T20 WC 2024: 'बरं झालं, पुन्हा या खेळपट्टीवर खेळायचं नाही...', सेमीफायनल जिंकल्यानंतर कर्णधारचं टीकास्त्र

Aiden Markram on Brian Lara Cricket Academy Pitch: टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तान-दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील ही खेळपट्टी चर्चेचा विषय ठरली.
Aiden Markram
Aiden Markramsakal
Updated on

T20 World Cup 2024 Aiden Markram: पुन्हा या खेळपट्टीवर खेळायला लागणार नाही, यातच मोठे सुख आहे, अशा तिरकस शब्दात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केली.

टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तान-दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील ही खेळपट्टी चर्चेचा विषय ठरली. प्रत्येकी २०-२० षटकांचा हा सामना २०.४ षटकांतच संपला. अफगाणिस्तानचा डाव ५६ धावांतच संपुष्टात आला.

ब्रायन लारा अकादमी स्टेडियमवरच्या या खेळपट्टीवर चेंडू पडल्यानंतर अनपेक्षितपणे स्वींग होत होता. काही चेंडू तर झपाट्याने यष्टींच्या दिशेने येत होते.

अशा खेळपट्टीवर पुन्हा खेळायचे नाही, हा विचारच समाधान देणारा आहे. टी-२० हा प्रकार प्रेक्षकांना फटकेबाजीचा आनंद देणारा असतो. अशावेळी प्रत्येक चेंडूसाठी झगडायला लागले, असे मत मार्करमने सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत व्यक्त केले. स्पर्धेचा अंतिम सामना बार्बाडोस येथे शनिवारी होणार आहे.

मुळात संपूर्ण स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्ट्या आव्हानात्मक होत्या. टी-२० हा प्रकार फलंदाजांसाठी अधिक झुकलेला असताना या खेळपट्ट्या चांगल्या नव्हत्या, असे थेट म्हणता येणार नाही. परिस्थिती कशीही असली तरी त्यातून मार्ग काढण्यास आम्ही यश मिळवले, हीच आमच्यासाठी सकारात्मक बाजू आहे, असेही मार्करम म्हणाला.

आमच्यासह सर्वच संघांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सातत्याने प्रवास करावा लागला. प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगवेगळी होती. त्यामुळे परिस्थितीशी मिळते जुळते घेऊन खेळ करावा लागला, असे आफ्रिकेचा कर्णधार म्हणाला.

या स्पर्धेत आफ्रिकेने सलग आठ सामने जिंकले असले तरी सुपर आठ फेरीतील काही सामने अतिशय निसटत्या फरकाने त्यांनी जिंकले आहेत, मात्र अशा प्रत्येक विजयाने आमचा आत्मविश्वास वाढत गेला. जे सामने जिंकणे कठीण आहे, असे वाटत असताना विजय मिळाला, तर त्यामुळे निश्चितच मनोबल वाढते, असे मार्करमने सांगितले.

आयसीसीच्या सर्व प्रमुख स्पर्धांत निर्णायक क्षणी अवसानघात केल्यामुळे आतापर्यंत कोणतेही विजेतेपद हाती न लागल्यामुळे आफ्रिकेला चोकर्स असे संबोधले जाते, यासंदर्भात विचारले असता मार्करम म्हणाला, अगोदर काय झाले याचा विचार आणि चर्चा आम्ही ड्रेसिंग रूममध्ये करत नाही. पुढे काय करायचे यावरच आम्ही चर्चा करत असतो, असेही त्याने स्पष्ट केले.

अफगाणिस्तान प्रशिक्षकांचीही नाराजी

अफगाणिस्तानचे प्रशिक्षक आणि इंग्लंडचे माजी खेळाडू असलेल्या जोनाथन ट्रॉट यांनीही खेळपट्टीवरून जोरदार टीका केली. विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्यासाठी अशा प्रकारची निकृष्ट खेळपट्टी कोणीही तयार करत नाही, असे ते म्हणाले.

अधिक टीका करून मला स्वतःला आणखी अडचणीत आणायचे नाही, पण एवढ्या महत्त्वाच्या सामन्यासाठी अशी खेळपट्टी योग्य नव्हती. अशा खेळपट्टीमुळे फलंदाजीचे सामन्यातील महत्त्वच संपुष्टात आले होते. फलंदाजी आणि गोलंदाजीला समान संधी मिळणारी खेळपट्टी अपेक्षित होती, असे त्यांनी सांगितले.

त्रिनिदादमध्ये विश्वकरंडक स्पर्धेतील एकूण पाच सामने झाले त्यातील एकाच सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १०० पेक्षा अधिक धावा करण्यात आल्या. वेस्ट इंडीजने न्यूझीलंडविरुद्ध सहा बाद १४९ धावा केल्या आणि त्या निर्याणक ठरवल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.