्यानंतर आक्रमक फलंदाज हेनरिक क्लासेन याला आठ धावांवर धावचीत करताना त्याने अफलातून कौशल्य दाखवले. त्यानंतर डेव्हिड मिलरच्या ४३ धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकन संघाने २० षटकांत सहा बाद १६३ धावा फटकावल्या. आर्चर याने ४० धावा देत तीन फलंदाज बाद केले.
संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका - २० षटकांत सहा बाद १६३ धावा (क्विंटॉन डी कॉक ६५, डेव्हिड मिलर ४३, जोफ्रा आर्चर ३/४०) विजयी वि. इंग्लंड - २० षटकांत सहा बाद १५६ धावा (हॅरी ब्रुक ५३, लियाम लिव्हींगस्टोन ३३, कागिसो रबाडा २/३२, केशव महाराज २/२५, ॲनरिक नॉर्किया १/३५).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.