Afghanistan vs Pakistan : पाकिस्तान कर्णधारची अर्धशतकी खेळी आणि अखेरच्या षटकात असिफ अलीने केलेल्या षटकारबाजीच्या जोरावर पाकिस्तानने सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानने ठेवलेले 148 धावांचे लक्ष्य त्यांनी 5 गडी राखून पार केले. या विजयासह पाकिस्तानने सेमीफायनलचा प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. बाबर आझमची विकेट पडल्यानंतर सामना अफगाणिस्तानच्या बाजूने झुकला होता. अखेरच्या 2 षटकात पाकिस्तानला 24 धावांची गरज होती. मोक्याच्या क्षणी शोएब मलिक बाद झाला. किरम जन्नतच्या षटकात 4 षटकार खेचत असिफ अलीने 1 ओव्हर आणि 5 गडी राखून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हझरतुल्लाह झझाई आणि मोहम्मद शहजादा या जोडीनं अफगाणिस्तानच्या डावाची सुरुवात केली. झझाईला खातेही उघडता आले नाही. तर शहजादा 8 धावा करुन माघारी फिरला. इमाद वासीमने संघाला पहिले यश मिळवून दिले तर शाहीन आफ्रिदीने अफगाणिस्तानला दुसरा धक्का दिला. गुरबज 10, असगर अफगान 10 आणि करीम जनत 15 धावा करुन बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ अडचणीत आला होता.
नजीबुल्लाहने 22 धावांची महत्त्वाची खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शदाब खानने त्याची विकेट घेतली. 6 बा 76 अशी धावसंख्या असताना गुलबदीन क्रिजमध्ये आला. त्याने आपल्या कर्णधाराला उत्तम साथ दिली. या जोडीने 73 धावांची नाबाद भागीदारी केल्यामुळे अफगाणिस्तानच्या संघाने निर्धारित 20 षटकात 6 बाद 147 धावा केल्या होत्या.
या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर मोहम्मद रिझवान 8 धावांवर बाद झाला. कर्णधार बाबर आझमने फखर झमानच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. नबीने झमानला 30 धावांवर तंबूत धाडले. मोहम्मद हाफिज 10 धावा करुन बाद झाला. अर्धशतकी खेळी करणाऱ्या बाबर आझमला राशिद खानने बोल्ड केलं. शोएब मलिक 15 धावा करुन परतल्यानंतर सामना पुन्हा रंगतदार स्थितीत पोहचला होता. मात्र असिफ अलीने दोन षटकात हव्या असणाऱ्या धावा एकाच षटकात करत पाकिस्तानचा तिसरा विजय पक्का केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.